भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान थायलंडमध्ये सुट्टी घालवल्याबद्दल कॉमेडियन भारती सिंगला ट्रोल केले जात आहे. देशात सुरू असलेल्या या तणावाच्या काळात ती सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. आता भारती सिंगने रडत रडत संपूर्ण सत्य सांगितले आहे.
तिच्या यूट्यूब चॅनेलवरील तिच्या नवीनतम ब्लॉगमध्ये, भारती थायलंडमध्ये असल्याने होणाऱ्या ट्रोलिंगमुळे भावनिक झालेली दिसून आली. भारतीने व्हिडीओमध्ये तिला येणाऱ्या काही हृदयस्पर्शी कमेंट्स शेअर केल्या आहेत, जसे की “तुमचे कुटुंब अमृतसरमध्ये असताना तुम्हाला थायलंडमध्ये राहण्याची लाज वाटली पाहिजे’, देशात तणाव वाढत आहे आणि तुम्ही थायलंडमध्ये फिरत आहात.”
अमृतसरमधील तिच्या कुटुंबाबद्दल भारती काय म्हणाली?
भारती सिंग व्हिडीओमध्ये तिच्या अमृतसरमधील कुटुंबाबद्दल सांगते, “हो, सध्या शहर आणि देश अशांततेतून जात आहे, पण माझे कुटुंब सुरक्षित आहे. मला माझ्या देशावर आणि सरकारवर पूर्ण विश्वास आहे. भारत एक खूप मजबूत राष्ट्र आहे. जेव्हा मी तुमच्या कमेंट्स वाचते तेव्हा मला राग येत नाही. मला फक्त असे वाटते की तुम्ही लोक खूप भोळे आहात.”
कॉमेडियन पुढे म्हणाली की, कुटुंब सुरक्षित आहे. ती जेव्हा जेव्हा त्यांना फोन करते, तेव्हा ते नेहमीच हसून उत्तर देतात. भारती म्हणाली, “मी सर्वांना हे सांगू इच्छिते की, मी येथे सुट्टीसाठी नाही तर कामासाठी आले आहे. आमचे १० दिवसांचे शूटिंग होते आणि आम्ही तीन-चार महिने आधीच या प्रोजेक्टसाठी शब्द दिला होता, यासाठी खूप तयारी केली आहे आणि शेवटच्या क्षणी एखाद्याला सोडून जाणे हे योग्य नाही.”
व्हिडीओमध्ये एका क्षणी भारती रडू लागली. ती म्हणाली, “खोट्या बातम्या वाचल्यानंतर मी अनेकदा अस्वस्थ होते आणि दिवसातून दोन ते तीन वेळा माझ्या कुटुंबाला फोन करते”. भारती पुढे म्हणाली, “मला खूप त्रास होतो आणि मी रडते… वाईट कमेंट्स बघून मला अस्वस्थ वाटते. मी त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, कारण तुम्ही सर्वजण माझ्या कुटुंबाचा भाग आहात… पुन्हा एकदा मी सांगू इच्छिते की, माझा माझ्या देशावर आणि सरकारवर विश्वास आहे. माझे कुटुंबच मला कठीण काळात काम करण्यास प्रोत्साहित करत आहे, कारण हा शो चालू राहिला पाहिजे.” भारतीने तिच्या चाहत्यांना घाबरू नका आणि सरकारने पाठवलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.