छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस’ मराठी ३ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून काल एका मोठ्या सदस्याचे एलिमेशन झाले. बिग बॉस मराठीच्या घरातून काल सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या बाहेर पडल्या. यावेळी तृप्ती देसाई भावूक झाल्या. विशेष म्हणजे तृप्ती देसाईंना निरोप देतेवेळी घरातील इतर सदस्यही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान यावेळी तृप्ती देसाईंनी त्यांच्या नव्या इनिंगची घोषणा केली.

गेल्या आठवड्यात रंगलेल्या एका टास्कदरम्यान ज्यांना ‘नॉमिनेट’ करायचे आहे अशा खेळाडूंचे फोटो व्हाईट बोर्डवर आणि इतरांचे फोटो तोरणावरील पानांवर लावण्याचे आदेश बिग बॉसने दिले होते. यावेळी कॅप्टनने चार खेळाडूंना नॉमिनेट करावं, असा आदेश बिग बॉसने दिला होता. या आदेशानंतर प्रत्येक खेळाडूला ‘नॉमिनेट’ झालेल्या चौघांपैकी फक्त दोघांचे फोटो तोरणावरील फोटोंसोबत ‘एक्सचेंज’ (अदलाबदली) करण्याची परवानगी देण्यात आली होती. या टास्कमध्ये सर्वात शेवटी आलेल्या उत्कर्षने सोनाली घराबाहेर जावी या हेतूने फोटोंची अदलाबदली केली. यामुळे व्हाइट बोर्डवर मीनल शहा, सोनाली पाटील, जय दुधाणे आणि तृप्ती देसाई या खेळाडूंचे फोटो शिल्लक राहिले.

तर विशाल निकमला उत्कर्षने आधीच टेम्पटेशन टास्कमध्ये नॉमिनेट केले होते. यामुळे विशाल निकम, मीनल शहा, सोनाली पाटील, जय दुधाणे आणि तृप्ती देसाई हे पाच खेळाडू ‘नॉमिनेट’ झाले होते. या पाच सदस्यांमधून तृप्ती देसाई या घराबाहेर पडल्या. तृप्ती देसाई या तब्बल ५० दिवस बिग बॉसच्या घरात होत्या.

यावेळी महेश मांजरेकरांनी तुमचा या घरातील प्रवास इथे संपतोय, असे म्हटल्यानंतर तृप्ती देसाईंच्या डोळ्यात अश्रू तरळले. पण त्यांनीही खेळाडू वृत्ती दाखवत जनतेच्या मताचा आदर आहे, असं सांगितले. यावेळी सर्व सदस्यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी तृप्ती देसाईंनी कोणीच रडू नका, मला रडत जायचं नाही, असा सल्ला दिला.

“दर आठवड्याला कोणी ना कोणी इथून जाणार आहे. त्यामुळे कोणीही रडू नका. सर्वजण चांगले खेळाडू आहेत, चांगले खेळा. माझ्यासाठी सर्वच समान आहेत. पुढच्या रक्षाबंधनला गिफ्ट घेऊ. आयुष्यात कधीही तुम्हाला गरज लागली तर तृप्ती ताईंना फक्त एक फोन करायचा,” असे तृप्ती देसाई बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतेवेळी म्हणाल्या.

यानंतर महेश मांजेरकरांनी ५० दिवसांचा प्रवास कसा वाटला? असा प्रश्न तृप्ती देसाईंना विचारला. त्यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या, “५० दिवस हा फार मोठा प्रवास आहे. पण बिग बॉसच्या घराबद्दल बरेच गैरसमज आहेत. मात्र बिग बॉसचे घर हे फार छान आहे. मी सर्वांची मनं जिंकलंय हे सर्वात मोठं आहे. मी सामाजिक कार्य करते हे मी आधी लोकांना सांगत होते. पण आता लवकरच मी राजकारणात प्रवेश करणार आहे,” असे तृप्ती देसाईंनी यावेळी सांगितले. त्यामुळे तृप्ती देसाई या बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर आता राजकीय क्षेत्रात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास नेमका कसा असेल, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.