हॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक जोएल शूमाकर यांचं निधन झालं आहे. ते ८० वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते कर्करोगामुळे त्रस्त होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जोएल शूमाकर यांच्या निधनामुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

जोएल शूमाकर यांनी वेशभूषाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. परंतु चित्रपट निर्मितीकडे त्यांचा कल अधिक होता. १९७६ साली ‘स्पार्कल’ या चित्रपटातून त्यांनी सिनेनिर्मिती क्षेत्रात पाउल ठेवले. या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली होती. ७०च्या दशकातील सुपरहिट चित्रपट म्हणून आजही ‘स्पार्कल’चं कौतुक केलं जातं. त्यानंतर १८८१ साली ‘द इन्क्रेडिबल श्रिकिंग वुमन’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या दिग्दर्शनाचा प्रवास सुरु केला होता.

जोएल शूमाकर यांना ‘बॅटमॅन’ या सुपरहिरोपटासाठी प्रामुख्याने आळखले जाते. त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘बॅटमॅन अँड रॉबिन्स’ व ‘बॅटमॅन फॉरएव्हर’ हे दोन चित्रपट प्रचंड गाजले होते. याशिवाय ‘फोन बुथ’, ‘द क्लायंट’, ‘अ टाईम टू किल’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. जोएल शूमाकर यांच्या निधनामुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाव्दारे श्रद्धांजली अर्पण केली आहे.