पु. ल. देशपांडे लिखित ‘बटाट्याची चाळ’ या अजरामर साहित्यकृतीतील ‘एक संगीतक’ या संकल्पनेला नव्या रंगमंचीय रूपात प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न ‘या इथे चाळ बटाट्याची’ या दोन अंकी आणि २१ कलाकारांसह गद्य संवादविरहित भव्य मराठी संगीतिकेतून करण्यात आला आहे. या संगीतिकेच्या शुभारंभाचे प्रयोग लवकरच रंगणार असून, मराठी रंगभूमीवरील हा एक वैशिष्ट्यपूर्ण संगीतप्रयोग ठरणार आहे.

पु. ल. देशपांडे यांनी सामान्य मराठी माणसांच्या जगण्यातील विनोद, आपुलकी, संघर्ष, नात्यांमधील ऊब आणि चाळ संस्कृतीचे जिवंत चित्र शब्दबद्ध केले. त्याच साहित्याचा आत्मा जपत, आजच्या पिढीशी संवाद साधणार्‍या नव्या संगीतभाषेत हे नाट्य रूपांतर साकारण्यात आले आहे. संवाद, गीत, संगीत आणि बहुपात्री रंगमंचीय मांडणी यांच्या माध्यमातून चाळीतील जीवनाचा हृदयस्पर्शी आणि रंजक पट या संगीतिकेत उलगडणार आहे. या संगीतिकेचे शुभारंभाचे प्रयोग एक ऑगस्ट रोजी दु. १२.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे आणि ८ ऑगस्ट रोजी सायं. ४ वाजता यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा, मुंबई येथे होणार आहेत.

‘या इथे चाळ बटाट्याची’ याचे मूळ लेखन व संगीत पु. ल. देशपांडे यांचे आहे. कार्यक्रमाची निर्मिती कपीश जोशी यांची असून दिग्दर्शन देवेंद्र भोमे, योगेश सप्रे यांचे आहे. संगीत दिग्दर्शन देवेंद्र भोमे यांचे असून नाट्यरूपांतर योगेश सप्रे यांचे आहे. पंढरीनाथ कांबळे, अजित परब, मिलिंद जोशी, आशुतोष मुंगळे, अंजली मराठे, शमिका भिडे, स्वरांगी मराठे, केतन पवार, वज्रांग आफळे, मधुरा आफळे, तन्वी परांजपे, इशिता सावळे, साक्षी देशपांडे अशी दमदार कलाकारांची फळी या कार्यक्रमातून आपल्या भेटीस येणार आहे. वाद्यवृंद कलाकारांमध्ये मंदार बगाडे, ओमकार जोशी, सई जोशी, सिद्धी देशपांडे, तनिष्का जोशी, दीप वैद्य, स्वप्निल कुंभार, केदार जाधव यांची उत्तम साथ मिळणार आहे.

नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाशयोजना सुजय भडकमकर, वेशभूषा गायत्री चक्रदेव, नृत्य रचना मधुरा आफळे, निर्मिती सूत्रधार नितीन नाईक, पराग पब्लिसिटी तर सूत्रधार मयूर वैद्य आहेत. पारंपरिक मराठी संगीत रंगभूमीचा वारसा आणि आधुनिक रंगभाषेचा संगम घडविण्याचा प्रयत्न या निर्मितीत करण्यात आला असून, पु. ल. देशपांडे यांचे साहित्य, संगीत, नाटक यांवर प्रेम करणार्‍या रसिकांसह नव्या पिढीलाही ही संगीतिका एका वेगळ्या अनुभवाची मेजवानी ठरेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.