Ankita Walawalkar Shares Post : ‘बिग बॉस मराठी सीझन ५’मधून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अर्थात अंकिता वालावलकर. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तिनं संगीतकार कुणाल भगतबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे.

अंकिता सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. अशातच अंकिताने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच तिनं नवऱ्यासाठी खास पोस्टसुद्धा लिहिली आहे.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अंकिता आणि कुणाल हिमाचल प्रदेशला गेले आहेत. तिथले खास फोटो-व्हिडीओ ते आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर करीत आहेत. असाच बर्फात मजा-मस्ती करतानाच एक व्हिडीओ तिनं शेअर केला आहे आणि या व्हिडीओसह तिनं लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्यासाठी पोस्ट लिहिली आहे.

कुणालसाठी अंकिता वालावलकरची खास पोस्ट

या पोस्टमध्ये अंकिता म्हणते, हिमाचल प्रदेश या ठिकाणी आपली पहिली ट्रिप होती आणि आज आपली Anniversary… खरंच सांगू, कळलंच नाही एक वर्ष कसं गेलं… एक वर्तुळ पुर्ण झालं, असं वाटलं. या एका वर्षात लग्नाआधीची मी आणि आताची मी यांत खूप फरक आहे. कारण-‘तुझ्यामुळे’ मी आयुष्यात थोडीफार शहाणी (आणि थोडी जास्त शांत) झालेय. राग येण्याआधी दोनदा विचार करायला, भांडणाआधी थोडं हसायला तूच शिकवलंस.”

पुढे ती म्हणते, “आपण भांडलो, हसलो, फिरलो, प्लॅन केले, काही प्लॅन फसले; पण एक गोष्ट कायम राहिली ‘आपण’ आज लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आणि मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की, तू नवरा म्हणून जरी थोडासा त्रासदायक असलास तरी आयुष्याचा पार्टनर म्हणून तू परफेक्ट आहेस. पुढचं वर्ष अजून जास्त मजेत, जास्त प्रेमात आणि थोडं कमी (थोडं म्हणजे अगदी थोडंच) भांडणात जावो.”

अंकिता वालावलकरने शेअर केलेला व्हिडीओ

दरम्यान, अंकिता ही सोशल मीडियावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून लोकप्रिय आहे. तिचे व्हिडीओही व्हायरल होत असतात. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झाल्यानंतर ती अधिक चर्चेत आली. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अंकिता आणि कुणाल लग्नाच्या बेडीत अडकले. अंकिताचा नवरा हा लोकप्रिय संगीतकार आहे. त्यानं अनेक मराठी मालिका आणि सिनेमांसाठी संगीत दिलं आहे.