भजन गायक अनुप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेंड जसलीन मथुरा ही जोडी सध्या बिग बॉसच्या नव्या पर्वात तुफान चर्चेत आहे. ‘तुझं माझं ब्रेकअप’ म्हणत वेगळी झालेली ही जोडी आता पुन्हा एकत्र येणार आहे. आश्चर्य म्हणजे ही जोडी एकत्र यावी यासाठी बिग बॉस स्वत: प्रयत्न करत आहे. बिग बॉसनं या दोन्ही प्रेमी जोडप्यासाठी खास कँडल लाईट डिनरचं आयोजन केलं आहे. तेव्हा बिग बॉसची मर्जी सांभाळण्यासाठी का होईना ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे.

जसलीन ही अनुप जलोटांपेक्षा ३७ वर्षांनी लहान आहे. यंदाच्या पर्वाची संकल्पनाच ‘विचित्र जोडी’ असल्याने अनुप यांनी जसलीन सोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. पण बिग बॉसच्या घरात आल्यानंतर अनुप- जसलीन यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. मंगळवारी पार पडलेल्या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये जसलीनला कपडे आणि मेकअप किंवा अनुप जलोटा यांच्यापैकी एक निवड करायची होती. जसलीनला तिचे कपडे आणि मेकअपचं सामान फेकून देण्यास सांगितलं होतं. पण तसं करण्यास तिने नकार दिला आणि यामुळे अनुप जलोटा नाराज झाले. जसलीनच्या या निर्णयामुळे जलोटा यांना फार दु:ख झालं आणि घरातील इतर स्पर्धकांसमोर त्यांनी जसलीनसोबत ब्रेकअप करणार असल्याचं सांगून टाकलं.

मात्र दोघांच्या नात्यातली ही कटुता दूर करण्यासाठी आता बिग बॉस स्वत: पुढाकार घेताना दिसत आहे. तेव्हा आजच्या भागात जसलीन अनुप यांचं नातं कोणतं वळण घेणार हे पाहण्यासारखं ठरणार आहे.