Bharat Jadhav Sahi Re Sahi Drama: मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध नाटकांची चर्चा होते, तेव्हा भरत जाधव यांच्या सही रे सही नाटकाशिवाय अशा चर्चा अधुऱ्या राहतात. भरत जाधव यांच्या अभिनयाने नटलेल्या या नाटकाने इतिहास घडवला. प्रत्येक नाटकाला हाऊसफुलची पाटी असलेल्या सही रे सहीचे आतापर्यंत साडे चार हजार प्रयोग झाले आहेत. लोकसत्ताच्या अभिजात लिटफेस्टमध्ये पाच-हजारी नाटककार या पॉडकास्टमध्ये सही रे सहीचा प्रवास केदार शिंदेंनी उलगडून सांगितला.
प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक अजित भुरे यांनी मराठी रंगभूमीवर हजाराहून जास्त प्रयोग करणाऱ्या केदार शिंदे, संतोष पवार आणि देवेंद्र पेम याची सविस्तर मुलाखत घेतली. या मुलाखतीत भिन्न प्रकृती आणि विचार असलेल्या या तीनही कलाकारांनी त्यांच्या एकूणच मराठी रंगभूमीबद्दल चर्चा केली. यदा कादाचित, ऑल द बेस्ट आणि सही रे सही या नाटकांची यात प्रामुख्याने चर्चा झाली.
सही रे सही नाटक कसे सुचले?
सही रे सही नाटकापूर्वी माझे मी विजय दिनानाथ चव्हाण हे नाटक व्यावसायिकदृष्ट्या फारसे चालले नव्हते. तसेच भरत जाधवने त्यावेळी पैसाच पैसा नावाचे नाटक केले होते. त्याचेही प्रयोग कालांतराने कमी झाले. मग आम्ही मालिकांमध्ये व्यस्त झालो. पण नाटकात काहीतरी करायला हवे, असे राहून राहून वाटत होतं.
मग मी कमल हसनचा मेयर साहब चित्रपट पाहिला. या चित्रपटाची कल्पना मला फार भावली. एक माणूस गेल्यानंतर त्याच्या जागी तोतया उभा केला. मग एक माणूस गेल्यानंतर तीन तोतया माणसे स्टेजवर आला तर काय होईल? याचा विचार मी केला. सही रे सही नाटकाचे आई-बाप मी आणि भरत असलो तरी याची मावशी अंकुश चौधरी आहे. कारण कोणतीही कल्पना सुचल्यानंतर आम्ही तिघे त्यावर खूप चर्चा करायचो.
आणि भरत जाधव सुपरस्टार झाला
मी फक्त आणि फक्त भरतसाठी हे नाटक लिहिले होते. ऑल द बेस्टमध्येही त्याने पॉवरफुल काम केले होते. एक शब्दही न बोलता त्याने उत्तम काम केले होते. त्यामुळे त्याच्या कामाला न्याय देणारे काहीतरी केले पाहिजे, असे माझ्या मनात होते. त्यातून सही रे सही हे नाटक आकारास आले आणि भरत जाधव एका रात्रीत सुपरस्टार झाला.
संपूर्ण मुलाखत इथे पाहा –
भरत जाधव यांच्या कामाचे देवेंद्र पेम यांनीही कौतुक केले. भरत बरोबर काम करणे म्हणजे मेजवानी असते, असे ते म्हणाले. तर यदा कदाचित नाटकाचे दिग्दर्शक संतोष पवार म्हणाले की, सही री सही नाटकाचा पहिला प्रयोग जसा झाला होता, तसाच प्रयोग आजही तसाच सादर केला जातो. भरत जाधव यांनी २४ वर्षांत आजवर एकही बदल नाटकात केलेला नाही.
भरत लंबी रेस का घोडा
मुलाखतकार अजित भुरे यांनी केदार शिंदेंना विचारले की, या नाटकाचे किती प्रयोग झाले आहेत आणि याबद्दल भरत जाधव यांना किती गुण द्याल. यावर केदार शिंदे म्हणाले की, सही रे सहीचे आजवर साडे चार हजार प्रयोग झाले आहेत. माझ्या आयुष्यातील ७० टक्के काम मी भरत बरोबरच केले आहे. भरत लंबी रेस का घोडा आहे. त्याला जर सोन्याचे अंड देणारी कोंबडी मिळाली तर तो रोज अंडच खाईल, अशा पद्धतीचे तो नट आहे.

भरत जाधवच्या डीएनएमध्ये सही रे सही नाटक आहे. ज्या दिवशी भरत थकेल त्यादिवशी हे नाटक बंद होईल. सही रे सही नाटकाची एक डिजिटल कॉपी तयार करून ठेवण्याची सूचना मी केली आहे. कारण सही रे सही नाटकात भरत शिवाय दुसऱ्या नटाची कल्पनाही करता येणार नाही, असेही केदार शिंदे यांनी सांगितले.
