हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय ठरलेल्या तीन वेगळ्या पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी, नेहा पेंडसे बायस या तिघी… आणि त्यांना एका सुंदर कथेत गुंतवून रसिकांसमोर आणणारी तरुण दिग्दर्शिका जीजिविषा काळे अशी एक वेगळीच चौकट ‘तिघी’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आई आणि तिच्या दोन मुलींची गोष्ट सांगणारा ‘तिघी’ हा चित्रपट ६ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संवाद साधताना, आजवर मराठी चित्रपटांसाठी कोणीच विचारलं नाही. नशिबानेच हा चित्रपट माझ्या पदरात पडला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांनी आनंद व्यक्त केला.
‘तिघी’ या चित्रपटात भारती आचरेकर आईच्या मध्यवर्ती भूमिकेत आहेत. ‘या चित्रपटातील आईची भूमिका मला देणं हे दिग्दर्शिका जीजिविषाने धाडसच केलं आहे. एकतर इतकी वर्ष मी हिंदीत काम केलं, त्यामुळे ही मराठीत काम करणारच नाही असं लोकांना वाटलं असावं. त्यातही विनोदी भूमिका मी जास्त केल्याने कदाचित गंभीर भूमिका करू शकणार नाही असंही वाटलं असावं. कुठल्याही कारणाने का होईना पण मला मराठीत काम करायला मिळालं नव्हतं.
‘तिघी’ने फक्त मराठी चित्रपट नव्हे तर आजवर कधीही न मिळालेली अशी वेगळी भूमिका साकारण्याचा आनंद दिला’ अशी भावना भारती आचरेकर यांनी व्यक्त केली. या निमित्ताने त्यांनी त्यांच्या आईची गायिका माणिक वर्मा यांचीही आठवण सांगितली. ‘मी गाणं गाऊ शकले नाही, याचं आईला शेवटपर्यंत वाईट वाटत राहिलं. मी महाराष्ट्राची महागायिका करत होते, पण परिस्थितीमुळे सोडावं लागलं. ती खंत माझ्या मनात होती आणि ही भूमिका करताना माझ्या आयुष्यातील त्या आठवणी पुन्हा डोळ्यासमोर तरळून गेल्या’ असं त्यांनी सांगितलं. ‘आम्ही लहानपणी आजीकडे वाढलो. आई-वडिलांनी आम्हाला खूप मुभा दिली. ‘आम्ही बघणार नाही, तुम्ही स्वतःकडे बघा’ असंच त्यांनी सांगितलं होतं, त्यामुळे जबाबदारी लवकर समजली आणि हा आत्मविश्वासच पुढे उपयोगी पडला’ अशी आठवणही त्यांनी सांगितली.
‘तिघी’च्या निमित्ताने पहिल्यांदाच इतक्या वर्षांत एक वेगळी खंबीर भूमिका साकारण्याचा आनंद मिळाल्याची भावना व्यक्त करतानाच भारतीताईंसारखंच आपणही हिंदीत अधिक काम केल्याने बहुधा मराठी चित्रपटांसाठी विचारणा कमी झाली असावी, असं मत अभिनेत्री नेहा पेंडसे बायस हिने व्यक्त केलं. या चित्रपटात तिने मोठ्या बहिणीची भूमिका केली आहे. ‘मोठी बहीण असणं सोपं नाही. समजूतदारपणाचं एक ओझं तिच्यावर असतं. ते अन्यायकारक असलं तरी असतं. या भूमिकेच्या निमित्ताने मला हे नव्यानं समजलं.
काही दृश्य देताना मला खरंच असं वाटलं की, मला सोनालीला म्हणजेच चित्रपटातील स्वातीला जपायला हवं आहे. त्यावेळच्या भावना मला शब्दांत सांगता येणार नाही’ अशी आठवण नेहाने सांगितली. तर रंभा आणि अप्सरा अशाच भूमिकांचा माझा साचा तयार झाला. पण, त्याच त्याच वलयांकित भूमिकांपेक्षा चेहऱ्याला कुठलाही रंग न लावता, खूप नैसर्गिक, सच्च्या वाटाव्यात अशा मोजक्याच भूमिका मला मिळाल्या. तब्बल दोन दशकं अभिनयाच्या क्षेत्रात वावरल्यानंतर लोकांनी माझ्या दिसण्यापलीकडे जाऊन माझा अभिनय पाहावा, अशी अपेक्षा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने व्यक्त केली.
‘या चित्रपटातील पहिलं दृश्य पाहताना कदाचित प्रेक्षकांना ही अशी का दिसते आहे? असं वाटेल. पहिल्या काही दृश्यानंतर प्रेक्षक नक्कीच तिच्या भावविश्वात शिरतील’ असा विश्वास व्यक्त करतानाच शेवटी चेहरा नव्हे, भावना लक्षात राहातात आणि जेव्हा व्यक्तिरेखा खरी वाटते, तेव्हा बाह्य आवरण आपोआप गौण ठरतं, असं मत सोनालीने व्यक्त केलं.
गेले एक तपाहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेली जीजिविषा काळे ही तरुणी ‘तिघी’च्या निमित्ताने दिग्दर्शिका म्हणून पदार्पण करते आहे. ‘कधी तरी स्वत:चा चित्रपट करेन हे स्वप्न होतं. तशी संधी मिळणं हेच मोठं भाग्य आहे. संघर्ष कोणालाही चुकलेला नाही, पण योग्य वेळी योग्य माणसं भेटल्याने आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे दिग्दर्शिका होण्यापर्यंतचा हा प्रवास सुखकर झाला’, अशी भावना जीजिविषाने व्यक्त केली. पहिल्या चित्रपटासाठी कोणती गोष्ट सांगावी, याबद्दल मी खूप विचार केला. ‘तिघी’ची कथा माझ्या मनात खोलवर रुजलेली होती.
नात्यांमध्ये संवादाचा असलेला अभाव, स्त्रियांचा आयुष्यात सुरू असणारा शांत संघर्ष, घर या संकल्पनेभोवती त्यांच्या गुंतलेल्या भावना हे सगळं या चित्रपटाच्या कथेत आहे, असं तिने सांगितलं. या चित्रपटासाठी व्यक्तिरेखांची मांडणी. संवादांपेक्षा नजरेतून व्यक्त होणं, मौनातूनही बोलके होणारे भाव, या तिघींच्या घराची रचना करताना केलेला विचार, सराव करतानाही वेगळ्या पद्धतीने केलेल्या गोष्टी असे नेहमीपेक्षा विचारपूर्वक काही प्रयत्न केले आहेत, असंही तिने स्पष्ट केलं. वेगळे कथानक आणि कलाकार घेऊन आलेल्या ‘तिघी’ची निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे.
