क्राइम-थ्रिलर या धाटणीच्या कलाकृतींचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेक जण वीकेंडला पाहण्यासाठी या जॉनरचे चित्रपट, सीरिजच्या शोधात असतात. या वीकेंडला अशा कलाकृती पाहायचं तुम्हीसुद्धा ठरवलं असेल आणि अशा चित्रपटांच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला अशा काही क्राइम थ्रिलर जॉनरच्या चित्रपटांबद्दल सांगणार आहोत ज्याचा तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये समावेश करू शकता.
द गॉडफादर (१९७२): फ्रान्सिस फोर्ड कोपोला यांचा हा चित्रपट युद्धानंतरच्या अमेरिकेतील कोर्लिओन कुटुंबातील सत्तासंघर्षाची कथा सांगतो. मार्लन ब्रँडो आणि अल पचिनो यांनी साकारलेल्या भूमिका आजही लोकप्रिय आहेत. सत्ता,निष्ठा आणि क्रूर गुन्हेगारी जगतातील संघर्ष यांचं प्रभावी चित्रण या चित्रपटात पाहायला मिळतं.
पल्प फिक्शन (१९९४): क्वेंटिन टॅरँटिनो यांच्या या क्राइम चित्रपटात लॉस एंजेलिसमधील मारेकरी, एका बॉक्सर आणि छोट्या गुन्हेगारांच्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. हटके संवाद, दमदार संगीत आणि लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखांमुळे हा चित्रपट विशेष गाजला.
सेव्हन (१९९५): डेव्हिड फिंचर यांच्या या थरारक क्राइम चित्रपटात लवकरच निवृत्ती घेणार असलेला एक गुप्तहेर आणि त्याचा तापट स्वभावाचा साथीदार सात खून करणाऱ्या सिरीयल किलरचा शोध घेतात. वातावरणातील गूढता, अंगावर काटा आणणारी दृश्यं आणि अस्वस्थ करणारी कथा यामुळे हा चित्रपट विशेष ठरतो. चित्रपटाचा शेवट अतिशय धक्कादायक आहे.
द सायलन्स ऑफ द लॅम्ब्स (१९९१): चित्रपटात क्लॅरिस स्टार्लिंग नावाची व्यक्ती एका सिरीयल किलरचा शोध घेण्यासाठी तुरुंगात असलेल्या डॉ. हॅनिबल लेक्टरची मदत घेते. लेक्टर हा अत्यंत बुद्धिमान मनसोपचारतज्ज्ञ असतो. दमदार अभिनयामुळे हा चित्रपट विशेष गाजला. हा अनेक ऑस्कर पुरस्कार मिळवणारा थरारक सायकोलॉजिकल क्राइम थ्रिलर आहे.

हीट (१९९५): मायकेल मॅन यांच्या या चित्रपटात एका हुशार पोलिस अधिकाऱ्याचा आणि मोठ्या बँक दरोड्याची तयारी करणाऱ्या दरोडेखोराचा थरारक सामना पाहायला मिळतो. अल पचिनो आणि रॉबर्ट डी नीरो यांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट विशेष लोकप्रिय ठरला. वास्तववादी मांडणी, तणावपूर्ण प्रसंग आणि गोळीबाराच्या दृश्यांमुळे हा क्राइम थ्रिलर आजही आवर्जून पाहिला जातो.

द डिपार्टेड (२००६): मार्टिन स्कॉर्सेसी दिग्दर्शित या गाजलेल्या क्राइम थ्रिलरमध्ये एका गुप्त पोलिसाला आयरिश माफियामध्ये घुसखोरी करण्यासाठी पाठवलं जातं. दुसरीकडे, माफियासाठी काम करणारा एक व्यक्ती पोलिस दलात गुप्तपणे माहिती पुरवत असतो. दोघेही एकमेकांची ओळख उघड करण्यासाठी धडपडत असतात, पण त्यांचं खरं रूप समोर आलं तर दोघांचाही खेळ संपणार असतो. लिओनार्डो डिकॅप्रिओ, मॅट डेमन आणि जॅक निकोल्सन यांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट विशेष गाजला.
