Anurag Dobal Health Update : ‘बिग बॉस’चा एक्स स्पर्धक आणि यूट्यूबर अनुराग डोभालचा ७ मार्च रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्याला गंभीर दुखापती झाल्या. यामुले त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. सध्या तो एका मित्राच्या फार्महाऊसमध्ये उपचार घेत आहे. अशातच अनुरागने त्याच्या प्रकृतीबद्दलची अपडेट दिली आहे.
अनुरागने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो फिजिओथेरपी घेताना दिसत आहे. यात तो म्हणाला, “माझा एक पाय पूर्णपणे सुन्न झाला असून त्याची हालचाल होत नाहीये. कमरेच्या वरच्या भागात शस्त्रक्रिया झाल्यामुळे पायाला संवेदना जाणवत नाहीयत. यातून मी कसा बरा होईन, हे मला समजत नाहीय.”
तसेच हा व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये “आयुष्यात मी पुन्हा कधी चालू शकेन की नाही, कोणास ठाऊक” असे म्हटले आहे. दरम्यान, त्याने अपघातानंतर पोस्ट शेअर करत यं अपघातानंतर त्याला आयुष्य मिळालं असल्याचं म्हटलं होतं. तो म्हणाला होता, “मी जिवंत राहीन असं मला कधी वाटलं नव्हतं. मी ज्या मार्गावर होतो, तिथून परत येणं अशक्य होतं. हे सगळं माझ्यासाठी चमत्कारासारखं आहे. आज मी स्वतःला एकटं समजतो. भविष्यात काय होईल माहित नाही, पण देवाने मला दुसरं आयुष्य दिलं आहे, म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असेल. आता सगळं मी देवावर सोडलं आहे.”
कुटुंबाबरोबरचा वाद आणि आरोप
अनुराग गेल्या काही दिवसांपासून त्याच्या कुटुंबाबरोबरच्या वादामुळे चर्चेत आहे. त्याने आपल्या आई-वडील आणि भावावर मानसिक छळाचे आरोप केले होते. इतकेच नाही, तर त्यांनी आपल्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही त्याने केला होता. रितिका चौहानबरोबर लग्न केल्यापासून कुटुंबाशी त्याचे संबंध बिघडल्याचे त्याने सांगितले. दुसरीकडे, अनुरागचा भाऊ ‘कलम इंक’ याने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून अनुराग आणि त्याच्या पत्नीमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचे म्हटले आहे.
अनुराग डोभालने शेअर केलेला व्हिडीओ
अनुरागचे मित्र घेत आहेत काळजी
दरम्यान, अनुराग आणि त्याची पत्नी रितिका चौहान लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. अपघातानंतर ती त्याच्याबरोबर होती, मात्र हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती त्याच्याबरोबर दिसत नाहीय. सध्या अनुरागचे मित्र त्याची काळजी घेत आहेत. त्याच्या अनेक चाहत्यांनीसुद्धा काळजी व्यक्त केली आहे.
