‘बेगम जान’नंतर अभिनेत्री पल्लवी शारदाचे हॉलिवूडमध्ये पदार्पण?

पल्लवी शारदाचा बॉलिवूड प्रवास फारसा लक्षवेधी नाही.

अभिनेत्री पल्लवी शारदा

बॉलिवूडची हरहुन्नरी अभिनेत्री विद्या बालनच्या आगामी ‘बेगम जान’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे अभिनेत्री पल्लवी शारदा चांगलीच आनंदी आहे. या चित्रपटात तिला विद्यासोबतच अभिनेता नसिरुद्दीन शाह तसेच अन्य दिग्गज कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली आहे. बॉलिवू़डमध्ये तिने यापूर्वी अनेक चित्रपटात काम केले असले, तरी तिच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळालेले नाही. मात्र, तिच्या अभिनयाला दाद देत ‘बेगम जान’च्या निर्मात्यांनी तिला महत्त्वाची भूमिका दिली आहे. या चित्रपटात पल्लवी वेश्या व्यवसाय करणाऱ्या गुलाबो नावाच्या महिलेची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये रंगणाऱ्या चर्चेनुसार, या चित्रपटानंतर पल्लवी हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पल्लवी किंवा हॉलिवूड टेलिव्हिजन क्षेत्रातून या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. मात्र, हे वृत्त खरे ठरल्यास देसी गर्ल प्रियांकानंतर हॉलिवूडच्या मालिकेत ठसा उमटविणारी पल्लवी बॉलिवूडमधील दुसरी अभिनेत्री ठरेल. यापूर्वी प्रियांका चोप्राने बॉलिवूडमधील कामगिरीच्या जोरावर अमेरिकन टेलिव्हिजनवर लोकप्रिय असणाऱ्या ‘क्वांटिको’ मालिकेतून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या मालिकेनंतर प्रियांकाचा ‘बेवॉच’ या हॉलिवूड चित्रपटात वर्णी लागली आहे.
प्रियांकाचा हा यशाचा प्रवास पल्लवीच्या वाट्याला येणार का? हे वेळ आल्यावरच कळेल, मात्र सध्याच्या घडीला रंगणारी चर्चा तिच्यासाठी आनंददायी अशीच आहे.

पल्लवी शारदाचा यापूर्वीचा बॉलिवूड प्रवास फारसा लक्षवेधी राहिलेला नाही. तिने करण जोहरच्या ‘माय नेम इज खान’ चित्रपटात काम केले होते. अभिनय क्षेत्राच्या आवडीमुळे ऑस्ट्रेलियाहून मुंबई आल्यानंतर तिने रणबीर कपूरबरोबर ‘बेशरम’ आणि आयुषमान खुरानाबरोबर ‘हवाईजादा’ असे दोन मोठे चित्रपट केले आहेत. पण या चित्रपटामुळे तिच्या कारकिर्दीला फारशी गती मिळाली नव्हती. त्यामुळे या प्रवासात ती आयपीएलच्या सामन्यांवेळी ‘सोनी पिक्चर्स नेटवर्क’च्या ‘एक्स्ट्रा इनिंग्ज’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना देखील दिसली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Begum jaan actress pallavi sharda hollywood tv debut after priyanka chopra