दाक्षिणात्य इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत जे मुळचे महाराष्ट्राचे किंवा मराठी भाषिक आहेत मात्र, त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांत काम करत तिथे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा तिकडे मोठा चाहतावर्ग आहे. यापैकीच एक नाव म्हणजे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली अभिनेत्री भाग्यश्री बोरसे. भाग्यश्री सध्या तिच्या ‘लेनिन’ या तेलुगू चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये ती मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे.
‘लेनिन’ या तेलुगू चित्रपटात भाग्यश्री दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांच्या मुलाबरोबर अखिल अक्किनेनीबरोबर झळकत आहे. यादरम्यान तिने तिच्या आयुष्यातील काही खडतर प्रसंग सांगितले आहेत. लहानपणी वडिलांची आर्थिक परिस्थिती फार बरी नव्हती, त्यानंतर त्यांना परदेशात नोकरी मिळाल्यानंतरचा संघर्ष याबद्दल तिने सांगितलं आहे. भाग्यश्री नेमकं काय म्हणाली जाणून घेऊया…
भाग्यश्री काय म्हणाली?
अभिनेत्री भाग्यश्री बोरसेने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. वडिलांच्या नोकरीनिमित्त कुटुंबासह नायजेरियात स्थलांतर केल्यानंतर तिला तेथील मित्र-मैत्रिणींचे वाईट अनुभव आले होते. विशेष म्हणजे, परदेशी मुलांनी नव्हे तर भारतीय मुलांनीच तिची सर्वाधिक खिल्ली उडवल्याचा खुलासा तिने केला. ‘Honest Town Hall’शी संवाद साधताना तिला बुलिंग आणि आत्मविश्वासाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्यावर भाग्यश्री म्हणाली, “मी छत्रपती संभाजीनगरमधील मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले. मला फक्त मराठी आणि हिंदी बोलता येत होतं. त्यानंतर वडिलांना नायजेरियात नोकरीची संधी मिळाली आणि आम्ही तिथे राहायला गेलो. पण हा बदल माझ्यासाठी खूप कठीण होता.”
भाग्यश्री पुढे म्हणाली, “त्यावेळी मला अजिबात इंग्रजी बोलता येत नव्हतं. मला फक्त मराठी आणि हिंदीच येत होतं. माझ्या आजूबाजूला असलेल्या भारतीय वंशाच्या एनआरआय मुलांना आश्चर्य वाटायचं की, हिला इंग्रजी कसं येत नाही? आणि तेव्हापासून त्यांनी माझी चेष्ठ करणं, मला त्रास देणं सुरू केलं. मी खूप निरागस होते. मला फक्त भाषा येत नव्हती, एवढंच त्यामागचं कारण होतं.”
भाग्यश्रीने सांगितलं की, हा अनुभव फक्त तिच्यापुरता मर्यादित नव्हता. वाढत्या वयात जवळपास प्रत्येक मुलाला कोणत्या न कोणत्या प्रकारच्या बुलिंगचा, समस्येचा सामना करावा लागतो. ती म्हणाली, “लहानपणी आपण सगळेच अशा अडचणींमधून जातो. आपल्या दिसण्यावरून, बोलण्याच्या पद्धतीवरून, भाषा न येण्यावरून किंवा अभ्यासात कमी असल्यामुळे आपल्याला कमी लेखलं जातं, त्रास दिला जातो”. मात्र, या अनुभवाने स्वतःला खचू न देता त्यातून शिकण्याचा मार्ग निवडल्याचं भाग्यश्रीने सांगितलं. ती म्हणाली, “मीही बुलिंगचा सामना केला आहे. पण मला वाटतं, आजूबाजूचा नकारात्मक आवाज दुर्लक्षित करून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. हा प्रवास कठीण असेल, वेदनादायकही असेल, पण हाच त्रास तुम्हाला अधिक मजबूत बनवतो.”
ती पुढे म्हणाली, “खरं सांगायचं तर, त्या अनुभवाशिवाय माझं इंग्रजी आज इतकं चांगलं झालं नसतं. माझ्या इंग्रजीमुळे त्यांनी माझी चेष्टा केली नसती, तर कदाचित मी ते सुधारण्याचा इतका प्रयत्नही केला नसता. त्यामुळे मी त्या घटनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहते. आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक अनुभव आपल्यातील सकारात्मक गोष्ट अधिक मजबूत बनवतो, असा माझा विश्वास आहे.”
