बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘बिग बॉस मराठी’ सिझन ३ ची दणक्यात सुरवात झाली आहे. जवळपास दोन वर्षांनंतर बिग बॉस मराठी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे शोबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. यंदाच्या सिझनमध्ये कलाकारांसोबतच सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई बिग बॉसमध्ये सहभागी झाल्या आहेत. दरम्यान तृप्ती यांनी हिंदी बिग बॉसची ऑफर नाकारण्यामागचे कारण शोमध्ये सांगितले आहे.

‘बिग बॉस मराठी ३’मध्ये तृप्ती देसाई, किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील, मीनल शाह आणि सुरेखा कुडची गप्पा मारत असतात. दरम्यान त्यांनी एक बिग बॉसचा सिझन फक्त महिला स्पर्धक हवा अशी इच्छा व्यक्त केली. ‘जर बिग बॉसमध्ये १५ ही महिला स्पर्धक असत्या तर शो हिट ठरला असता’, असे शिवलीला म्हणताना दिसल्या. त्यानंतर तृप्ती देसाई यांनी हिंदी बिग बॉसच्या ऑफर विषयी सांगितले.

आणखी वाचा : ‘आमच्या आंदोलनानंतर इंदुरीकर महाराजांची ८० % किर्तने…’, तृप्ती देसाईंचा बिग बॉसच्या घरात खुलासा

‘मला हिंदी बिग बॉससाठी बोलावले होते. पण मी त्यांना सांगितलं होतं की जर बिग बॉसचा आवाज महिलेचा असेल तरच मी येणार. आता ही मी त्यांना सांगितलं की पुढच्या कोणत्या सिझनमध्ये तुम्ही बिग बॉसचा आवाज महिलेचा करणार असाल तर येते. म्हणून मी हिंदी बिग बॉसमध्ये गेले नाही. पण मराठी बिग बॉसमध्ये आले. मी महिलांचं काम करतेना’ असे तृप्ती म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, ‘ते मला म्हणाले की त्यांच्या मनात असे काही नाही की बिग बॉसचा आवाज महिलेचा असावा की पुरुषाचा. पण मी म्हणाले लोकांच्या मनात असे आहे ना. ऑर्डर देणारा हा पुरुषच असतो… तर ती महिलाही असायला हवी.’