Gautami Patil & Bhau Kadam New Song : दादा कोंडके यांना मराठी कलाविश्वातील विनोदाचा सम्राट म्हणून ओळखलं जातं. अभिनयाच्या जोडीला त्यांच्या गाण्यांनीही रसिक प्रेक्षकांना वेड लावलं. ‘अंजनीच्या सुता’, ‘चंदनाच्या पाटावर’, ‘गंगू तारुण्य तुझं बेफाम’ अशी त्यांची असंख्य गाणी आजही महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय आहेत. नुकतंच त्यांच्या ‘हिल पोरी हिला’ या सदाबहार गाण्याचं नवीन रिमेक व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात एक अनोखी जोडी एकत्र झळकली आहे.
दादा कोंडके यांच्या ‘आंधळा मारतो डोळा’ या चित्रपटात “हिल हिल पोरी हिला…” हे गाणं होतं. या ५२ वर्षांपूर्वीच्या गाण्याचं एक नवीन व्हर्जन नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आणि लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकली आहे. या दोघांचा अनोखा अंदाज या म्युझिक व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
कोकणातील निसर्गरम्य वातावरणात या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं आहे. लोकप्रिय गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनावणे यांच्या सुमधूर आवाजात “हिल हिल पोरी हिला…” या गाण्याचं नवीन गाणं संगीतबद्ध करण्यात आलं आहे.
भाऊ कदम आणि गौतमी पाटील या दोघांनी या संपूर्ण म्युझिक व्हिडीओमध्ये अनेक वेगवेगळे लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या लूकमध्ये गौतमीने लाल रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसलीये. दुसऱ्या काही सीन्समध्ये या दोघांनी कोळी लूक, वेस्टर्न लूक, रेट्रो लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय या दोघांनी म्युझिक व्हिडीओमध्ये जबरदस्त डान्स सुद्धा केला आहे.
भाऊ कदम यांची लेक मृण्मयी कदमने या व्हिडीओवर, “गाणं खूप जास्त आवडलंय….Loved It, खूप मस्त. मी कधी एकदा या गाण्यावर डान्स करतेय असं झालंय” अशी कमेंट केली आहे. यासह अन्य नेटकऱ्यांनी सुद्धा भाऊ कदम अन् गौतमीला एकत्र पाहून आनंद व्यक्त केला आहे.

“रोहित सोनालीचा आवाज आणि परफेक्ट जोडी मस्त”, “भाऊ कदम आणि रोहित भाऊ”, “सबसे कातिल गौतमी पाटीलचा पुन्हा एकदा जलवा”, “मस्त डान्स केलाय दोघांनी”, “दोघांचे लूक्स कमाल आहेत” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
