लोकप्रिय मॉडेल आणि बंगाली टीव्ही अभिनेत्री जूही सेनगुप्तासोबत गैरवर्तनाचा प्रकार घडला आहे. जूहीने सोशल मीडियाद्वारे घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. कोलकात्यामधील एका पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांने गैरवर्तन केले असल्याचे तिने व्हिडीओमध्ये सांगितले आहे. जूहीने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

जूहीने हा व्हिडीओ फेसबूकद्वारे शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये जूहीने तिच्या कुटुंबीयांसोबत देखील कर्मचाऱ्यांने गैरवर्तन केल्याचे सांगितले आहे. जूही तिच्या कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर पोहोचली होती. त्यावेळी तिचे आई आणि वडिलदेखील तिच्या सोबत होते. जूहीने १५०० रुपयांचे पेट्रोल गाडीमध्ये भरण्यास सांगितले. परंतु त्याने १५०० रुपयांचे पेट्रोल भरण्याऐवजी ३००० रुपयांचे पेट्रोल भरले. जूहीने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला त्याने तिच्या परवानगी शिवाय ३००० रुपयांचे पेट्रोल का भरले असा प्रश्न विचारला. त्यावर त्या कर्मचाऱ्याने शांत उत्तर देण्याऐवजी गैरवर्तन करण्यास सुरुवात केल्याचे जूहीने सांगितले.

त्यातील एका कर्मचाऱ्याने जूहीच्या गाडीची चावी काढून घेतली. जूहीने त्यांला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या कर्मचाऱ्याने कोणताही विचार न करता तिला धक्का दिला आणि तिच्या कुटुंबीयांसोबतही गैरवर्तन केले. या झटापटीमध्ये जुहीच्या हाताला मार लागला. त्यानंतर जूहीने कस्बा पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली.

‘मी त्या पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला त्याने जास्त पेट्रोल का भरले असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने चुकून भरल्याचे सांगितले. पण त्याने माझ्याकडे जास्त भरलेल्या पेट्रोलचे पैसे मागितले. माझ्या वडिलांनी ते देण्यास नकार दिला तर त्याने गैरवर्तन करण्यास सुरुवात केली’ असे जूहीने पीटीआयसह बोलताना म्हटले.