लोकसत्ता प्रतिनिधी

समलैंगिकता हा विषय मराठीत मोजक्या चांगल्या चित्रपटांमध्ये हाताळला गेला आहे. त्या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यशही मिळवलं आहे. त्यापलीकडे जात लिंगबदलाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक समीर तिवारी यांनी ‘बाप्या’ या चित्रपटातून केला आहे. स्त्रीच्या शरीरात अडकलेलं आपलं पुरुषमन ओळखून स्वत:त बदल घडवणाऱ्या शैलजाची गोष्ट या चित्रपटात आहे. हिंदीत ‘चंदीगढ करे आशिकी’ या अभिषेक कपूर दिग्दर्शित चित्रपटात एका पुरुषाने लिंगबदल करून स्वीकारलेल्या स्त्रीत्वाची गोष्ट पाहायला मिळाली होती, ‘बाप्या’मध्ये त्याच्या उलटा प्रवास आहे, अशी माहिती समीर तिवारी यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान दिली. चित्रपटातील मुख्य कलाकार अभिनेत्री राजश्री देशपांडे, अभिनेता गिरीश कुलकर्णी आणि निर्मात्या मुत्कल तेलंग यांनीही यावेळी चित्रपटाविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘बाप्या’ हा चित्रपट मराठीत योग्य वेळी येतो आहे, अशा शब्दांत या चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी आनंद व्यक्त केला.

‘गेल्या वर्षी ‘बाप्या’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं. त्यानंतर माझं कर्करोगाचं निदान झालं. वैयक्तिक आयुष्यात माझी स्तनाच्या कर्करोगाशी झुंज सुरू आहे, पण याच काळात एक लढवय्यी म्हणून मी एकंदरीतच आयुष्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकले’, असं राजश्री देशपांडे यांनी सांगितलं.

जवळच्या माणसांनी बदलाचं वास्तव स्वीकारायला हवं

तुमच्या जवळच्यांचा पाठिंबा असेल तर कुठलाही बदल सहज स्वीकारता येतो, हे सांगताना राजश्री यांनी स्वत:चा अनुभवही सांगितला. ‘प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संकटं येतात, तेव्हा त्याच्या आजूबाजूला असणारी त्याची जिवलग माणसं त्या परिस्थितीत कशी प्रतिक्रिया देतात हे खूप महत्त्वाचं असतं. माझ्या आजाराविषयी समजल्यानंतर माझ्या आईची प्रतिक्रिया काय असेल, ती या गोष्टीला सामोरी जाऊ शकेल का? हा विचार माझ्या मनात होता. कठीण प्रसंगात तुमच्या कुटुंबाने, तुमच्या माणसाने तुमच्याबरोबर खंबीरपणे उभं राहणं अधिक गरजेचं असतं. तसंच, या चित्रपटात शैलजालाही तिच्या अंतर्मनात सुरू असलेला कोलाहल तिच्या जवळची मंडळी समजून घेऊ शकतील का? हा प्रश्न आहे. आपण स्त्रीच्या शरीरात अडकलेलो एक पुरुष आहोत हे तिला पक्कं माहिती आहे, पण घरचे तिला समजून घेत नाहीत. अशा वेळी ती स्वत: पुरुष होण्याची तिची इच्छा पूर्ण करते आणि मग आपल्या लोकांना सामोरी जाते. या चित्रपटात तिच्यासाठी तिची आणि अन्याची मैत्री खूप महत्त्वाची ठरली आहे. हे वास्तव समाजाने स्वीकारायला हवं असेल तर त्यांना विविध माध्यमातून त्याबद्दल शिक्षित करणं, जागृत करणं गरजेचं आहे. ‘बाप्या’च्या माध्यमातून हे अधोरेखित करण्याबरोबरच नात्यांतली-मैत्रीतली ऊब, प्रेम तुम्हाला कुठल्याही अवघड गोष्टींमध्ये पुढे जाण्याचं बळ देतं हेही सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे’, असंही त्यांनी सांगितलं.

माझं उन्नयन होण्याची संधी मला दिसली…

‘बाप्या’ची पटकथा ऐकली तेव्हा माझं स्वत:चं उन्नयन होण्याची संधी मला त्यात दिसली,’ असं अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी सांगितलं. ‘आपल्याकडे इतकं अज्ञान भरलेलं आहे की आपण मोठं होऊन जाणिवांचं भान येईपर्यंत आपल्या आवडीनिवडी एकदम पक्क्या झालेल्या असतात, सतत भेदाभेद करणं सुरू होतं. मी जर पुरुष असेन, तर मला स्त्रियांच्या बाबतीत अनेक समस्या जाणवायला लागतात. त्यांना कमी लेखतो, उंच असलो तर मला ठेंगण्या माणसांबद्दल अडचण वाटते. हे चांगलं ते वाईट अशा पक्क्या धारणा, चाकोऱ्या मी बांधून घेतो. आणि त्याच्या पलीकडच्या विश्वाला नाकारत राहतो. माझ्यामध्ये तिरस्कार वाढत राहतो, कुठल्याही तऱ्हेने मनात प्रेम उमलत नाही. आणि मग असा मी जगत राहतो, प्रस्थापित होतो. आपला बव्हंशी समाज हा असा घडलेला आहे. या अशा परिस्थितीत कला ही एकमेव आहे जी तुमचं उन्नयन करते, तुमच्या मनाला टोचणी लावते’, असा विस्तृत विचार त्यांनी मांडला.

‘बाप्या’ या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे एका स्त्रीला देह बदलून पुरुष व्हावंसं वाटतं आहे. अशा पद्धतीने लिंगबदल करून जगणारी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत, आपल्याला ते दिसतं, पण आपण ते स्वीकारत नाही. आपण त्या गोष्टींचा तिरस्कार करतो, हे काहीतरी पाश्चिमात्त्य आहे, असं काही होत नसतं, असं आपण म्हणतो. पण, हे खरंतर आपलं अज्ञान आहे हेच आपल्याला मान्य नाही, या वास्तवाकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

नव्याची स्वीकृती नसते…

‘बाप्या’ चित्रपटातली भूमिका का करावीशी वाटली, याबद्दलचा अनुभव विस्ताराने सांगताना गिरीश कुलकर्णी यांनी ‘जो जे वांछिल तो ते पावो’, ‘हे विश्वचि माझे घर’ हा करुणाभाव जपणारी आपली परंपरा आहे, पण वास्तवात आपण तसं जगत नाही आहोत, या आपल्या समाजाच्या दुटप्पी वर्तनावर बोट ठेवलं. ‘या चित्रपटातला अन्या हाही याच समाजाचा प्रतिनिधी आहे. शैलजा पुरुष होऊन समोर येते, तेव्हा तोही पहिल्यांदा तिला नाकारतो, हेटाळणी करतो, तिथपासूनचा त्याचा प्रवास हा त्या आपल्या दोस्ताच्या पाठीशी उभं राहण्यापर्यंत होतो. माझं मैत्र हे तुमच्या शरीराशी नाही, तुमच्या आंतरिक अस्तित्वाशी माझं सहअस्तित्व आहे, तिथे काहीतरी धागा जोडला गेला आहे आणि ते प्रेम आहे, हे आपल्याला लक्षात आलं तर समाजातला विद्वेष कमी होत जाईल. हे सगळं अत्यंत सहज साधेपणाने, हसतखेळत एका कुटुंबाच्या गोष्टीतून सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक समीर तिवारी यांनी केला आहे’, असं त्यांनी सांगितलं.

‘नवं काही घडलं की आपण हा अंत…’

हा अंत म्हणून ओरड करत त्याचा तिरस्कार करतो. नव्याची स्वीकृती आमच्याकडे नाही. निव्वळ मला माहिती नाही म्हणून त्याचा तिरस्कार करणं योग्य नाही, आपण त्या विश्वात जाऊन त्याचा अनुभव घेतला पाहिजे. आता राजश्रीने जसा तिचा अनुभव सांगितला की ती त्या आजाराशी झुंजते आहे, पुढे काय होणार माहिती नाही, पण तिच्यापरीने ती लढते आहे. हा जो तिचा साक्षात अनुभव आहे तो तुम्हाला मान्य केलाच पाहिजे. तर हे सगळं सार मांडण्याचा प्रयत्न करणारी ही पटकथा माझ्या हातात पडली तेव्हा पहिल्यांदा मला हे आपल्याला जमेल का? अशी भीती वाटली. नंतर त्यावर दिग्दर्शकाबरोबर अनेक वेळा चर्चा झाल्या. या चित्रपटानिमित्ताने एकविचारी कलाकार एकत्र आले’, असा अनुभवही त्यांनी सांगितला.

स्वबळावर उभा राहिलेला सिनेमा

‘मी हिंदी आणि मराठी दोन्हीत पटकथा लिहिली होती. अनेक निर्मात्यांना भेटलो तेव्हा हिंदीतसुद्धा ही कथा उत्तम लिहिली गेली आहे, पण कथेतल्या व्यक्तिरेखा, त्यांचे संवाद यातला दमदारपणा मराठीत अधिक प्रभावीपणे जाणवतो आहे, असा अभिप्राय अनेकांकडून आला. त्यामुळे हा चित्रपट मराठीतच करायचा असा निर्णय आम्ही घेतला’, असं दिग्दर्शक समीर तिवारी यांनी सांगितलं, ‘तर या चित्रपटाची निर्मिती ही आम्ही स्वबळावर केली आहे,’ असं निर्मात्या मुत्कल तेलंग यांनी स्पष्ट केलं. ‘एका स्त्रीने तिच्यातली पुरुषत्वाची आस ओळखून लिंगबदल करत बदलाच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांची ही गोष्ट आहे. हा विषय वेगळा असल्याने त्याच्या निर्मितीसाठी कोणीच तयारी दाखवली नाही. पण, हा विषय खूप महत्त्वाचा आहे. माणुसकी जपायलाच हवी, असा आग्रह धरणारा हा चित्रपट समाजापर्यंत पोहोचायलाच हवा, हे आम्ही पक्कं ठरवलं होतं. त्यामुळे आम्ही स्वत:च त्यासाठीचं आर्थिक बळ उभं केलं आणि या सगळ्यात आम्हाला चित्रपटातील कलाकारांनी भरभक्कम पाठिंबा दिला’, असंही त्यांनी सांगितलं.