Bharat Jadhav’s Nephew : मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांच्या मुलांनी, नातवंडांनी पुढे नेला आहे. तर काही कलाकार असे आहेत, ज्यांनी कोणताही पाठिंबा नसताना इंडस्ट्रीत स्वबळावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यापैकीच एक म्हणजे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते भरत जाधव.
भरत जाधव मराठी सिनेसृष्टीतील दीर्घकाळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. त्यांनी आजवर विविध विषयांवर आधारित चित्रपटांतून काम केलं आहे. परंतु, विनोदी भूमिकांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या विनोदाचं टायमिंग, संवाद व साधेपणा यांमुळे ते अनेकांच्या आवडीचे अभिनेते आहेत. भरत जाधव यांच्याबरोबरच्या काही कलाकारांच्या मुलांनीही इंडस्ट्रीत पदार्पण केलं. उदाहरण द्यायचं झालं, तर केदार शिंदे यांची लेक सना शिंदे. परंतु, भरत जाधव यांच्या मुलांना मात्र अभिनयात रस नाहीये.
भरत जाधव यांच्या अभिनयाचा वारसा पुढे नतोय पुतण्या
भरत जाधव हे त्यांच्या घरातील अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे पहिलेच आहेत. पण, त्यांच्या मुलांना जरी त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे न्यायचा नसला तरी त्यांच्या घरातील एक व्यक्ती हे काम करत आहे. ती व्यक्ती म्हणजेच भरत जाधव यांच्या सख्ख्या भावाचा मुलगा हार्दिक जाधव. हार्दिक जाधव हा भरत जाधव यांचा पुतण्या असून, तो आता काकाच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत आहे. त्याबद्दल त्यानं स्वत: एका मुलाखतीत सांगितलं होतं.
हार्दिक जाधवने ‘या’ नाटक व मालिकेत केलंय काम
भरत जाधव यांनीसुद्धा आतापर्यंत अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्या मुलांना अभिनयात फार रस नसून, ती दुसऱ्या क्षेत्रात करिअर करत आहेत, असं म्हटलेलं. तर हार्दिक जाधवनंही तो भरत जाधव यांचा पुतण्या असून, त्याला अभिनयाची खूप आवड असल्याचं मुलाखतीत सांगितलं होतं. हार्दिक जाधवनं भरत जाधव यांची निर्मिती असलेल्या आणि त्यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘अस्तित्व’ नाटकात त्यांच्याबरोबर कामही केलं . एवढंच काय तर त्यानं ‘कलर्स मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘अंतरपाठ’मध्येही काम केलं आहे. त्यामध्ये त्यानं महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. परंतु, ही मालिका फार कमी कालावधीतच बंद झाली.
हार्दिक जाधवला काका भरत यांच्याकडून मिळालेला अभिनयाचा वारसा तो पुढे नेत असून, आतापर्यंत त्यानं नाटक, मालिका अशा दोन्ही माध्यमांत काम केलं आहे. हार्दिक अभिनेता असण्याबरोबर लेखक व दिग्दर्शकही आहे. सध्या हार्दिक ‘सन मराठी’वरील ‘तू सोबती तरी अनोळखी’ मालिकेत काम करत आहे.
