Badshah Marathi Rap Song Chimna release : प्रसिद्ध रॅपर बादशाह हा त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. एकीकडे घटस्फोट जाहीर केल्यानंतर दुसरीकडे बादशाहने मराठीमध्ये दमदार पदार्पण केले आहे. त्याचे पहिले मराठी ‘चिमणा’ रॅप साँग रिलीज झाले आहे.
बॉलीवूडमध्ये हिप हॉप गाण्यातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बादशाहने आता मराठी भाषेमध्ये रॅप केले आहे. बादशाहने पहिल्यांदाच मराठी हिप हॉप केले असून, त्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. त्याचे ‘चिमणा’ हे गाणे रिलीज झाले असून, त्यामध्ये त्याने महाराष्ट्राची संस्कृती दाखवून दिली आहे. त्यामध्ये कोल्हापूरची कुस्ती, महाराष्ट्राचे सण, लग्नाची हळद आणि मराठी उत्सव यांची सांगड घालण्यात आली आहे. बादशाहच्या ‘चिमणा’ या गाण्यामध्ये त्याची हिप-हॉप स्टाईल आणि महाराष्ट्राचे लोकसंगीत यांचा सुंदर मिलाफ दाखवण्यात आला आहे.
महाराष्ट्राबद्दल काय म्हणाला रॅपर बादशाह?
मराठीमध्ये पहिल्यांदाच रॅप साँग करीत पदार्पण केल्याबद्दल बादशाह म्हणाला, “भारताच्या विविध भागांतील तिथल्या मातीतील संगीत हा एक आपल्यासाठी खजिनाच आहे. मला आपल्या देशातील प्रत्येक कोपऱ्यातील संगीताचा आनंद घ्यायचा आहे. महाराष्ट्रामध्ये प्रचंड सर्जनशीलता असून, माझं ‘चिमणा’ हे गाणे त्यांच्यासाठी मी व्यक्त केलेले प्रेम आहे. हा प्रोजेक्ट ज्या पद्धतीने समोर आलाय, त्यासाठी सर्वांचा मी मनापासून खूपच आभारी आहे. माझ्या रॅपर होण्याच्या या प्रवासामध्ये माझ्याबरोबर कायम असलेल्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आणि चाहत्यांना हे चिमणा गाणे समर्पित आहे.”
‘चिमणा’ या गाण्यामध्ये बादशाहबरोबर मराठी अभिनेत्री नेहा खान हिचीही या व्हिडीओमध्ये झलक दिसली आहे. नववारीमध्ये तिने केलेल्या नृत्याने गाण्यामध्ये रंगत आणली आहे. त्याचबरोबर ‘चिमणा’ या गाण्यात दिव्या कुमार आणि मराठी लोककलाकार नागेश मोरवेकर यांनीही आवाज दिला आहे.
कोल्हापूरमध्ये झाले बादशाहच्या गाण्याचे शूटिंग
या गाण्याचे शूटिंग कोल्हापुरात झाले असून, त्यामध्ये तेथील लाल मातीच्या कुस्तीची परंपरा दाखवण्यात आली आहे. तसेच स्थानिक भागातील महिला, त्यांची जीवनशैली आणि संस्कृतीची झलकसुद्धा यामध्ये दिसून येत आहे. लग्नाच्या मिरवणुकीतील जल्लोषापासून, काम करणारे कामगार, तसेच पारंपरिक आखाड्यात कुस्तीचा सराव करणारे पैलवान, अशा अनेक महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या गोष्टी यामध्ये दाखवण्यात आल्या आहेत.
बादशाहने केली घटस्फोटाची घोषणा
दरम्यान, बादशाहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट शेअर करीत त्याच्या घटस्फोटाची घोषणा केली. बादशाहने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, “मी आणि ईशा रिखीने परस्पर संमतीनं वेगळं होण्याचा आणि आपापल्या मार्गानेंपुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय एकमेकांबद्दल आदर ठेवून घेण्यात आला आहे. या कठीण काळात प्रत्येकानं आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा, अशी विनंती करतो. ही आमची एकमेव प्रतिक्रिया असेल. आमच्या नात्याबद्दल यापुढे कोणतेही तर्कवितर्क किंवा अंदाज केले जाऊ नयेत, अशी आमची सर्वांना विनंती आहे.”
