आयुषमान खुरानाचा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बधाई हो’ सुपरहिट ठरला होता. समीक्षकांसह प्रेक्षकांनीही या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं होतं. २०१८ मधल्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश पहिल्या दहामध्ये होता. मात्र फिल्मफेअर पुरस्कारावरुन चित्रपटाच्या लेखकांमध्ये सध्या वाद सुरू आहे. हा वाद इतका शिगेला पोहोचला आहे की अखेर ‘बधाई हो’ च्या दोन लेखकांनी नामांकनामधून माघार घेतली आहे.

फिल्म फेअरच्या सर्वोत्कृष्ट मूळ कथा विभागातून या चित्रपटाला नामांकन मिळालं होतं, मात्र या नामांकनामधून शांतनु श्रीवास्तव आणि अक्षत घिल्डियाल यांनी माघार घेतली आहे. ट्विटरद्वारे आपण नामांकनामधून बाहेर पडत असल्याचं दोघांनी जाहीर केलं आहे. लेखिका ज्योती कपूर हिनं काहीदिवसांपूर्वी ‘बधाई हो’ ची कथा आपण लिहिली असल्याचा दावा केला होता. या चित्रपटाच्या कथेची मूळ संकल्पना आपली असल्याचा तिचा दावा होता.

मात्र फिल्मफेयरच्या नामांकनामधून आपलं नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आलं असा आरोप तिनं केला. आरोप प्रत्यारोप आणि वाद विदानंतर शांतनु आणि अक्षत या दोघांनीही स्वत:चं नाव वगळण्याचा निर्णय घेतला. ‘या चित्रपटाची कथा ज्या व्यक्तीनं लिहिलीच नाही अशा व्यक्तीसोबत पुरस्कार घेण्यापेक्षा तो न मिळालेलाच बरा’ असं शांतनूनं म्हटलं आहे. या चित्रपटाची कथा ज्योती कपूर नाही तर आपणच लिहिल्याचा दावा दोघांनी करत आणखी वाद होण्यापेक्षा नामांकनातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.