Amitabh Bachchan : स्त्री या गाजलेल्या हॉरर-कॉमेडी चित्रपटातील जना या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता अभिषेक बॅनर्जी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिषेक बॅनर्जी याने फक्त अभिनेता म्हणून नाही. तर एक कास्टिंग डायरेक्टर म्हणून सिनेविश्वात यशस्वी कारकीर्द घडवली आहे. नुकताच त्याने गोव्यामध्ये आपला ४० वा वाढदिवस (४ मे) मोठ्या उत्साहात साजरा केला. अभिषेक बॅनर्जीच्या भावनांनी भारलेल्या जिवंत विनोदी भूमिका प्रेक्षकांना नेहमीच भावल्या. त्याने SCREEN ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सिनेविश्वातील अनुभव आणि शूटिंगच्या वेळी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या खास आठवणींना उजाळा दिला.

यावेळी स्वतः एक अभिनेता आणि कास्टिंग डायरेक्टर असल्यानं, कधी एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला पाहून भारावून गेल्यासारखं वाटलं का, असा प्रश्न अभिषेकला विचारला असता, त्यानं चटकन दोन नावं सांगितली… अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान. अभिषेक बॅनर्जी म्हणाला, “अजून चित्रपट प्रदर्शित व्हायचा आहे. मात्र, मी जेव्हा पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांना भेटलो तेव्हा मी अवाक झालो होतो. माझे हात-पाय थरथर कापत आणि अंगावर शहारा आला होता. एका अशा व्यक्तीसह काम करायला मिळणं, जे माझ्यासाठी नेहमीच आदर्श राहिले आहेत. ही गोष्ट माझ्यासाठी खूप खास होती.”

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बॅनर्जी यांची पहिली भेट

चित्रपटाच्या सेटवर जेव्हा पहिल्यांदाच अभिषेक बॅनर्जी आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची भेट झाली तेव्हा अभिषेकने पदस्पर्श करून नमस्कार केला. मात्र अभिषेकने हे आवर्जून सांगितले की, “सहकलाकारांसोबत समानतेनं आणि प्रोफेशनली काम करायचं असल्यानं एवढ्या दिग्गज कलाकराला असा नमस्कार करणं अजिबात आवडलं नाही.” अभिषेक म्हणाला, “ते सेटवर आल्यानंतर नकळत मी त्यांच्या पाया पडलो; पण ते माझ्यावर नाराज झाले. ते लगेचच म्हणाले की, हे काय करत आहात तुम्ही? आणि का करत आहात? यावेळी आपल्या भारतीय संस्कृतीत थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात हे सांगितलं जातं असल्यानं मी गोंधळून गेलो.”

याबाबत जेव्हा अभिषेकने सेक्शन 84 च्या दिग्दर्शकांसोबत बातचीत केली तेव्हा त्याला कळलं की अमिताभ यांना सहकलाकारांनी त्यांच्या पाया पडलेलं आवडत नाही. अभिषेक म्हणाला, “मी चित्रपटाचे दिग्दर्शक रिभू दासगुप्ता यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की, अमिताभसरांना हे आवडत नाही. कारण- त्यांना वाटतं की, ज्या क्षणी तुम्ही असे करता, त्या क्षणी तुम्ही सहकलाकार राहत नाही. तुम्ही आधीच त्यांना डोक्यावर बसवता आणि ते इतके व्यावसायिक आहेत की, त्यांना प्रत्येकाला समान वागणूक द्यायची असते, जेणेकरून तुमची कामगिरी खालावू नये. ही गोष्ट तर खूपच छान आहे.” असे अभिषेक बॅनर्जीने सांगितले.

पुढे अभिनेता अभिषेकने सांगितले,” मला हे लक्षात आले की, अमिताभसरांना ते मोठी व्यक्ती आहेत असं दाखवून द्यायचं नाही. त्यांना एक सहकलाकार आणि सहकारी म्हणून काम करायचे आहे. याला म्हणतात खरी व्यावसायिकता. या माणसामध्ये जरासुद्धा अहंकार नाहीये. मी ज्या ज्या कलाकारांसोबत काम केलं त्या प्रत्येकापेक्षा अमिताभ बच्चन हे सर्वांत जास्त व्यावसायिक आहेत. संपूर्ण सिनेविश्वात त्यांच्यासारखा व्यावसायिक कलाकार कोणीच नाही.”

शाहरुख खानबरोबर रंगल्या खास गप्पा

या मुलाखतीमध्ये अभिषेक बॅनर्जी याने बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानसोबत झालेल्या भेटीची आठवण सांगितली. ही भेट त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरली. अभिषेक म्हणाला, “शाहरुख खानसारखे संपूर्ण सिनेविश्वात कोणी कूल नाही. माझी भेट झाली तेव्हा मी त्यांना माझ्याबद्दल खूप काही सांगत होतो. जेणेकरून मला अशा व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवता येईल. शाहरुख खान अशी व्यक्ती आहे, ज्याच्यासोबत तुम्हाला कामाव्यतिरिक्त आणखी वेळ घालवावा, असं वाटेल. ते अतिशय विनोदी, हुशार आणि जोशपूर्ण व्यक्ती असल्याचे अभिनेता अभिषेक बॅनर्जीने सांगितले.

दरम्यान, अभिषेकचा ‘सेक्शन 84’हा चित्रपट १९ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या कोर्टरूम ड्रामाची निर्मिती रिलायन्स एंटरटेन्मेंट आणि जिओ स्टुडिओने केली आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.