‘ऑरेंज ज्यूस गँग’ नावाने लोकप्रिय असणार्‍या तरुण माध्यम प्रभावकांना मुख्य भूमिकेत एकत्र आणत मैत्री आणि भयकथेचा अनोखा संगम साधणारा ‘भूतम भयम्’ हा चित्रपट २४ जुलैला प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान नील साळेकर, करण सोनावणे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे यांनी समाजमाध्यमं आणि व्यवसायाचं समीकरण उलगडलं आणि दिग्दर्शक रामचंद्र गावकर, अभिनेत्री छाया कदम, अभिनेता पुष्कराज चिरपुटकर यांनी भयपटाच्या निर्मितीदरम्यानचे किस्से सांगितले.

 ‘सात मित्रांची, त्यांच्या मैत्रीची गोष्ट या चित्रपटात आहे. आणि या ‘ऑरेंज ज्यूस गँग’ला मी गेल्या खूप दिवसांपासून ओळखतो, त्यांच्यातली मैत्री, त्यांचं एकमेकांबरोबरचं नातं मी जवळून पाहिलेलं असल्याने या चित्रपटासाठी अशी मैत्री महत्त्वाची होती. ज्या पद्धतीने त्यांच्यातलं मैत्रीचं रसायन पडद्यावर दिसत आहे, त्यामुळे आपसूकच एक भावनिक गोष्ट पडद्यावर साकारली गेली आहे’, असं दिग्दर्शक रामचंद्र गावकर यांनी सांगितलं. 

‘जटाई’च्या प्रेमात…

‘जटाई’चा चेहरामोहरा जो वर्णन केला होता, त्यानेच मला आकर्षित केलं होतं. या भूमिकेसाठी अगदी पहिल्यांदा प्रॉस्थेटिक मेकअपच्या आधारे लुक करताना सात-आठ तास लागले होते, असं छाया कदम यांनी सांगितलं. प्रॉस्थेटिक मेकअप आणि ते करताना लागणारा वेळ, होणारा त्रास याची कल्पना होतीच. पण दिग्दर्शक म्हणून जटाईचं दिसणं, वागणं-बोलणं कसं असेल, याचा तपशीलवार अभ्यास रामने केला होता. अशा वेळी दिग्दर्शकाच्या मनात असलेली व्यक्तिरेखा साकारताना कलाकाराचा कस लागतो, सतत वाचन-अभ्यास आणि त्या व्यक्तिरेखेबरोबरचा संवाद यातून ते मैत्र जुळत जातं आणि मग ती साकारताना मजा येते. सिनेमा करताना आपल्याला काय येतं, यापेक्षा ते करताना काय काय शिकायला मिळतं हे महत्त्वाचं असतं, असंही त्यांनी सांगितलं.

तुम्ही काय रीलस्टार… 

‘रीलस्टार’ म्हणून जेव्हा हेटाळणी केली जाते, तेव्हा दु:ख नक्कीच होतं, अशी प्रांजळ कबुली नीलने दिली. बर्‍याचदा लोक कंटाळा आला की क्षणभर विरंगुळा म्हणून रील्स पाहतात. त्यांच्यासाठी रील्स पाहणं हा फावल्या वेळेतला उद्योग आहे, पण रील्स बनवणार्‍या आमच्यासारख्या कलाकारांसाठी मात्र ते मुख्य काम आहे. विरंगुळा म्हणून केलेलं काम नाही. आज नुसतं ‘रील्स’ हे माध्यम विचारात घेतलं तरी ते मनोरंजनाचं, माहितीचं, बातम्यांचं, जाहिरात-प्रसिद्धीचं व्यासपीठ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे, असं नील म्हणतो. तर ‘रील्स’च्या आधीही डबस्मॅश होतं, ज्यावर मी भाऊ कदम यांचे संवाद लिप सिंक करायचो. पुढे म्युझिकली, टिकटॉक आलं. रील्स आलं तेव्हा त्यांनी बर्‍यापैकी विचारपूर्वक केलेला आशय प्रसिद्ध करण्यावर जोर दिला गेल्याने ते माध्यम लोकप्रिय झालं. असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स सातत्याने येत-जात राहतील, मात्र कलाकाराच्या कलेला मरण नाही. ते नवनव्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार, असा विश्वास सिद्धान्त सरफरेने व्यक्त केला. तर आजही दूरचित्रवाहिनीवर काम करणार्‍या कलाकारांना चित्रपट करणार्‍या कलाकारांपेक्षा कमी लेखलं जातं, पण त्यामुळे मालिका बंद झालेल्या नाहीत. त्यांचा एक मोठा प्रेक्षकवर्ग कायम आहे. तसंच, एक-दोन तास आवर्जून रील्स बघणाराही प्रेक्षकवर्ग आहे आणि हा प्रेक्षक आम्हा पाचजणांना पाहून चित्रपट पाहायला चित्रपटगृहात येणार असेल, तर यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट नाही, अशी भावना शुभम जाधवने व्यक्त केली.

जागा आमच्याशी खेळत होती…

‘भूतम भयम्’च्या चित्रीकरणासाठी आम्ही खूप वेगळी जागा शोधली होती. एका उंच टेकडीवरच्या बंद पडलेल्या ब्रिटिशकालीन हॉटेलमध्ये आम्ही या चित्रपटात जो राणीवाडा दाखवला आहे त्याचं चित्रण केलं, हे सांगताना त्या विचित्र जागेवर येत असलेले अनुभव आणि भयपटाचं चित्रण हे काहीतरी वेगळंच होतं, असं दिग्दर्शक राम यांनी सांगितलं. आम्ही चित्रीकरणाधी दिवसा ती जागा अनेकदा पाहिली, तपासली. पण, चित्रीकरण हे बरंचसं रात्रीचं होतं आणि गावकर्‍यांनी आम्हाला जागेविषयी किस्से सांगायला सुरुवात केली. पण, त्याकडे विशेष लक्ष न देता आम्ही चित्रीकरण सुरू केलं. हळूहळू विचित्र असे आवाज, मोठ्या संख्येने आजूबाजूला असलेली वटवाघूळं असे अजब अनुभव आम्हाला येत गेले. एकप्रकारे ती जागा आमच्याशी खेळत होती आणि त्यातच आम्ही आमच्या भयपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं, अशी आठवण त्यांनी सांगितली.

समाजमाध्यमांवरील आशयनिर्मिती हे जबाबदारीचं काम

समाजमाध्यमांवर कुठल्याही प्रकारचा आशय टाकताना जबाबदारीनेच वागावं लागतं. कारण, एखादी साधी टिप्पणी जरी तुम्ही कुठल्या व्हिडीओखाली केली असेल तरी ती कायम राहते. आणि एकदा तुम्हाला लोकप्रियता मिळाली की तुमचे जुने व्हिडीओ, तुमची विधानं सगळं तपासून तुम्हाला खरं-खोटं सुनावलं जाऊ शकतं, असं नीलने सांगितलं. तर समाजमाध्यमांवर आशय टाकताना काय काळजी घेतली पाहिजे, व्हिडीओ करताना मागे काय दाखवलं जाऊ नये, त्याबद्दलची धोरणं काय आहेत, यासंदर्भातील कंपनीत काम केलं असल्याने तिथे मिळालेल्या ज्ञानाचा फायदा नंतर स्वत:चे व्हिडीओ बनवताना झाला, असं सिद्धांतने स्पष्ट केलं. ‘मला मुळातच कंटेट क्रिएटर बनायचं नव्हतं’, असं सांगणार्‍या शुभमने करोनाकाळात छोटे छोटे अभिनयाचे व्हिडीओज बनवून टाकले तर कदाचित आपलं काम आवडून एखादी संधी मालिका-चित्रपटात मिळेल, या विचाराने रील्स बनवायला सुरुवात केली होती, असं सांगितलं. पण, जेव्हा व्हिडीओ लोकप्रिय होऊ लागल्यावर नीलला पहिल्यांदा एक ब्रँड मिळाला आणि त्यांनी त्याला देऊ केलेल्या मानधनाची रक्कम ऐकल्यानंतर यातून पैसाही मिळतो हे लक्षात आलं. मग इतर कुठे कामाची शोधाशोध करण्यापेक्षा समाजमाध्यमांवर आशयनिर्मिती करून पैसा कमवायचा निर्धार केल्याचं त्याने सांगितलं.

‘बिग बॉस’ न जिंकताही चित्रपट मिळाला…

‘बिग बॉस मराठी’तील सहभागामुळे चर्चेत आलेल्या करण सोनावणे याने ‘बिग बॉस’ न जिंकताही महत्त्वाची, मोठी भूमिका असलेला चित्रपट मिळवणारा मी पहिलाच स्पर्धक आहे, अशी मिश्कील टिप्पणी केली. अर्थात, ‘बिग बॉस’ या शोला कितीही लोकांनी नावं ठेवली तरी फार विचार करून तो शो बनवलेला आहे आणि तिथे खेळणं खचितच सोपं नाही, असं करणने स्पष्ट केलं.

आत्तापर्यंतची प्रतिमा मोडण्याची संधी

‘प्रेक्षक येत नाहीत, चित्रपटगृहं मिळत नाहीत, या तक्रारीतून बाहेर पडून सतत चांगला आशय देण्याचा प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे.  सध्याचे चित्रपट दिग्दर्शक पडद्यावरचे व्हिज्युअल्स, ध्वनीयोजना, भव्यपणा, कथेतला वेगळेपणा या सगळ्यावर काम करतायेत आणि अशा पद्धतीने केलेले चित्रपट आवडले तर प्रेक्षक ते पाहण्यासाठी गर्दी करतात, हेही यावर्षी मराठी चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे सिद्ध झालं आहे, कलाकार म्हणून ही खूप आनंदाची बाब आहे’, असं पुष्कराज चिरपुटकर याने सांगितलं. या वर्षभरात विविध भूमिकांमधून काम करण्याची संधी मिळाली. आत्तापर्यंतची माझी प्रतिमा मोडून सातत्याने वैविध्यपूर्ण काम करता आलं, याबद्दल कृतज्ञ आहे, असं सांगतानाच ‘भूतम भयम्’ या भयपटाच्या मांडणीचंही त्याने कौतुक केलं. बेरोजगार मित्रांचं एक भावविश्व आहे आणि त्यात अमानवी शक्तीचा शिरकाव झाल्यानंतर उमटणारा थरार याची मांडणी करताना त्याला वास्तविकतेची जोडही दिग्दर्शकाने दिली आहे, असं त्याने सांगितलं.

‘ऑरेंज ज्यूस गँग’ प्रेक्षकांनी घडवली

२०२१ च्या जानेवारीमध्ये माझ्या चॅनेलने एक लाख प्रेक्षकसंख्येचा टप्पा पूर्ण केला, तोपर्यंत आमच्यामध्ये सौरभ घाडगे वगळता एवढी प्रेक्षकसंख्या कोणालाच मिळालेली नव्हती. तर आपण इतर कंटेंट क्रिएटर्सना एकत्र आणून आनंद साजरा करावा, या विचाराने मी सगळ्यांशी संपर्क साधला आणि त्यावेळी पहिल्यांदा आम्ही एकत्र भेटलो, अशी आठवण नीलने सांगितली. पुढच्या सहा महिन्यांत आम्ही एकत्र खूप व्हिडीओ केले. त्यावेळी सौरभने श्रीमंत आणि गरीब सकाळी उठल्यावर काय करतात?, अशा आशयाचा गमतीशीर व्हिडीओ बनवला होता. ज्यात श्रीमंत लोक सकाळी उठल्यावर कसं ऑरेंज ज्यूस पितात, चित्रपट-मालिकेतही अनेक वेळा आपल्याला तो ऑरेंज ज्यूसचा ग्लास कसा दिसतो, अशी गंमत त्याने दाखवली होती. तो व्हिडीओ खूप लोकप्रिय झाल्यावर प्रेक्षकांनी ऑरेंज ज्यूस गँग धमाल आहे, अशा प्रकरच्या कमेंट्स सुरू केल्या.