सध्या चित्रपटगृहातून प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांवर नजर टाकली तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके चित्रपट खरोखरच पाहायला हवेत अशी उत्सुकता मनात निर्माण करतात. त्या तुलनेत ओटीटीवर मात्र उत्तमोत्तम नवनव्या वेबमालिका आणि चित्रपटांची एकच रांग लागली आहे. नवनवे विषय हाताळणाऱ्या वेबमालिका आणि चित्रपट हे ओटीटी माध्यमाचं वैशिष्टय़ ठरलं असलं तरी खास ओटीटीवर यशस्वी ठरलेल्या वेब मालिकांचे सिक्वेलही प्रेक्षकांना तितकेच आकर्षित करतात. त्यामुळे नव्या मालिकांबरोबरच यावर्षी जुन्या गाजलेल्या वेब मालिकांचे सिक्वेलही पाहता येणार आहेत.

प्रेक्षकांना काय आवडेल याचा विचार करून सतत नवनव्या आशयाच्या शोधात असलेल्या ओटीटी माध्यमांनी यंदा बॉलीवूड कलाकारांची निर्मिती वा भूमिका असलेल्या नव्या वेब मालिका आणि चित्रपटांबरोबरच जुन्या गाजलेल्या वेब मालिकांच्या सिक्वेलवरही तितकाच भर दिलेला दिसून येतो. त्यामुळे या वर्षांची सुरुवात एकीकडे फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवडय़ात आलेल्या ‘आर्या ३’ या ‘हॉटस्टार’वरील अभिनेत्री सुश्मिता सेनच्या भूमिकेमुळे गाजलेल्या मालिकेच्या सिक्वेलने झाली असली तरी या महिन्याभरात विविध ओटीटी वाहिन्यांवर प्रदर्शित झालेल्या नव्या वेबमालिका आणि चित्रपटही सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

हेही वाचा >>>१३३ कोटींची कंपनी १५ कोटींना विकत घ्यायचा ‘लेन्सकार्ट’च्या सीइओचा प्रस्ताव; ‘शार्क टँक इंडिया’च्या इतिहासातील भन्नाट डील

गेल्या आठवडय़ात शाहरुख खानची निर्मिती असलेला ‘भक्षक’ हा नेटफ्लिक्सवरचा चित्रपट चर्चेचा विषय ठरला होता. अनाथालयातील मुलींना सेक्स रॅकेटमध्ये कसे ओढले जाते याची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि सई ताम्हणकर दोघींच्या कामाचे कौतुक झाले. या आठवडय़ात आलिया भट्टची निर्मिती असलेली ‘पोचर’ ही नवी वेबमालिका प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे. हस्तीदंतासाठी हत्तींची शिकार करणाऱ्या टोळीचा माग घेणाऱ्या वन अधिकाऱ्यांची कथा या वेबमालिकेत पाहायला मिळणार असून हिंदी, मल्याळम आणि इंग्रजी भाषेत ही वेब मालिका दाखवण्यात येते आहे. आलियाने याआधी ‘डार्लिग्स’ या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण केले होते, आता निर्मितीतील पदार्पणही तिने ‘पोचर’च्या माध्यमातून केलं आहे. शिवाय, कतरिना कैफ आणि विजय सेतुपती या आगळय़ा जोडीचा नितांत सुंदर चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’ लवकरच नेटफ्लिक्स वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नव्या आशयाबरोबरच काही गाजलेल्या वेब मालिकांचे सिक्वेल प्रेक्षकांना आकर्षित करणारे ठरणार आहेत.

हेही वाचा >>>आता मोफत पाहायला मिळणार नोलनचा बहुचर्चित ‘ओपनहायमर’; वाचा कधी व कुठे?

अभिनेता जितेंद्र कुमार याची मुख्य भूमिका असलेली, गावच्या पंचायती रंगवून सांगणारी वेब मालिका ‘पंचायत ३’ या वर्षांच्या सुरुवातीलाच प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे. याशिवाय, अभिनेता पंकज त्रिपाठी आणि अभिनेता मनोज वाजपेयी ही सध्या हिंदी चित्रपटांबरोबरच ओटीटी माध्यमावरही अत्यंत यशस्वी ठरलेली नावं. या दोघांच्याही वेब मालिकांना पहिल्यांदा जितकं यश मिळालं होतं तितकंच त्यांच्या सिक्वेलनेही अनुभवलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा यावर्षी या दोघांच्याही वेब मालिकांचे सिक्वेल प्रेक्षकांचं प्रेम मिळवतात का? याची उत्सुकता आहे. कालीन भैय्यांचं ‘मिर्झापूर’ तिसऱ्यांदा प्राइम व्हिडीओवर परतणार आहे. मार्चच्या अखेरीस ‘मिर्झापूर ३’ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर याच प्राइम व्हिडीओवर गाजलेल्या ‘द फॅमिली मॅन’ या मनोज वाजपेयी यांच्या वेब मालिकेचाही तिसरा भाग येणार आहे. मात्र ‘द फॅमिली मॅन ३’ पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी अधिकच कळ सोसावी लागणार आहे.

हेही वाचा >>>दिव्या अग्रवालशी लग्न करताना अपूर्वने बाळगली तिच्या दिवंगत वडिलांची ‘ही’ वस्तू, अभिनेत्री भावुक होत म्हणाली…

ओटीटीवर प्रसिद्ध झालेल्या कलाकारांमध्ये तगडे कलाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता जयदीप अहलावत आणि अभिषेक बॅनर्जी यांची ‘पाताल लोक’ ही प्राइम व्हिडीओवरची वेब मालिकाही चांगलीच लोकप्रिय ठरली होती. खुनी हथोडा त्यागीची गोष्ट सांगणाऱ्या या वेब मालिकेचा दुसरा भाग प्राइम व्हिडीओवर यावर्षी प्रदर्शित होणार आहे. या दुसऱ्या भागाची घोषणा २०२२ मध्ये करण्यात आली होती. मात्र प्राइम व्हिड़ीओवर नव्या मालिकांची एकच गर्दी असल्याने या वेब मालिकेचं प्रदर्शन २०२४ पर्यंत लांबवण्यात आलं होतं. नेटफ्लिक्सवर गाजलेली आणि एम्मी अ‍ॅवॉर्डसची मानकरी ठरलेली ‘दिल्ली क्राइम’ ही वेबमालिकाही तिसऱ्यांदा नवी गोष्ट घेऊन यावर्षी प्रेक्षकांसमोर येणार आहे.

काला पानी २आणि फर्जी २

यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या सिक्वेल्सपैकी अनेक वेब मालिका गेल्या ५-६ वर्षांपासून प्रेक्षकांच्या परिचयाच्या आहेत. त्या तुलनेत ‘फर्जी’ आणि ‘काला पानी’ या वेब मालिका गेल्यावर्षी प्रदर्शित झाल्या होत्या. मात्र दोन्ही मालिकांना मिळालेला प्रतिसाद चांगला असल्याने यावर्षी त्यांचे सिक्वेल प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. अंदमानच्या पार्श्वभूमीवर घडणारी कथा ‘काला पानी’मध्ये पाहायला मिळाली होती. यात आशुतोष गोवारीकर, मोना सिंग, अमेय वाघ अशा कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर शाहीद कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘फर्जी’चा दुसरा भागही प्राइम व्हिडीओवर याच वर्षी पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जाते.