‘बाहुबली २’ प्रदर्शित होऊन आता ५ महिने उलटून गेले, पण तरीही या सिनेमाची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. कोणत्या न कोणत्या कारणांनी या सिनेमाच्या बातम्या आजही वाचायला मिळतात. आता कोलकातामध्ये दूर्गा पूजेचं आयोजन करण्यात आलेल्या मंडपांच्या सजावटीमध्ये ‘बाहुबली’चा प्रभाव पाहायला मिळत आहे.
बहरिनच्या राजकुमाराशीही होते जॅकलिनचे अफेअर




पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्रीत तर संपूर्ण कोलकाता देवीच्या जल्लोषात रंगलेले असते. शहरात एखादी थीम घेऊन मोठ-मोठाले देवीचे मंडप उभारले जातात. यावेळी कोलकातामधील अशाच एका मंडपाने चक्क ‘बाहुबली’चे माहिष्मती राज्य उभे केले आहे. या मंडपाला भेट देणारे देखाव्याची भव्यता आणि कलाकुसर पाहून आश्चर्यचकीत होत नसतील तर नवल… या मंडळाचा फोटो पाहूनही तुम्हाला देखाव्याच्या भव्यतेचा अंदाज येत असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, मंडळाने उभारलेला हा ‘बाहुबली’चा देखावा ११० फूट उंच आहे. हा देखावा तयार करायला सुमारे १५० कलाकारांना तीन महिन्यांचा कालावधी लागला. भव्य महालात विराजमान झालेल्या दुर्गादेवीला जे दागिने घातण्यात आले आहेत त्यांची किंमत सुमारे १० कोटी रुपये आहे. तर हा देखावा तयार करायला साधारण एक कोटीचा खर्च आला.
या दाक्षिणात्य कलाकारांसोबत रंगतेय कतरिनाची नवरात्र
‘बाहुबली- द बिगिनिंग’ सिनेमा प्रदर्शित झाल्यावरही अशाच पद्धतीची क्रेझ पाहायला मिळत होती. मुंबईत गणेशोत्सवादरम्यान ‘बाहुबली’ शिवलिंग उचलून चालतानाच्या दृश्याचा देखावा उभारून त्यात बाहुबलीप्रमाणे खांद्यावर शिवलिंग उचललेल्या गणेशाची मूर्ती स्थापन करण्यात आली होती.