सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांचं धक्कादायक वक्तव्य

‘पँट-शर्ट घालणारी ही स्त्री कशी काय असू शकते?’

ani, nawajuddin
छायाचित्र सौजन्य- एनआय

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ चित्रपटावर आता सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवली आहे. ‘अ’ प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील एक दोन किंवा दहा नाही तर तब्बल ४८ दृश्यांवर कात्री चालवली आहे. याच विषयावर बोलण्यासाठी ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ चित्रपटाच्या टीमसह इतर काही दिग्दर्शकांनी मुंबईत पत्रकार परिषद बोलावली.

या पत्रकार परिषदेत अनेकांनी सेन्सॉर बोर्डाविरुद्ध आवाज उठवला. महत्त्वाचं म्हणजे ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ चित्रपटाला ‘अ’ प्रमाणपत्र आणि ४८ कटवरच न थांबत सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी निर्मात्या किरण श्रॉफ यांचा अपमानही केला. दिग्दर्शक कुशन नंदी यांनी यावेळी सांगितले की, ‘एक स्त्री असतानाही तुम्ही अशा चित्रपटाची निर्मिती का केली? असा प्रश्न सेन्सॉर बोर्डाच्या एका सदस्याने निर्मात्या किरण यांना विचारला. इतक्यावरच न थांबता दुसरा सदस्य म्हणाला की, अरे ही तर पँट-शर्ट घालते, ही स्त्री कशी असू शकते?’ सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांचे हे प्रश्न ऐकून सर्वच थक्क झाले.

‘निहलानी म्हणाले की तू नशीबवान आहेस की तुझ्या चित्रपटावर बंदी आणली नाही,’ असं कुशन नंदी यांनी पुढे सांगितलं. महिलेच्या कपड्यांवरून सेन्सॉर बोर्डाचे सदस्य टिप्पणी कसे काय करु शकतात हाच प्रश्न सध्या उपस्थित होतोय. ‘आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व घडताना सेन्सॉर बोर्डाच्याच एका स्त्री सदस्यानेही पँट-शर्ट घातलं होतं. कोणत्या मापदंडांच्या आधारावर त्यांनी माझ्या चित्रपटावर निर्णय घेतला असावा याची कल्पना आल्याने मी चकार शब्दही न काढता तेथून निघाले,’ असं किरण श्रॉफ यांनी सांगितलं.

वाचा : अर्वाच्च्य शब्दांत टीका करणाऱ्या भैरवी गोस्वामीला क्रितीचं सडेतोड उत्तर

या परिषदेत ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ चित्रपटाची दिग्दर्शिका अलंक्रिता श्रीवास्तवदेखील उपस्थित होती. ‘आपण स्वतंत्र देशात राहतो. सेन्सॉरशीपची आपल्याला गरज आहे असं मला वाटत नाही. लोकांना आम्ही मुक्तपणे आमच्या कथा सांगू शकणार नाही,’ असं मत अलंक्रिताने मांडलं. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटांचं रचनात्मक स्वातंत्र्यच हिरावून घेतल्याचं मत या पत्रकार परिषदेत दिग्दर्शकांनी मांडलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Babumoshai bandookbaaz producer kiran shroff insulted by cbfc members question how a woman can make such a film