छोट्या पडद्यावरील मालिका ‘भाभी जी घर पर है’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकार प्रेक्षकांना काजोल आणि शाहरुखच्या आठवणींना उजाळा देताना दिसणार आहेत. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटातील काजल आणि शाहरुख यांच्या रेल्वेतील दृश्यांवर आधारित एक सीन मालिकेत दाखविण्यात येणार आहे. यामध्ये मालिकेतील अभिनेत्री रेल्वेच्या दिशेने धावत जात आपल्या पतींना हात देतानाचे दृश्य प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ या चित्रपटातील दृश्यावर आधारित विनोदी पद्धतीने मालिकेमध्ये हे दृश्य नुकतेच चित्रित करण्यात आले. मालिकेमध्ये अनिता भाभीची भूमिका साकारणाऱ्या सौम्या टंडनने या क्षणाच्या चित्रिकरणाचा फारच आनंद घेतला.
‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ या चित्रपटातील लोकप्रिय दृश्य विनोदी पद्धतीने मालिकेत चित्रित करण्यात आल्याचे सौम्याने म्हटले आहे. मी शाळेतील मित्रांसोबत शाहरुख आणि काजलच्या गाजलेला चित्रपट पाहिला होता. चित्रपटातील शाहरुख- काजोल यांच्यावर चित्रित झालेला तो रेल्वेतील क्षण आजही मला आठवतो. असे सौम्या यावेळी म्हणाली. चित्रपटातील हे दृश्ये माझ्यासाठी सगळ्यात आवडीचे असल्याचेही सौम्याने यावेळी सांगितले. या मालिकेत विभूती नारायण मिश्राच्या भूमिका साकारणाऱ्या आसिफ शेखने देखील या दृश्याबाबत प्रतिक्रिया दिली. काजोल आणि शाहरुखच्या नव्वदीच्या दशक गाजविणाऱ्या चित्रपटातील दृश्याचा पुन्हा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला ही मालिका पाहावी लागेल असे तो म्हणाला. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ या चित्रपटाची आठवण करुण देणाऱ्या दृश्याचे चित्रकरण करताना मजा आली. या मालिकेतील आतापर्यंतच्या चित्रिकरणातील हा एक खास क्षण होता असेही तो यावेळी म्हणाला.
‘भाभी जी घर पर है’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री अनिता भाभी म्हणजेच सौम्या टंडन ही नुकतीच विवाहबंधनात अडकली होती. सौम्याने तिचा प्रियकर सौरभ देवेंद्र याच्याशी मोजक्या लोकांच्या साक्षीने लग्न केले होते. अतिशय साध्या पद्धतीने कोणाताही मोठा सोहळा न करता पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला तिचे कुटुंबिय आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात सौम्या सुट्टी घालवण्यासाठी बाहेर जाणार आहे. याविषयी तिने प्रॉडक्शन हाउसलाही माहिती दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सौम्याने आपण सौरभला दहा वर्षांपासून डेट करत असल्याचे सांगितले होते. तसेच, सौरभ हा केवळ तिचा प्रियकर नसून चांगला मित्र आणि गाइड असल्याचेही तिने म्हटले होते. सौम्या आणि सौरभ हे कॉलेजच्या दिवसांपासून एकत्र आहेत.