Bhojpuri Actress Monalisa Motherhood News: महिलांसाठी आई होणे हा जगातील सर्वात आनंदाचा आणि समाधानाचा क्षण असतो. एका नवीन जीवाला जन्म देणे आणि त्याचे संगोपन करणे यामुळे आयुष्याचं एक वर्तुळ पूर्ण होतं, असं म्हटलं जातं. बाळ नको, असं म्हणणाऱ्या बऱ्याच महिला आहेत. त्याचबरोबर आई व्हायची इच्छा असूनही काही कारणास्तव मातृत्व न अनुभवू शकणाऱ्याही अनेक महिला आहेत. अभिनेत्रीही याला अपवाद नाही. ९ वर्षांपूर्वी लग्न करणाऱ्या अभिनेत्रीने तिचं दुःख व्यक्त केलं आहे.

आई होण्यासाठी आसुसलेली ही अभिनेत्री मोनालिसा आहे. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री व बिग बॉस फेम मोनालिसाने भोजपुरी चित्रपटांपासून बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मोनालिसा तिच्या अभिनयाबरोबरच सौंदर्य आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, वयाची ४३ वर्षे उलटूनही मोनालिसाला अजून मूल झालेले नाही.

मोनालिसाने व्यक्त केलं दुःख

लग्नाला ९ वर्षे होऊनही आई न होऊ शकल्याचे दुःख मोनालिसाने एका मुलाखतीत व्यक्त केलं आहे. ‘फिल्मीज्ञान’ला दिलेल्या मुलाखतीत मोनालिसा म्हणाली, “लग्न केल्यापासून मी आई होण्यासाठी खूप उत्सुक आहे, पण मी आई होऊ शकलेली नाही.”

मला स्वतःचं कुटुंब हवंय – मोनालिसा

मोनालिसाने २०१७ मध्ये विक्रांत सिंह राजपूतशी लग्न केलं. ती आपल्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहे. मोनालिसाने म्हटलं की तिला आता स्वतःचं एक छोटसं कुटुंब हवं आहे. बाळाच्या नियोजनाबद्दल बोलताना मोनालिसा म्हणाली, “मला स्वतःला एका आईच्या रूपात पाहायचं आहे. मला मुलं हवी आहेत, पण हे खूप कठीण आहे. कारण मी खूप जास्त विचार करते आणि मनात नकारात्मक विचार येतात.” अशा वेळी पती विक्रांत आधार देत असल्याचं मोनालिसाने सांगितलं.

मोनालिसाच्या मते, विक्रांत तिला नेहमी समजवतो आणि इतके नकारात्मक विचार न करण्याचा सल्ला देतो. मोनालिसाचं मातृत्वाबद्दलचं हे विधान सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आई न होऊ शकण्यामागचं कारण अद्याप मोनालिसाने सांगितलेलं नाही.

दरम्यान, मोनालिसा ही भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील प्रचंड फॅन फॉलोइंग असलेली अभिनेत्री आहे. मोनालिसा भोजपुरी चित्रपटांत काम करत असली, तरी ती मूळची कोलकाताची आहे. सिनेसृष्टीत येण्यापूर्वी ती एका रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणून काम करायची. तिच्या ओळखीतल्या एका व्यक्तीने तिला चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला, त्यानंतर ती या क्षेत्रात आली आणि इथे यश मिळवलं.