scorecardresearch

‘मला शब्दांमध्ये व्यक्त होता येणार नाही’, पंतप्रधान मोदींनी वाहिली लतादीदींना श्रद्धांजली

भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे आज निधन झाले आहे

‘मला शब्दांमध्ये व्यक्त होता येणार नाही’, पंतप्रधान मोदींनी वाहिली लतादीदींना श्रद्धांजली

भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे आज निधन झाले आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

‘मला शब्दांमध्ये व्यक्त होता येणार नाही. लतादीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली आहे जी कुणीही भरुन काढू शकत नाही. येणारी पिढी ही त्यांना भारतीय संस्कृतीमधील एक दिग्गज म्हणून स्मरणात ठेवतील, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती’ या आशयाचे ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

लता मंगेशकर यांचे आज सकाळी ८.१२ मिनिटांनी निधन झाले. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या बऱ्याही झाल्या होत्या. मात्र त्यानंतर सर्व अवयव निकामी होत गेले. त्यानंतर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2022 at 10:33 IST