‘बाहुबली २’ सिनेमा २८ एप्रिलला प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसाच्या पहिल्या शोपासून हा सिनेमा हाऊसफुल्लची पाटी काही केल्या सोडत नाही. संपूर्ण ‘बाहुबली’ सिनेमा बनवण्यासाठी पाच वर्षे लागली. या पाच वर्षांत बाहुबलीमधील कलाकारांमध्येही चांगले संबंध तयार झाले. खासकरून सिनेमातला नायक आणि खलनायक हे तर घनिष्ठ मित्रच बनले. हे दोघं नेहमीच एकमेकांच्या मदतीला सदैव तयार असतात. एका चॅट शोमध्ये राणाने त्याच्या आणि प्रभासच्या मैत्रीचा एक गमतीशीर किस्सा सांगितला. राणाने एकदा प्रभासची गंमत करण्याचे ठरवले. त्याने प्रभासला कॉल करुन त्याला पोलिसांनी पकडले असल्याचं सांगत त्याच्याकडे मदत मागितली.

राणाचे हे बोलणे ऐकून प्रभासने तेवढ्याच हुशारीने उत्तर दिले. प्रभास म्हणाला की, ‘पोलिसांना सांग की ‘बाहुबली २’ मध्ये तू माझ्यासोबत आहेस. ते तुला सोडून देतील.’ यावरूनच बाहुबली सिनेमाची क्रेझ लक्षात येते आणि या दोघांची मैत्रीही. बाहुबली सिनेमात राणा आणि प्रभास यांनी भावांची व्यक्तिरेखा साकारली आहे. जेवढं प्रभासची व्यक्तिरेखा लोकांनी उचलून धरली तेवढीच राणाची व्यक्तिरेखाही प्रेक्षकांना फार आवडली.

‘बाहुबलीः द बिगिनिंग’ हा सिनेमा २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने ६०० कोटी रुपयांची बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. २८ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली २’ सिनेमाने पहिल्याच दिवशी १२१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा एक रेकॉर्ड आहे. बाहुबलीचा हा रेकॉर्ड मोडणं बॉलिवूडपटांनाही शक्य नाही. एसएस राजामौली दिग्दर्शित या सिनेमात प्रभास, राणासह रम्या कृष्णन, सत्यराज, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.’