Suraj Chavan Wants To Work In South Industry : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या विजेतेपदावर सूरज चव्हाणनं आपलं नाव कोरलं. यामुळे सूरज चव्हाण आणखीनच प्रसिद्धी झाला. ‘बिग बॉस मराठी ५’च्या महाअंतिम सोहळ्यात सूरज चव्हाण विजयी होताच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याच्याबरोबरचा सिनेमा करणार असल्याचं सांगितलं होतं.

पुढे सूरज केदार शिंदे यांच्या ‘झापुक झुपूक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फ्लॉप ठरला. त्यानंतर आता सूरजनं दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करायचं आहे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सूरजनं एकदा तरी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करायचं असल्याची इच्छा व्यक्त केली. तसेच त्यानं त्याचा आवडता दाक्षिणात्य अभिनेता कोण आहे, हेही सांगितलं. सूरज नेमकं काय म्हणालाय? चला जाणून घेऊ…

Award Banner

“मला दाक्षिणात्य चित्रपटात काम करायचंय”

हॉट सीट टॉक्स या यूट्यूब वाहिनीशी साधलेल्या संवादात सूरजला त्याचा भविष्यात काय प्लॅन आहे, याबद्दल विचारण्यात आलं. त्याबद्दल सूरज म्हणाला, “मला दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम करायचं आहे आणि मी ते करणार. मला एकदा तरी दाक्षिणात्य चित्रपटात काम करायचं आहे. मला दाक्षिणात्य इंडस्ट्री खूप आवडते. तिथल्या चित्रपटातली अॅक्शन खूप आवडते. ते चित्रपट बघून मीसुद्धा तशी अॅक्शन केली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात मी असं केलं होतं. ‘बिग बॉस’च्या घरात कुणीतरी मला ‘जंगली’ म्हटलं होतं. मी गावठी आहे; पण मी कुणाला आवरत नाही. एका टास्कमध्ये निक्की आणि जान्हवी ‘अरबाज सूरज आलाय’, असं ओरडत होती. सूरज चव्हाण म्हणजे वादळ आहे.”

“मला अल्लू अर्जुनबरोबर काम करायचंय”

त्यानंतर सूरजला कोणत्या अभिनेत्याबरोबर काम करायची इच्छा आहे, असं विचारण्यात आलं. याबद्दल तो म्हणाला, “मला अल्लू अर्जुन हा अभिनेता आवडतो. त्याच्याबरोबर मला काम कारायचं आहे. त्याचे चित्रपट जरा वेगळेच असतात. तो एकच चित्रपट करतो; पण भारी करतो. तसं माझंपण आहे. मी एकदाच काम करतो आणि टॉपचं काम करतो. माझा लूक तिकडच्या लोकांसारखा आहे.” त्यानंतर त्याला यासाठीचे काही प्रयत्न सुरू आहेत का? असं विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला, “सयाजी शिंदेंशी काही संपर्क झाला, तर बघू. त्यांच्याशी माझी ओळख झाली, तर मी दाक्षिणात्य इंडस्ट्रीत नक्कीच जाईन.”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’सारखा शो, मग पुढे ‘झापुक झुपूक’सारखा सिनेमा केल्यानंतर आता तो कधी दाक्षिणात्य इंडस्ट्रीत झळकणार, याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच याव्यतिरिक्त तो आणखी कोणत्या नव्या प्रोजेक्ट्समधून भेटीला येणार आहे? याचीही त्याचे चाहते वाट पाहत आहेत.