लाउडस्पीकरवर अजान आणि हनुमान चालीसा लावण्यावरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मशिदींवरील भोंगे खाली उतरण्यात यावेत अन्यथा आम्ही देखील त्यांच्यासमोर लाउडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू असं वक्तव्य केलं होतं. ज्यावर महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आता प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांनी या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गोरखपूर येथील एका कार्यक्रमात अनुप जलोटा यांनी अजान- हनुमान चालीसा वादावर आपलं मत मांडलं. ते म्हणाले, “आपल्या देशात अजान आणि हनुमान चालीसा दोन्हीही संगीताच्या माध्यमातून प्रस्तुत केल्या जातात. दोन्हीही सुरेल आहेत. पण अजान आणि हनुमान चालीसा यांचं स्वतःचं एक महत्त्व आहे. पण मोठ्या आवजात अजान देणे किंवा हनुमान चालीसा म्हणणे हे मला पटत नाही.”

आणखी वाचा- Video : रुग्णालयातून परतलेल्या धर्मेंद्र यांचा व्हिडीओ चर्चेत, म्हणाले “पुन्हा असं काही…”

अनुप जलोटा पुढे म्हणाले, “मंदिर असो, मशिद असो किंवा मग गुरुद्वारा असो अथवा चर्च. कोणत्याही ठिकाणी प्रार्थनेचा मोठा आवज असणं चुकीचं आहे. प्रार्थनेचा आवज हा तेवढाच मोठा असावा जो कानांना मधुर वाटेल आणि कोणालाही यामुळे त्रास होणार नाही. मी स्वतःचच उदाहरण देतो. मला भजन म्हणणं आवडतं. पण जर मी मोठ्या आवाजात भजन म्हणू लागलो किंवा लाउडस्पीकरवर भजन लावलं तर माझ्या आजूबाजूच्या लोकांना त्रास हा होणारच आहे.”

आणखी वाचा- आयुष्यमान खुरानाच्या पत्नीनं शेअर केले बेडरुम सीक्रेट्स, शरीरसंबंधांवर ताहिराचा खुलासा

अनुप जलोटा यांनी या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं. ते म्हणाले, ” योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमुळे गोरखपूरचं संपूर्ण रूपच बदलून गेलं आहे. सगळीकडे गोरखपूरचं नाव घेतलं जातंय. मी मागच्या ४० वर्षांपासून गोरखपूर पाहत आहे. माझं खूप जवळचं नातं आहे या शहराशी पण आता अलिकडच्या काळात या शहरात कमालीचे बदल झाले आहेत.”