बिग बींच्या घरावर फडकला तिरंगा

‘मी मोठ्या अभिमानाने माझ्या घरावर तिरंगा फडकवला आहे’

छाया सौजन्य- ट्विटर

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आदबीने नाव घेतल्या जाणाऱ्या कलाकारांच्या यादीत अभिनेता अमिताभ बच्चन यांचे नाव अग्रस्थानी आहे. विविध समाजहिताच्या कामांसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये हिरीरिने पुढे सरसावणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या राहत्या बंगल्यावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवला आहे.

बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत याबाबतची माहिती दिली. बंगल्यावर फडकणाऱ्या तिरंग्याचा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलेय की, ‘मी मोठ्या अभिमानाने माझ्या घरावर तिरंगा फडकवला आहे; आणि तुम्ही? तुम्हीही असे केले पाहिजे..’ बिग बींच्या या ट्विटने सध्या अनेकांचेच लक्ष वेधले आहे. हा तिरंगा फडकवण्यामागे नेमके कारण काय असावे? असा प्रश्नही अनेकांच्या मनात घर करत आहे.

या एका फोटोमुळे सध्या अनेकांच्या नजरा बिग बींच्या सोशल मीडिया पोस्टकडे लागून राहिल्या आहेत, असे म्हणालायला हरकत नाही. दरम्यान, अमिताभ बच्चन यांचे देशप्रेम आपण जाणतोच. एक कलाकार म्हणून ते जितके लोकप्रिय आहेत तितकेच एक भारतीय म्हणूनही ते नेहमीच आपल्या देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्नशील असतात. देशासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यांनाही बिग बी नेहमीच पाठिंबा देतात. सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या बऱ्याच योजनांचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडरपद त्यांनी आजवर भूषवले आहे. सध्या बिग बी चित्रपट वर्तुळात चर्चेत आहेत ते म्हणजे ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटामुळे. या चित्रपटामधून अमिताभ बच्चन आणि आमिर खान पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. महानायक अमिताभ आणि परफेक्शनिस्ट आमिर खान यांच्या एकत्र येण्याने या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्येही कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटात स्वातंत्र्यपूर्व काळ दाखवण्यात येणार असून, फिलिप मिडॉस टेलर यांच्या ‘कन्फेशन ऑफ ठग्स’ या कादंबरीवर चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Big b amitabh bachchan hoisted indian flag on top of his home