१० लाखांसाठी स्पर्धकाने सोडले ‘बिग बॉस हाउस’

बानी, लोपा, मनवीर आणि मनू यांपैकी विजेता कोण होणार याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसच्या १० व्या पर्वाची आता सांगता होणार आहे.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसच्या १० व्या पर्वाची आता सांगता होणार आहे. बानी, लोपा, मनवीर आणि मनू यांपैकी या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. पण, मागच्या पर्वाच्या काही घटना आता पुन्हा एकदा या पर्वात घडताना दिसत आहेत. बिग बॉसची माजी स्पर्धक किश्वर मर्चंट आठवते का? किश्वरने ‘टिकेट टू फिनाले’ टास्क दरम्यान सदर शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिने त्यावेळी अंतिम फेरीत जाण्यापेक्षा १५ लाख घेऊन बिग बॉस हाउस सोडणे सोयीस्कर समजले होते. असेच काहीसे बिग बॉसच्या आताच्या पर्वातही घडले पण, यात थोडासा फरक आहे. किश्वरवर घर सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. मात्र, यंदाच्या पर्वातील सामान्य नागरिकांमधून स्पर्धक म्हणून आलेल्या मनू पंजाबीने स्वतःच १० लाख रुपये घेऊन बिग बॉसचे घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

बिग बॉसच्या १० व्या पर्वाची अंतिम फेरी आज होणार आहे. बॉलीवूड लाइफ या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉसने प्रत्येक पर्वाप्रमाणे यंदाच्या पर्वातही मनवीर गुर्जर, मनू पंजाबी, बानी आणि लोपामुद्रा राऊत या स्पर्धकांना १० लाखांची ऑफर दिली. बिग बॉसची ही ऑफर स्वीकारल्यास त्या स्पर्धकाला त्याच क्षणी बिग बॉसचे घर सोडावे लागते. ही ऑफर मनूने स्वीकारली असून त्याने घर सोडण्याने त्याच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनूने १० लाखांसाठी हे पर्व सोडल्याचे कळते.

यंदाच्या बिग बॉसच्या पर्वात सुरुवातीपासून मनू पंजाबी दमदार स्पर्धक होता. सामान्य व्यक्तिंमधून आलेल्या मनूने सेलिब्रिटी स्पर्धकांना चांगलीच फाइट दिली होती. मनवीर, मोना लीसा आणि त्याची या शोमध्ये चांगलीच मैत्री झाली होती. बिग बॉसने दिलेलं कोणतही टास्क असू देत त्याचे नेहमीच चांगले प्रदर्शन असायचे. त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्वाने त्याने सर्वांचीच मने जिंकली होती. इतकेच नव्हे तर स्पर्धेदरम्यान त्याला वैयक्तिक आयुष्यात एक मोठा धक्काही बसला. त्यालाही त्याने लढा देत पुन्हा नव्याने सुरुवात केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bigg boss 10 finalist manu punjabi quits the show for rs 10 lakhs