‘बटवारा १९४७’ या नावातच दिग्दर्शकाने चित्रपटाचा विषय स्पष्टपणे सांगितला आहे. फाळणीचं दु:ख, एकाच देशाचे दोन तुकडे होऊन मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद अनुभवण्याआधीच नव्याने आखल्या गेलेल्या सीमेपलीकडच्या आणि अलीकडच्या माणसांच्या आयुष्यात जे घडलं ते अनपेक्षित आणि भयंकर होतं. त्याचे ओरखडे भारतीयांच्या मनात आजही आहेत. ज्यांनी ते दु:ख भोगलं, त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत ते झिरपलं आहे. साहित्य-कला-संस्कृती सगळ्यात उतरूनही हा विषय पुरून उरला आहे. दरवेळी कुठल्या ना कुठल्या कलाकृतीतून समोर येणारं फाळणीचं हे वास्तव पुन्हा पुन्हा त्यावेळी भरडून निघालेल्यांच्या वेदनांशी आपल्याला जोडून घेत राहातं. फाळणीचा हा अनुबंध केवळ भूतकाळात डोकावण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तो कुठेतरी पुन्हा वर्तमानातही वैचारिक, सामाजिक पातळीवर पुन्हा जोडू पाहणारा आहे, भूमिका घेण्यासाठी प्रवृत्त करणारा आहे, ही जाणीव ‘बटवारा १९४७’ पाहताना तीव्रतेने होते.

फाळणीच्या वेळी घडलेल्या घटनांचे पडसाद किती आणि कशा प्रकारे उमटले असतील, या घटनांच्या मुळाशी जात विचार करायला लावण्याचा प्रभावी प्रयत्न नुकताच इम्तियाज अलीच्या ‘मै वापस आऊंगा’ या चित्रपटातून आपण अनुभवलेला आहे. ‘बटवारा १९४७’ हा वरवर पाहता त्यावेळी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने काही मुद्दे समोर ठेवत असला, तरी त्याआधारे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मांडलेले विषय हे वर्तमानातील घटनांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत. जात-धर्म माणसाकडे जन्माने येते, मात्र धर्माचं पालन म्हणजे काय? अमूक एक विचार मला पटत नसेल आणि दुसऱ्या धर्मातील शिकवण, विचार महत्त्वाचे असतील तर तो स्वीकारण्याचं स्वातंत्र्य आज आपल्याला आहे. पण, हे वैयक्तिक स्वातंत्र्य, मूल्यं, तत्त्व यांचा आदर न करता त्यावर हल्ला चढवत धर्माचं राजकारण करू पाहणारे तेव्हाही होते, आजही आहेत आणि भविष्यातही असणार आहेत. हे राजकारण, सत्ताकारण केवळ सीमेवर लढून थोपवलं जाऊ शकत नाही. कुठल्याही विसंवादाला तोंड देताना, मानवतावादी दृष्टिकोन, सर्वांच्या हिताचा विचार महत्त्वाचा असतो. आणि म्हणून माणुसकी हाच धर्म सगळ्यापेक्षा मोठा… हा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न राजकुमार संतोषी यांनी केला आहे. हिंदीत व्यावसायिक चित्रपटांच्या मुख्य प्रवाहात राहून सातत्याने काही एक सामाजिक, कौटुंबिक विषय मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकुमार संतोषी यांच्यासारख्या दिग्दर्शकाला फाळणी या विषयाने का खुणावलं असेल? हे जाणून घेण्याची उत्सुकता हे ‘बटवारा १९४७’ चित्रपट पाहण्यामागचं एक मुख्य कारण. त्यात पुन्हा संतोषींच्या या चित्रपटाची निर्मिती आमिर खान प्रॉडक्शनने केली आहे. आतापर्यंत दिग्दर्शक-कलाकार म्हणून कुठलाही सहभाग नसताना, फार कमी चित्रपटांच्या निर्मितीत आमिरने सहभाग घेतला आहे. शिवाय, इतक्या वर्षांनी राजकुमार संतोषी आणि अभिनेता सनी देओल ही यशस्वी जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. या विविध ठळक बाबींमुळे ‘बटवारा १९४७’ हा चित्रपट उल्लेखनीय ठरतो.

या चित्रपटाची कथा असगर वजाहत यांच्या ‘जिस लाहौर नई देख्या ओ जम्याइ नई’ या प्रसिद्ध नाटकावर बेतलेली आहे. त्यावर पटकथेचे संस्कार आणि संवाद लेखन दोन्ही राजकुमार संतोषी यांनी केलेले आहेत. शिवाय, दिग्दर्शनही त्यांचंच आहे. त्यामुळे त्यांच्या मांडणीचा प्रभाव स्पष्टपणे चित्रपटावर जाणवतो. देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधीचे काही महत्त्वाचे दिवस… भारत-पाकिस्तान फाळणी होऊन भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं… पण, त्यामुळे हिंदू-मुस्लीम दंगे भडकू लागल्याच्या चर्चांनीही जोर धरला. भारतातील मुसलमानांना आपलं घरदार सोडून पाकिस्तानमध्ये जावंच लागेल, नाहीतर त्यांच्या जिवाला धोका आहे, ही भीती सर्वदूर पोहोचली. मेरठमधल्या मुसलमान कुटुंबांमध्येही भीतीचा हा वणवा पोहोचला. तिथेच राहणाऱ्या सिकंदर मिर्झा यांच्यासारख्या मुसलमान तरुणांना इच्छा नसतानाही घरदार सोडून पाकिस्तानात जावं लागलं. सिकंदर कुटुंबासह पहिल्यांदा लाहौरच्या निर्वासितांच्या छावणीत पोहोचला आणि महिनाभर हरएक प्रयत्न केल्यानंतर तेथील दुर्गावती निवास नावाची हवेली त्यांना राहण्यासाठी देण्यात आली. सिकंदर आणि कुटुंबाला राहण्यासाठी घर मिळालं, पण नियतीने आणखी एक संघर्ष त्यांच्यासमोर वाढून ठेवला. या हवेलीची वयोवृद्ध मालकीण दुर्गा तिथेच राहात होती, तिने घर सोडण्यास नकार दिला. एका मुसलमानाच्या घरात एक हिंदू स्त्री राहणं शक्य नाही. तिला ताबडतोब भारतात पाठवा, असा कल्ला धर्मांध व्यक्तींनी सुरू केल्यानंतर सिकंदरच्या मनात आणि घरात उठलेलं वादळ, त्यावर त्याने घेतलेली भूमिका, त्यासाठी त्याला करावा लागलेला संघर्ष असा एकेक घटनाक्रम पुढे नेत राजकुमार संतोषी यांनी चित्रपटाची मांडणी केली आहे.

चित्रपटाची कथा तशी एकरेषीय आहे. फार अनपेक्षित वळणं नाहीत की भूत-वर्तमान काळाचा मागे-पुढे चालणारा खेळही यात फारसा नाही. मात्र, संवाद आणि काही प्रसंगांच्या आधारे संतोषी यांनी आपले मुद्दे स्पष्टपणे प्रेक्षकांसमोर ठेवले आहेत. धर्मनिरपेक्षता आणि मानवतावादी दृष्टिकोन या धारणांना केंद्रस्थानी ठेवत त्यांनी प्रसंगांची रचना केलेली आहे, पण अर्थात त्यांंची दिग्दर्शन शैली अजूनही त्यांच्या नव्वदच्या चित्रपटांप्रमाणेच आहे. त्यामुळे गरज नसतानाही नायक म्हणून सनी देओल यांनी साकारलेला सिकंदर चार-पाच माणसांना अंगावर घेत सहज जमिनीवर लोळवतो. नायकाला त्याचा सात्त्विक संताप व्यक्त करण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता असते, त्यामुळे सनी देओल शैलीतील हाणामारी यात आहे. भावनिक नाट्य वाढवण्याच्या दृष्टीने केलेली प्रसंग मांडणी, पैसे वसूल संवाद हे सगळं यात आहे. दिग्दर्शनाची ही परिचित आणि ठोकळेबाज शैली ‘बटवारा १९४७’च्या अतिशय संवेदनशील विषयाच्या मांडणीला मारक ठरली आहे. सनी देओल यांनी साकारलेला सिकंदर हा अगदी ‘गदर’ माजवत नसला, तरी तो फार वेगळा वाटत नाही. प्रीती झिंटाची भूमिकाही यथातथाच. त्यातल्या त्यात माईची भूमिका अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यांच्या सहज अभिनयाने पेलून धरली आहे. अली फजलची भूमिका त्यातल्या त्यात वेगळी आहे, पण त्याला फार वाव नाही. त्यातल्या त्यात संतोषी यांची मांडणी बटबटीत नाही आणि मूळ नाटकातले मुद्दे हे वर्तमानातही चपखल लागू होत असल्याने या चित्रपटाकडे पूर्ण दुर्लक्ष करता येत नाही इतकेच…

दिग्दर्शक – राजकुमार संतोषी

कलाकार – सनी देओल, शबाना आझमी, प्रीती झिंटा, अली फजल, करण देओल आणि अभिमन्यू सिंग.