प्रस्थापित व्यवस्था किंवा रूढ प्रथा-चालीरिती नाकारत नवी वाट स्वीकारणार्‍याला अनेकदा ‘बंडखोर’ म्हणून लेबल डकवलं जातं. कुटुंब व्यवस्थेत अर्थातच पुरुषांपेक्षा स्त्रियांसाठी जगण्याचे अलिखित असे काटेकोर नियम आहेत. आणि इथे शहरी-ग्रामीण, अशिक्षित-सुशिक्षित असा फरक अजिबात नाही. फारतर काही घरांत ‘तुला असं वागावंच लागेल…’ असं थेट सुनावलं जातं. तर बर्‍यापैकी सुशिक्षित, शहरी घरांमध्ये वेगवेगळ्या नात्यांची सय देऊन प्रेमाने स्वत:हून या गोष्टी स्त्रिया कशा करतील, हे पाहिलं जातं. स्त्रिया आता पुरुषांपेक्षा कमी नाहीत, त्या प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत आणि म्हणून त्यांना आता दुय्यम वागणूक दिलीच जात नाही, असं सरसकट मान्यता देण्याइतकीही चांगली परिस्थिती नाही, याची जाणीव महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘बंडखोर’ पाहताना येते. पुरुषप्रधान संस्कृतीत आजही ‘स्त्री’च्या अस्तित्त्वावर अनेक निर्बंध आहेत, हा कैक कलाकृतीतून आलेला विषय नव्याने मांडताना त्याचं फारच सुलभीकरण झालं असल्याने त्यातली ‘बंडखोरी’ची धार तितकी जाणवत नाही.
एकाच कुटुंबातील सहा स्त्रियांची गोष्ट ‘बंडखोर’ या चित्रपटात पाहायला मिळते. गोव्याची पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे, त्यामुळे एकत्र कुटुंब असलं तरी आर्थिक सुस्थिती आहे आणि काही प्रमाणात आधुनिकता-पुढारलेपणही आहे. असं असूनही जेव्हा घरातल्या स्त्रिया स्वत:साठी काही निर्णय घेऊ पाहतात, तेव्हा मात्र ही आधुनिकता फक्त भौतिक गोष्टींपुरती मर्यादित आहे हे लक्षात येतं. मुंबईत एका जाहिरात कंपनीत काम करणारी तरुण मीरा स्वभावाने थोडी तापट आहे, तिच्या कामात चोख आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे कामातली तडजोड तिला मान्य नाही. तिच्या कार्यालयातील साहेबापासून ते सहकार्‍यांपर्यंत सगळे तिच्या स्पष्टवक्तेपणाला घाबरतात. मात्र, तिचा प्रियकर नील तिच्या मोकळ्याढाकळ्या वागण्याचा गैरअर्थ काढत तिच्यावर संशय घेतो. प्रेमात आलेलं हे संयशाचं वादळ उलथवून लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या मीराला आजोबा वारल्यामुळे अचानक घरी गोव्यात परतावं लागतं. आणि मग खर्‍या अर्थाने तिला तिच्याच घरात आई, आजी, मामी, बहीण या सगळ्यांना स्वतंत्रपणे जगण्यासाठी काय किंमत मोजावी लागली आहे हे हळूहळू आकळत जातं.

मीराची आजी उषा ही या सहाजणींमधली खर्‍या अर्थाने लक्ष वेधून घेणारी अशी व्यक्तिरेखा आहे. पत्नी म्हणून नवर्‍याकडून आपल्याला मान, प्रेम मिळत नाही आहे हे लक्षात आल्यानंतर उषाने सासरच्यांपासून ते घरच्यांपर्यंत सगळ्यांना याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पदरी निराशा पडल्यानंतर आपल्या अटीशर्तींवर जगणार्‍या उषाने आपल्या घराशी कळत-नकळत जोडल्या गेलेल्या ्त्रिरयांना मात्र त्यांचा मान मिळेल, त्यांचे अधिकार जपले जातील, यासाठी खंबीरपणे प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे स्त्रिया जास्त शिकल्या की त्या डोक्यावर बसतात, म्हणणार्‍या आपल्या मुलालाही धाकात ठेवण्याचं काम मीराच्या या उषाआजीने हुशारीने केलेलं आहे. मीराची आई सीमा शिकलेली, स्वतंत्र विचार असलेली यशस्वी उद्योजिका आहे. तरीही प्रेमात पडून विवाहाचा निर्णय घेणार्‍या व्यवहारी सीमालाही नवर्‍याकडून फसवणूकच वाट्याला येते. शारदा ही तशी घराबाहेरची… पण, मीराच्या आजोबांच्या बाहेरख्याली वागणूकीची बळी ठरलेली स्त्री. तिला उषाने या घराशी जोडून घेतलं आहे. एका घटनेमुळे एकत्र आल्यानंतर एकमेकींना सांभाळून, समजून घेत पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न खूप महत्त्वाचा ठरतो. आपण चुकलो तरी सुधारणारं, आधार देणारं आपल्याबरोबर कोणीतरी आहे हा विश्वास त्यांच्यापैकी प्रत्येकीला स्वत:साठी निर्णय घेण्याचं आणि तो चुकला तरी त्याच्या परिणामांची जबाबदारी घेऊन पुढे जाण्याचं बळ देतो, हे इथे लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अधोरेखित केलं आहे.

‘बंडखोर’चं संवादलेखन हे इरावती कर्णिक आणि सिद्धार्थ साळवी दोघांनी केलेलं आहे. यातले संवाद हे शब्दबंबाळ नाहीत, ते उपदेश करत नाहीत, त्यामुळे सुसह्य ठरतात. अर्थात, चित्रपटातील प्रत्येक स्त्री व्यक्तिरेखा काहीएक विचारांनी बांधलेली आहे. त्यातही उषा, मीरा आणि सीमा या व्यक्तिरेखा लेखनात खूप छान उतरल्या आहेत. त्यातल्या त्यात शारदा ही व्यक्तिरेखा उभी करताना काही प्रमाणात तोच ठरीव साचा अधिक जाणवतो. प्रत्येक स्त्री ही खमकी असू शकत नाही. उषा किंवा मीरा या मुळातच निडर आहेत. पण, म्हणून आपल्या नातीला मनाविरोधात लग्न करावं लागतं आहे हे लक्षात येऊनही आजी विरोध करत नाही. जेव्हा नात स्वत:हून वडिलांना आपण काहीही झालं तरी लग्न करणार नाही हे सांगण्याचं धाडस करते, तेव्हा खर्‍या अर्थाने आजी तिच्या निर्णयाला पाठिंबा देते. एकमेकींना सतत आधार देणं म्हणजे एकप्रकारे त्यांना कमकुवत करण्यासारखं आहे. आपल्याला काय हवं आहे, काय करायचं आहे, याचं भान येणं आणि त्या अनुषंगाने भूमिका घेणं हे ज्याचं त्यालाच जमायला हवं. इथे स्त्री-पुरुष हा भेद उपयोगाचा नाही. या काही बारीकसारीक गोष्टींचे भान ठेवल्यामुळे ‘बंडखोर’ वेगळा ठरतो. मात्र, कथेची बांधणी करताना काही प्रमाणात तो एकांगी झाला आहे. यातल्या पुरुष व्यक्तिरेखा एकतर चांगल्या किंवा वाईट म्हणून समोर येतात. त्यामुळे चित्रपट बर्‍यापैकी एकीकडे झुकलेला वाटतो. दुसरं सगळेच आदर्शवत वाटावेत, असे निर्णय घेत पुढे जाणारी ही स्त्री पात्रं, त्यांच्याबरोबरच्या घटना या अगदी सहज-सोप्या असाव्यात अशा पद्धतीने पुढे जातात. अभिनयाच्या बाबतीत छाया कदम, प्रियदर्शिनी, मृणाल कुलकर्णी, तितिक्षा तावडे, पूजा कातुर्डे, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी आणि अगदी छोटेखानी भूमिकेतील रावी किशोर या प्रत्येक अभिनेत्रीने आपापलं पात्र उत्तम वठवलं आहे. मंगेश देसाईंनी साकारलेला मामा थोडी गंमत आणतो. मांजरेकर यांनी साकारलेली व्यक्तिरेखा या मेळ्यात अजिबात फिट बसत नाही. या चित्रपटात बरेच कच्चे दुवे आहेत, मात्र स्त्रीने स्वत:चे स्वत:साठी निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. समाज त्याला बंडखोरीचं लेबल देणारच, पण ते स्वत:साठी जगणं आहे हे सांगण्याचा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा प्रयत्न इथे उल्लेखनीय ठरतो.

दिग्दर्शक – महेश वामन मांजरेकर

कलाकार – छाया कदम, प्रियदर्शिनी इंदलकर, मृणाल कुलकर्णी, तितिक्षा तावडे, पूजा कातुर्डे, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, रावी किशोर, मंगेश देसाई, संकेत पाठक , सिद्धार्थ बोडके.