'मैंने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्री तिचा पती हिमालय दासानीसोबत स्टार प्लसच्या 'स्मार्ट जोडी' शोमध्ये सहभागी झाली आहे. तब्बल ३० वर्षांनंतर भाग्यश्री पतीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. या शोच्या सुरुवातीलाच भाग्यश्रीनं कुटुंबीयांची परवानगी नसतानाही कशाप्रकारे मंदिरात जाऊन लग्न केलं होतं हे सांगितलं. आता आगामी एपिसोडमध्ये भाग्यश्रीच्या पतीनं त्यांच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा उल्लेख केला आहे. 'स्मार्ट जोडी'चा नवा प्रोमो नुकताच प्रसारित झाला. यामध्ये भाग्यश्री आणि तिचा पती हिमालय दासानी अभिनेता शाहरुख खान आणि काजोल यांच्या 'मेहंदी लगा के रखना' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यानंतर हिमालय सांगतात की, 'लग्न झालं, रिसेप्शन झालं. हा संपूर्ण वेळ भाग्यश्री एका लाजऱ्या नवरीप्रमाणे होती. त्यानंतर मला वाटलं, पहिल्या रात्री माझी बायको डोक्यावरून पदर घेऊन बसली असेल. पण जेव्हा मी आमच्या रुमचा दरवाजा उघडला तेव्हा भाग्यश्री नाइट ड्रेसमध्ये आत बसली होती आणि हॅलो डार्लिंग, हॅलो बेब्स बोलत होती.' यावर भाग्यश्रीनं सांगितलं की, 'मी नाइट ड्रेस यासाठी घातला होता की, आता काही होणार नाही झोपा असं मला सांगायचं होतं.' आणखी वाचा- Video : ‘किती हा अॅटीट्यूड…’ अजय देवगणच्या लेकीचं वागणं पाहून संतापले युजर्स भाग्यश्रीचं आजही असं म्हणणं आहे की, लग्नासाठी ती पळून गेली नव्हती. ती म्हणाली, 'जेव्हा लोक आणि मीडिया म्हणते की मी पळून जाऊन लग्न केलं. तेव्हा मला खूप राग येतो. कारण मी लग्नासाठी पळून गेले नव्हते.' दरम्यान या शोमध्ये भाग्यश्री आणि हिमायल यांनी पुन्हा लग्न केलं. आणखी वाचा- हटके फॅशनच्या नादात करीना कपूर झाली ट्रोल, युजर्स म्हणाले… भाग्यश्री आणि हिमालय दासानी यांना दोन मुलं आहे. त्यांची मुलं अभिमन्यू आणि अवंतिका दोघंही अभिनय क्षेत्रात आहेत. दरम्यान काही वर्षांपूर्वी भाग्यश्रीनं पतीसोबतच्या नात्यात मधल्या काही काळात दुरावा आला होता याची कबुली दिली होती. हे दोघं वर्षभर एकमेकांपासून वेगळेही राहत होते. भाग्यश्री म्हणाली, 'हे माझं पहिलं प्रेम होतं आणि मी त्याच्याशी लग्न देखील केलं. पण एक वेळ अशीही आली होती की आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो होतो.'