‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमिषा पटेल पुन्हा एकदा अडचणीमध्ये आली आहे. तिच्याविरोधात भोपाळ न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. एका चेक बाऊन्सप्रकरणी तिच्याविरोधात खटला सुरु आहे. याप्रकरणी पुढील सुनावणीसाठी तिला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काल सोमवारी हे वॉरंट जारी करण्यात आले आहे.

‘न्यूज १८’ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, भोपाळ कोर्टात अमिषाच्या विरोधात ३२.२५ लाख रुपयांचा चेक बाऊन्स झाल्याचा खटला सुरु आहे. यूटीएफ टेलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडने अमिषावर हा खटला दाखल केला आहे. अमिषाने चित्रपट बनवण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र त्याबदल्यात तिने दिलेले दोन चेक बाऊन्स झाले आहेत.

त्यामुळे याप्रकरणी सध्या भोपाळ कोर्टात सुनावणी सुरु आहे. येत्या ४ डिसेंबरला याप्रकरणी सुनावणीसाठी तिला हजर राहावे लागणार आहे. जर ४ डिसेंबरला अमिषा न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून अमिषा पटेल ही सिनेसृष्टीपासून दूर आहे. पण लवकरच ती सनी देओल आणि उत्कर्ष शर्मासोबत ‘गदर’ या सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती अर्जुन रामपाल आणि डेजी शाहसोबत ‘मिस्ट्री ऑफ टॅटू’ या चित्रपटातही झळकणार आहे.