मराठी संगीतविश्वात शिंदे घरण्याचा दबदबा अजूनही आपल्याला बघायला मिळतो. ज्येष्ठ प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष शिंदे यानेसुद्धा त्यांचा सांगीतिक वारसा जपला आहे. बिग बॉस मराठीमधून सर्वप्रथम तो समोर आला आणि काहीच दिवासात त्याने लोकांच्या मानत घर केलं. उत्कर्ष गायक तर आहेच याशिवाय तो डॉक्टरकी, लेखन, संगीत दिग्दर्शन या क्षेत्रातही पारंगत आहे. नुकतीच त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामधून त्याची सामाजिक बांधिलकी आपल्याला दिसून येईल. या पोस्टमधून उत्कर्ष हा एक माणूस म्हणून खूपच संवेदनशील असल्याचंही स्पष्ट होत आहे.
काल १५ ऑगस्टच्या निमित्ताने उत्कर्षने ही पोस्ट लिहिली आहे. तो त्याच्या गाडीतून बाहेर जात असताना एका ठिकाणी सिग्नलवर त्याची गाडी थांबली. उत्कर्षसमोर एक तृतीयपंथी व्यक्ति येऊन थांबली. यानंतर उत्कर्षने त्या व्यक्तिसोबत एक सेल्फी घेत त्याविषयी पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टमधून त्याने तृतीयपंथी लोकांच्या व्यथा आणि त्यांच्या वेदनांबद्दल कळकळ व्यक्त केली आहे.
आणखीन वाचा : एक पाऊल पुढे..! तृतीयपंथींना केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात आधिकारी होण्याची संधी
आपण आजही तृतीयपंथी व्यक्ति आपल्यासमोर आली की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, त्यांना फार हीन वागणूक देतो. त्यांच्या समस्यांविषयी, शिक्षणाविषयी कुणीच काही पावलं उचलत नाही, यामुळेच त्यांच्यावर ही अशी वेळ आली आहे असा उत्कर्षच्या या पोस्टचा मतितार्थ आहे. याच पोस्टमध्ये उत्कर्षने भावुक होऊन बऱ्याच गोष्टी मांडल्या आहेत. या पोस्टमध्ये शेवटी तो म्हणतो की “अजूनही काहींना स्वातंत्र्य मिळणं बाकी आहे.”
उत्कर्षने त्या तृतीयपंथी व्यक्तिला मनोमन सलाम करत ही पोस्ट लिहिली आहे. उत्कर्षच्या या पोस्टवर त्याच्या बऱ्याच चाहत्यांनी त्यावर कॉमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर उत्कर्षने भारतीयांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे असंही त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.