हरहुन्नरी अभिनेत्री विद्या बालनचा बहुचर्चित ‘बेगम जान’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. श्रीजीत मुखर्जी दिग्दर्शित विद्याचा हा चित्रपट भारतातील ९००-११०० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला असून प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने सरासरी कमाई केल्याचे दिसते. या चित्रपटाच्या मिळालेल्या प्रतिसादानुसार, हा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ४ ते ५ कोटी कमाई करण्याचा अंदाज बॉलिवूड वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.

व्यापार विश्लेषक अक्षय राठी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेसला’ दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट देशभरातील १५५० चित्रपटगृहातील जवळपास ११०० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला. पहिल्या दिवशी चित्रपट ३.५ ते ४ कोटींपर्यंत कमाई करेल, असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. सुट्टीच्या दिवसांमध्ये चित्रपटाच्या कमाईचा आकडा १० ते ११ कोटींपर्यंत पोहोचेल, असेही ते म्हणाले. श्रीजीत मुखर्जीं दिग्दर्शित ‘बेगम जान’ हा चित्रपट केवळ १४ ते १५ कोटी इतक्या कमी बजेटमध्ये बनविण्यात आला असून चित्रपटातील गाणी आणि सेटलाइट हक्काच्या विक्रितून चित्रपटाच्या बजेटपैकी अर्धी रक्कम वसूल झाली आहे.  दरम्यान, याच आठवड्यात हॉलिवूडचा ‘फ्युरिअस ८’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे या चित्रपटाता फटका विद्याच्या चित्रपटाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हॉलिवूडचा हा चित्रपट भारतामध्ये चांगली कमाई करत असल्याचे ट्विट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी केले आहे.

विद्याने या चित्रपटात कुंटनखाण्यातील मालकिणीची भूमिका साकारली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील फाळणीच्यावेळी सीमारेषेवर असणाऱ्या कुंटणखान्यातील ११ महिलांनी केलेला संघर्ष या चित्रपटातून मांडला आहे. चित्रपटातील भूमिकेबद्दल विद्या इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाली, ‘या चित्रपटातील थप्पड मारण्याचा प्रसंग हा माझ्यासाठी फारच कठीण होता. चित्रपटात एका मुलीला मी सलग थप्पड मारल्या आहेत. मी मारलेल्या थप्पडमुळे तिचा गाल सुजला होता. मी आतापर्यंत कधीही कोणाला इतके मारले नव्हते’, चित्रीकरणानंतर मी तिची विचारपुस देखील केल्याचे विद्या म्हणाली. चित्रपटामध्ये शबनम नावाचे पात्र साकारणारी इंद्राणी चक्रवर्तीला ज्यावेळी कुंटणखान्यात आणले जाते. तेव्हा तिच्यावर झालेल्या अत्याचारामुळे ती अस्थिर झालेली असते. तेव्हा विद्याने तिला शुद्धीवर आणण्यासाठी थप्पड मारल्याचे पाहायला मिळते.