यूट्यूबवर लोकप्रिय झालेली एखादी कलाकृती ओटीटीवर आली की तिला नव्याने प्रेक्षक मिळतात. मात्र, आधीच पाहिलेल्या कलाकृतीला पुन्हा तितकाच भरभरून प्रतिसाद मिळणे, हा एक नवा ट्रेंड सध्या ओटीटीवर पाहायला मिळत आहे. अभिनेता भुवन बाम याची ‘ढिंढोरा’ ही वेबमालिका याच दृष्टीने लक्षवेधी ठरते. यूट्यूबवरून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली ही मालिका आता नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंगमध्ये असल्याने तिची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ‘ढिंढोरा’कडे केवळ विनोदी सीरिज म्हणून पाहणे पुरेसे ठरणार नाही. सर्वसामान्य माणसाच्या इच्छा-आकांक्षा, आर्थिक परिस्थिती बदलण्याची धडपड, कुटुंबातील नात्यांमधली गंमत आणि एखादी अनपेक्षित घटना घडल्यावर आयुष्याला मिळणारे नाट्यमय वळण, अशा अनेक गोष्टींचा मिलाफ या सीरिजमध्ये आहे. विनोदाच्या माध्यमातून मध्यमवर्गीय जीवनशैलीचे दर्शन घडवणे, हे तिचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

‘ढिंढोरा’ची कथा एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरते. बबलू या कुटुंबप्रमुखाला अचानक लॉटरी लागते आणि त्याच्या कुटुंबाच्या आयुष्यात नाट्यमय बदल घडू लागतात. आतापर्यंत काटकसरीने जगणार्‍या कुटुंबाला अचानक श्रीमंतीची स्वप्ने पडू लागतात. आर्थिक सुबत्ता आली की आयुष्यातील अनेक प्रश्न आपोआप सुटतील, असा सर्वसामान्य माणसाचा समज असतो. मात्र, अनपेक्षितपणे आलेला पैसा आनंदाबरोबरच नवे प्रश्नही घेऊन येतो. या बदलत्या परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांचे वागणे, त्यांच्या अपेक्षा आणि आजूबाजूच्या लोकांच्या प्रतिक्रिया यांतून विनोदाची निर्मिती होते. पैशामुळे माणसांच्या वागण्यात होणारे बदल, नात्यांमधील स्वार्थ, एखाद्याच्या आयुष्यात पैसा आला की त्याच्याशी वागण्याची इतरांची पद्धत कशी बदलते, याचे निरीक्षण विनोदी पद्धतीने केले आहे. ते करताना आजूबाजूच्या सध्याच्या परिस्थितीवरदेखील मार्मिक भाष्य केले आहे.

‘ढिंढोरा’चा सर्वांत मोठा आकर्षणबिंदू म्हणजे भुवन बाम. यूट्यूबवरील ‘बीबी की वाइन्स’ या वाहिनीमुळे तो आधीच लोकप्रिय झाला होता. विविध व्यक्तिरेखा साकारण्याची त्याची हातोटी हे त्याच्या लोकप्रियतेमागील एक महत्त्वाचे कारण. ‘ढिंढोरा’मध्येही त्याने हीच ताकद वापरली आहे. तो बबलू, जानकी, टिटू मामा, बंचो, समीर फुद्दी, होला, डिटेक्टिव्ह अशा दहा वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये दिसतो. व्यक्तिरेखांची संख्या मोजण्यापेक्षा त्यांच्यातील वेगळेपणा जपण्याचे आव्हान मोठे असते आणि भुवन त्याला बर्‍याच अंशी यशस्वीपणे सामोरा जातो. प्रत्येक व्यक्तिरेखेची बोलण्याची पद्धत, देहबोली, स्वभाव आणि विनोद करण्याची शैली वेगळी ठेवण्याचा त्याचा प्रयत्न जाणवतो. एकाच अभिनेत्याने साकारलेल्या व्यक्तिरेखांमध्ये कृत्रिमपणा येण्याची शक्यता असते. मात्र, भुवनने आपल्या यूट्यूबवरील अनुभवाच्या जोरावर या व्यक्तिरेखांना स्वतंत्र ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे.

अर्थात, त्याच्या प्रत्येक व्यक्तिरेखेचे रूपांतर पूर्णपणे वास्तववादी वाटतेच असे नाही. काही ठिकाणी व्यक्तिरेखांच्या वेशभूषेतील किंवा रूपातील मर्यादा जाणवतात. जानकीचीही भूमिका करण्याची आवश्यकता होती का, असे उगाच वाटत राहते. तरीही, व्यक्तिरेखांच्या स्वभावातील फरक आणि संवादफेकीमुळे त्यांची गंमत टिकून राहते. एकाच अभिनेत्याने अनेक भूमिका साकारण्याची कल्पना नवीन नसली, तरी संपूर्ण कथानकात त्या व्यक्तिरेखा एकत्र गुंफणे हे या सीरिजचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला आपल्याला यत्र तत्र सर्वत्र भुवन बाम पाहणे पचवायला जड जाते, पण नंतर त्याची सवय होते.

मध्यमवर्गीय कुटुंबाच्या आयुष्यात आर्थिक गणितांना विशेष महत्त्व असते. महिन्याचा पगार, घरखर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, नोकरीतील बढती आणि भविष्यातील सुरक्षितता या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे अचानक मिळणारा मोठा पैसा ही केवळ आर्थिक घटना राहत नाही; तो संपूर्ण कुटुंबाच्या जगण्याची पद्धत बदलण्याची शक्यता निर्माण करतो.

‘ढिंढोरा’ याच मानसिकतेचा वेध घेते. पैसा मिळाल्यावर माणसांच्या अपेक्षा वाढतात. आधी अशक्य वाटणार्‍या गोष्टी शक्य असल्याचा विश्वास निर्माण होतो. त्याचबरोबर समाजातील इतरांची वागणूकही बदलते. एखाद्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की त्याच्याशी जवळीक वाढवणारे लोक, त्याच्याकडून अपेक्षा ठेवणारे नातेवाईक आणि त्याच्या नव्या प्रतिष्ठेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणारे लोक दिसू लागतात. या मानवी स्वभावाचे चित्रण सीरिजमध्ये विनोदाच्या माध्यमातून केले आहे.

या सगळ्यामुळे ‘ढिंढोरा’ केवळ हास्यनिर्मिती करणारी सीरिज राहत नाही. ती मध्यमवर्गीय माणसाच्या आकांक्षांवर आणि समाजातील पैशाला दिल्या जाणार्‍या महत्त्वावर भाष्य करते. मात्र, हे भाष्य गंभीर किंवा उपदेशात्मक स्वरूपात येत नाही. त्यामुळे प्रेक्षकांना त्याचा विचार करण्यासाठी स्वतंत्रपणे थांबावे लागत नाही. कथानक पुढे सरकत असतानाच त्यातील विसंगती लक्षात येतात.

लॉटरी लागल्यानंतर बबलूचा अपघात होतो आणि त्याची स्मृती हरवते. या घटनेमुळे कथानकाला नवे वळण मिळते. कुटुंबातील सदस्यांची धावपळ, अपघातामागील सत्य शोधण्याचे प्रयत्न आणि लॉटरीच्या तिकिटाभोवती निर्माण होणारे प्रश्न यांमुळे विनोदाबरोबरच उत्कंठाही वाढते. बबलूच्या मुलाच्या आयुष्यातील प्रश्न आणि त्याची गायक होण्याची महत्त्वाकांक्षा यांचीही कथानकात सांगड घातली आहे.

पटकथेच्या बाबतीत मात्र काही मर्यादाही जाणवतात. काही प्रसंगांमध्ये विनोदाची पुनरावृत्ती होते. काही वेळा प्रसंग अधिक रंगवण्याच्या नादात कथानकाचा वेग कमी होतो. गायत्री भारद्वाजने साकारलेली तारा ही व्यक्तिरेखा बबलूच्या मुलाच्या वैयक्तिक आयुष्याला भावनिक परिमाण देते. अनुप सोनी यांची उपस्थितीही कथानकाला वेगळा संदर्भ देते. राजेश तैलंग यांच्यासारख्या अनुभवी अभिनेत्याचा सहभाग सीरिजला अधिक वजन देऊ शकला असता; मात्र त्यांच्या व्यक्तिरेखेला अपेक्षित तेवढी व्याप्ती मिळतेच असे नाही.

सीरिजचे दिग्दर्शन हिमांक गौर यांनी केले आहे. विनोदी व्यक्तिरेखा, कौटुंबिक प्रसंग आणि कथानकातील नाट्यमय घडामोडी यांची सांगड घालण्याचा प्रयत्न दिग्दर्शनात दिसतो. संगीत हा या सीरिजचा आणखी एक उल्लेखनीय भाग आहे. शीर्षकगीताबरोबरच ‘साजिश’ आणि ‘बन गई जिंदगी’ यांसारखी गाणी कथानकाला चांगला परिमाण देतात. कैलाश खेर आणि रेखा भारद्वाज यांसारख्या गायकांचा सहभागही संगीताची बाजू समृद्ध करतो.

‘ढिंढोरा’ची लोकप्रियता समजून घेण्यासाठी तिचा यूट्यूबवरील प्रवास लक्षात घ्यावा लागेल. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सीरिजने भुवन बामच्या आधीपासून लोकप्रिय असलेल्या व्यक्तिरेखांना एका सलग कथानकात एकत्र आणले. यूट्यूबवरील प्रेक्षकांना या व्यक्तिरेखांची ओळख होती; त्यामुळे त्यांच्याशी जोडले जाणे तुलनेने सोपे झाले.

आता नेटफ्लिक्सवर ही सीरिज उपलब्ध झाल्यामुळे तिच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अधिक व्यापक झाला आहे. नेटफ्लिक्सवर दाखल झाल्यानंतर लगेचच ती भारतातील ट्रेंडिंग यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली होती. मालिकेच्या पहिल्या सीझनमध्ये आठ भाग आहेत.

‘ढिंढोरा’च्या विनोदाच्या शैलीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. संवादांमध्ये शिव्यांचा आणि काहीशा बटबटीत विनोदाचा वापर आहे. त्यामुळे सर्व कुटुंबीयांनी एकत्र बसून पाहावी अशी ही सीरिज आहे, असे सरसकट म्हणता येणार नाही. विनोदाचा अतिरेक काही प्रेक्षकांना खटकू शकतो. तरीही, या मर्यादांमुळे मालिकेचे मनोरंजनमूल्य पूर्णपणे कमी होत नाही. तिचे कथानक रंजक आहे, व्यक्तिरेखा लक्षात राहतात आणि विनोदाच्या माध्यमातून मानवी स्वभावातील विसंगती टिपण्याचा प्रयत्न स्तुत्य वाटतो. अनुप सोनीच्या पात्राचा यासाठी चपखल वापर केला गेला आहे. ‘ढिंढोरा’ ही प्रत्येक बाबतीत निर्दोष असलेली वेबसीरिज नाही; पण तिच्यात प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याची ताकद आहे.

ढिंढोरा

ओटीटी – नेटफ्लिक्स

दिग्दर्शक – हिमांक कौर

कलाकार – भुवन बाम