क्षयरोगाशी झुंजणार्‍या पूजा डडवालला रवि किशनने केली मदत

पूजाच्या आजाराचे कळताच कुटुंबियांनीही तिच्याशी संबंध तोडले

काही दिवसांपूर्वी सलमान खानसोबत ‘वीरगती’ सिनेमात स्क्रीन शेअर केलेली अभिनेत्री पूजा दडवालला क्षयरोग झाल्याच्या बातमीने संपूर्ण कलाविश्व हादरलं होतं. सध्या या आजाराविरोधात ती लढा देत आहे. तिची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे तिने सलमान खानकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती.

पूजाच्या आजाराचे कळताच कुटुंबियांनीही तिच्याशी संबंध तोडले. आता तिच्याकडे लक्ष देणारं आपलं असं कोणीच नाही असं वाटत असताना भोजपूरी स्टार रवि किशन तिच्या मदतीला धावून आला आहे. सध्या पूजा मुंबईतील एका रुग्णालयात क्षयरोगावर उपचार घेत आहे. रवी आणि पूजाने दिग्दर्शक विनय लाड यांच्या सिनेमात एकत्र काम केले होते. रविने या गोष्टीची जाणीव ठेवून तिच्यासाठी रवीचा साथीदार पप्पू यादव याच्याकडे काही पैसे आणि फळं रुग्णालयात पाठवली.

हैदराबादमध्ये ‘एमएलए’ सिनेमाच्या प्रमोशनादरम्यान रविने पप्पूकडे काही पैसे आणि फळं पूजाला देण्यासाठी दिली. पप्पू यादवने किती रूपयांची मदत केली हे मात्र अद्याप कळू शकले नाही. रवी सिनेसृष्टीतील गरजू लोकांना अशापद्धतीची मदत अनेकदा करत असतो.
गेल्या १५ दिवसांपासून पूजा शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाली आहे.

दरम्यान, या अभिनेत्रीने आर्थिक मदतीसाठी सलमानला साद घातली होती. माध्यमांच्या मदतीने पूजाने सलमानपर्यंत आपली ही मागणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. ‘६ महिन्यांपूर्वी आपल्याला टीबीची लागण झाल्याचं निदान झालं. तेव्हापासूनच मी मदतीसाठी सलमान खानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आता व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले तर ते माझी मदत करतील अशी आशा आहे, कारण मी गेल्या १५ दिवसांपासून या रुग्णालयात आहे’, असं पूजा म्हणाली होती.

दरम्यान, सिनेसृष्टीपासून दूर असलेली पूजा काही काळ गोव्यामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. बरीच वर्ष तेथे कसिनोमध्येही तिने काम केलं. पण त्यानंतर मात्र तिला हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. साधा चहा पिण्यासाठीसुद्धा आपल्याला इतरांवर अवलंबून रहावं लागत असल्याचं पूजाने सांगितलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bhojpuri actor ravi kishan helped actress pooja dadwal suffering from tb salman khan

ताज्या बातम्या