येत्या सप्टेंबरपासून कलर्स वाहिनीवर ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचा अकरावा सिझन सुरु होणार आहे. शोमध्ये होणारे वादविवाद यांमुळे ‘बिग बॉस’ नेहमीच चर्चेत असतो. याशिवाय शो सुरु होण्यापूर्वीच अनेक कारणांमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय. नेहमीप्रमाणे या सिझनमध्येही सेलिब्रिटींसोबतच सर्वसामान्य व्यक्तीदेखील सहभागी होणार आहेत. खरंतर मागील दहा सिझनमध्ये सेलिब्रिटींप्रमाणे शोमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना मानधन दिलं जायचं. मात्र या नवीन सिझनमध्ये त्यांना हे मानधन मिळणार नसल्याची माहिती मिळतेय.

‘बॉलिवूड लाइफ’च्या वृत्तानुसार सामान्य व्यक्तींना शोसाठी मिळणारे मानधन बंद केले जाणार आहे. ‘बिग बॉस’च्या घरात होणारे वेगवेगळे टास्क आणि शो ला मिळणाऱ्या टीआरपीमुळे फक्त विशेष बोनसच्या स्वरुपातच ते पैसे कमवू शकतील. त्याचप्रमाणे अशा काही सामान्य व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांची निवड झालेली आहे. यंदा भाऊ-बहिण, आई- मुलगी किंवा वडील आणि मुलगा अशा जोड्या ‘बिग बॉस’मध्ये पाहायला मिळणार आहे. ही नवीन संकल्पना शो ला किती टीआरपी मिळवून देईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

वाचा : …आणि झोपण्याचा अभिनय करता करता बिग बी खरंच झोपले

या अकराव्या सिझनचा लोगोसुद्धा प्रदर्शित झाला असून ‘बिग बॉस’च्या अधिकृत पेजद्वारे सोशल मीडियावर हा लोगो शेअर केला गेलाय. त्याचप्रमाणे शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावं जवळपास निश्चित झाली असून, त्यात अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. यामध्ये ढिंच्याक पूजा, प्रियांका चोप्रासारखी दिसणारी नवप्रीत बंगा या नावांचाही समावेश आहे.