scorecardresearch

Premium

बीइंग अ मदर..

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला गेली तीन-साडेतीन वर्षे ‘बीइंग अ मदर..’ हे लेबल चिकटलेलं आहे.

बीइंग अ मदर..

‘बीइंग ह्य़ुमन’ हे लेबल जसं सलमानला चिकटलं आहे तसं बॉलीवूडची सुंदर आणि बुद्धिमान अभिनेत्री म्हणून जगभर कीर्ती मिळवणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला गेली तीन-साडेतीन वर्षे ‘बीइंग अ मदर..’ हे लेबल चिकटलेलं आहे. ‘जझबा’ या चित्रपटातून ती जवळपास पाच वर्षांनी मोठय़ा पडद्यावर झळकणार आहे. भन्साळींच्या ‘गुजारिश’ या चित्रपटानंतर मातृत्वामुळे तिने चित्रपट कारकीर्दीला स्वल्पविराम दिला होता. आता तिची मुलगी आराध्या थोडी मोठी झाली असल्यामुळे तिने कारकीर्दीला दिलेला ‘स्व’ल्पविराम काढून टाकून जोरदार सुरुवात केली आहे. पण, मधल्या काळात आराध्याच्या जन्मापासून आत्तापर्यंत प्राधान्याने तिच्याचबरोबर राहताना, जगताना तिच्यातली ‘आई’ अभिनेत्रीपेक्षाही वरचढ झाली आहे. त्यामुळे, ‘जझबा’बद्दलच्या गप्पांची सुरुवात ‘बीइंग अ मदर..’ अशी झाल्यानंतर तब्बल दहा मिनिटं ऐश्वर्या ‘आराध्या’मय झाली होती.

आराध्याला सांभाळून काम करणं ही मोठी कसरत आहे, पण त्यात वेगळं काही नाही. तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना सांभाळून पत्रकारिता करता ना, उशिरा घरी जाता, रात्रीच त्यांच्या सकाळच्या खाण्यापासून ते शाळेपर्यंतच्या कित्येक गोष्टींची तयारी करता. आराध्याच्या जन्मानंतर ती जशी मोठी होत आहे तसं मीही इतर काम करणाऱ्या अनेक महिलांप्रमाणे स्वत:ला या नव्या वेळापत्रकात बसवून घेतलं आहे, असं ऐश्वर्या सांगते. मला माझ्या आईवडिलांनी इतर चारचौघांप्रमाणेच लहानाचं मोठं केलं. आता माझ्या मुलीलाही त्याच पद्धतीने मला वाढवायचं आहे. त्यामुळे तिचा जन्म झाल्यानंतर तिची प्रत्येक लहानसहान कामं मी स्वत: केली, अजूनही स्वत:च करते. ‘जझबा’चं चित्रीकरण सुरू झाल्यानंतर आता मी एकदम रोज ‘ऑफिस’ला जाणाऱ्या महिलांप्रमाणे वागू लागले आहे. दुसऱ्या दिवशी माझं चित्रीकरण कुठे आहे? किती वाजता आहे? मग आराध्याला मी बरोबर नेऊ शकते का? या सगळ्याचा विचार करून आदल्या रात्रीच मी तिची बॅग भरून ठेवते. चित्रीकरणाच्या मधल्या वेळात मला तिला काय शिकवायचं आहे? अभ्यास घ्यायचा असेल तर तिची पुस्तकं -वह्य़ासुद्धा बॅगमध्ये भरते. मग आमच्या दोघींचा एकत्र दिवस सुरू होतो, असं ऐश्वर्याने सांगितलं.

rajveer deol
‘प्रादेशिक चित्रपट बोलके असतात’
Kapil sharma Hima Qureshi Hina Khan
अभिनेता कपिल शर्मासह तीन कलाकारांना समन्स
Rang Maza Vegla fame actress vidisha mhaskar
‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीनं दिली आनंदाची बातमी; म्हणाली, “तुमचा विश्वास…”
Sonali Kulkarnis ganpati bappa
पिंपरी: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन

गेल्या पाच वर्षांमध्ये हिंदी चित्रपटांमध्ये काही बदल झाले आहेत असं तिला वाटत नाही. मुळात, पाच वर्षे ती इंडस्ट्रीपासून दूर होती हेच तिला मान्य नाही. ‘गुजारिश’नंतर ती मधुर भांडारकरचा ‘हिरॉईन’ करणार होती. त्यासाठी ती ‘कान’मध्ये जाऊन प्रतिनिधित्वही करून आली. मग ती गर्भवती आहे हे कळल्यानंतर मधुर भांडारकर यांनी ऐश्वर्याऐवजी करीनाला घेऊन तो चित्रपट पूर्ण केला. पण, तोपर्यंत मी काम करतच होते. आराध्या तीन वर्षांची होईपर्यंतसुद्धा मी जाहिराती, माझं सामाजिक कार्य, ‘कान’ महोत्सव अशा विविध गोष्टींच्या निमित्ताने कायम लोकांसमोर होते, माध्यमांसमोर होते. ती तीन वर्षांची झाल्यानंतर मी चित्रपटांविषयी विचार सुरू केला. प्रत्यक्षात ‘जझबा’ पडद्यावर येईपर्यंत मधली दोन वर्षे गेल्याने सगळ्यांनी पाच वर्षांनंतर पुनरागमन वगैरे चर्चा सुरू केली आहे. पण, त्यात तथ्य नाही. माझं काम कुठेही थांबलेलं नाही, असं ती स्पष्ट करते. या दरम्यान, चित्रपटांचा ट्रेंड बदलला आहे, असं आपल्याला वाटत नाही. मुळात, ट्रेंड वगैरे गोष्टींवर विश्वास नसल्याचे तिचे म्हणणे आहे. चांगली कथा, चांगल्या पद्धतीने मांडली तर चित्रपट यशस्वी होतोच. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट येतात. त्यामुळे ठरावीक प्रकारचे चित्रपट येतात, ते चालतात असं काही मानायचं कारण नाही. एकच गोष्ट चांगली झाली आहे ती म्हणजे प्रत्येक चित्रपटाचं त्याच्या विषयानुसार, त्याच्या बजेटनुसार आणि कुवतीनुसार आर्थिक नियोजन केलं जातं. प्रसिद्धी-वितरण या सगळ्या गोष्टी इतक्या योजनाबद्ध रीतीने पार पडतात की प्रत्येक चित्रपटाच्या निर्मात्याला त्याने गुंतवलेले पैसे परत मिळतात. नफा किती मिळतो?, या वेगळ्या गोष्टी आहेत. पण, गुंतवलेले पैसे सहसा बुडत नाहीत. कलाकारांनाही मग ते छोटे असतील किंवा मोठे त्यांना त्यांचे पैसे मिळतात. प्रत्येकजण इंडस्ट्रीत मानाने काम करू शकतो, हा बदल इंडस्ट्रीच्या दृष्टीने खूप चांगला असल्याचे तिने सांगितले.

अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लौकिक मिळाल्यानंतर पुनरागमनासाठी चित्रपट निवडताना अमुक एक निकष असावा लागतो का?, असं विचारल्यावर तुम्ही याला पुनरागमन म्हणतच असाल तर काहीतरी नवं करून पाहण्याचा हा प्रयत्न आहे, असं म्हणूयात. कलाकार म्हणून नवं काही करावं, आव्हानात्मक भूमिका करावी ही प्रत्येक कलाकाराची भूक असते. मग त्याच्या कारकीर्दीत गॅप पडो वा न पडो. त्याने फारसा फरक पडत नाही. ‘धूम २’ करताना मी ‘चोखेरबाली’ केला, ‘रेनकोट’ केला ते काही ते चित्रपट खूप वेगळे आहेत, मला नाव मिळवून देतील, असा काही विचार करून केलेले नाहीत, असं ती सांगते. ‘चोखेरबाली’ची कथा वेगळी आहे. अशी भूमिका वारंवार करायला मिळत नाही. त्या वेळी त्या चित्रपटाने जी काही कमाई करायची होती ती केली. कोटींच्या क्लबमध्ये ते गेले नसतील पण, त्यामुळे ते वाईट चित्रपट होते, असं कोणी म्हणू शकत नाही ना.. वेगळ्या वाटेने जाऊ पाहणाऱ्या, वेगळी मांडणी असलेल्या चित्रपटांचा भाग असणं हे खूप वेगळं समाधान असतं. त्या वेळी ‘चोखेरबाली’ अनेकांनी पाहिला नसेल, पण, त्याला जो सन्मान मिळाला तो आजही कायम आहे. एक कलाकार म्हणून असे कुठल्याही चौकटीत न बसणारे अभिजात चित्रपट नावावर असणं ही त्या कलाकाराची संपत्ती असते. ती माझ्याकडे आहे याचा मला अभिमान आहे, असं ऐश्वर्या म्हणते तेव्हा आजवर व्यावसायिक चित्रपटांवरची तिची आघाडी, त्याच वेळी जाहिराती-सामाजिक कार्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा तिचा लौकिक तिने किती हुशारीने सांभाळला आहे, हे जाणवल्याशिवाय राहात नाही. एवढय़ा वर्षांच्या कारकीर्दीत मला अनेक वेळा वेगवेगळ्या चौकटीत बसवून मी कशी योग्य नाही, अशा टीकेची धनी बनवण्यात आलं आहे. पण, अनुभवाने शिकत शिकत पुढे जाणं हाच योग्य मार्ग आहे. बदल हा अचानक घडून येत नाही. आपण सगळेच त्या प्रक्रियेचा भाग आहोत त्यामुळे हे बदल आपल्या एकत्रित प्रयत्नांतूनच शक्य आहेत, असे ती पुन्हा पुन्हा सांगते.

आराध्याची ‘ऑफिस मॉम’

आराध्या आता बऱ्यापैकी मोठी झाली आहे. त्यामुळे अभिनेत्री म्हणून तू चित्रपटांमध्ये काम करतेस हे तिला जाणवतंय का?, यावर तिला बऱ्याच गोष्टी कळतात. पण, सध्या तरी केवळ चित्रीकरणासाठी मी बाहेर पडत नाही, कधी नुसतीच मीटिंग असते, कधी पटकथा वाचन किंवा प्रमोशन..अशा प्रत्येक वेळी बाहेर पडताना मी तिला ऑफिसमध्ये चालले आहे असं सांगून बाहेर पडते. मग त्यातही ‘बस ऑफिस’ (तिची व्हॅनिटी व्हॅन) किंवा ‘जनक ऑफिस’ असे तिचे दोन प्रश्न असतात. यातला कुठलाही पर्याय असला तरी सध्या मी तिच्यासाठी ऑफिसला जाणारी मॉम आहे, असं ऐश्वर्या सांगते. मातृत्व आणि अभिनेत्री या दोन गोष्टी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र, या दोन्ही बाबतींत आपण नशीबवान आहोत, कारण योग्य वेळी त्या त्या गोष्टी आपल्या आयुष्यात सहज घडत गेल्या असं ऐश्वर्याला वाटतं. पाच वर्षांनंतर पुन्हा चित्रपट करताना (याला तुम्ही कितीही म्हणत असलात तरी मी पुनरागमन म्हणणार नाही) ‘जझबा’सारखा चांगला चित्रपट माझ्या हातात होता. त्याहीआधी खरंतर मणीसरांच्या (मणीरत्नम) चित्रपटाने मी कामाला सुरुवात करणार होते. त्यांच्याबरोबरच्या चर्चेत दीड वर्ष निघून गेलं. त्या दरम्यान, दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी पटकथा माझ्या हातात ठेवली. इतकी चांगली कथा आणि कलाकार यांच्याबरोबर काम करायची संधी होती. त्यामुळे ‘जझबा’ हा खरोखरच माझ्या कारकीर्दीतलाही वेगळा चित्रपट आहे, असं ती म्हणते. या चित्रपटात तिने वकिलाची भूमिका केली आहे. तिच्याबरोबर इरफान खान, शबाना आझमी, अतुल कुलकर्णीसारखे दमदार कलाकार आहेत. चित्रपटाची कथाही दमदार आहे, तो अ‍ॅक्शनपट आहे आणि त्यात नायिका मध्यवर्ती भूमिकेत आहे, असे चित्रपट संजय गुप्तासारखे दिग्दर्शकच देऊ शकतात ही कौतुकाची पावती खुद्द शबाना आझमी यांनी दिली आहे. त्यामुळे आपली मेहनत योग्य ठिकाणी आहे हा विश्वासही दुणावल्याचे ऐश्वर्याने सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Being a mother

First published on: 04-10-2015 at 00:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×