Bigg Boss Marathi 6 New Captain : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनची पहिली कॅप्टन गायिका प्राजक्ता शुक्रे झाली होती. प्राजक्ताचा कॅप्टन्सीचा कार्यकाळ संपल्यावर आता घराचा नवीन अधिकारी कोण होणार? याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. यासाठी घरात ‘बीबी बेकरी’ हा अनोखा टास्क पार पडला.

‘बीबी बेकरी’ या टास्कमध्ये घरातील सदस्यांना ज्याला कॅप्टन्सीसाठी पाठिंबा द्यायचाय, त्याच्या ब्रेडला त्या-त्या ( लाल-आयुष, निळा-रोशन ) रंगाचा मस्का लावायचा होता. रोशन व आयुष या दोन स्पर्धकांमध्ये हा टास्क खेळवण्यात आला. या ‘बीबी बेकरी’ टास्कच्या तिन्ही फेऱ्यांमध्ये आयुष संजीवने बाजी मारली आणि तो घराचा नवीन कॅप्टन झाला आहे.

आयुष घराचा कॅप्टन झाल्यावर त्याच्या मित्रमंडळींनी एकच जल्लोष केला. याशिवाय अभिनेत्याच्या सोशल मीडिया टीमकडून सुद्धा खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करण्यात आली आहे. “जो सर्वांना मदत करतो, तोच सर्वांचा नेता होतो. सदस्यांच्या साथीने आणि तुमच्या प्रेमाने आयुष आता घराचा राजा झालाय. नेतृत्व कसं असावं, हे आता जगाला दिसेल!” असं आयुषच्या टीमने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

याशिवाय नेटकऱ्यांच्या मनात सुद्धा आयुष कॅप्टन व्हावा हीच इच्छा होती. “तिन्ही फेऱ्या आयुष जिंकला ही मोठी गोष्ट आहे”, “आयुष अभिनंदन तो नक्कीच डिझर्व्ह करत होता”, “आयुष नवीन कॅप्टन झालाय अजून काय पाहिजे…खूप समजूतदार मुलगा आहे”, “डिझर्व्हिंग कॅप्टन” अशा प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.

दरम्यान, आता २४ जानेवारीला वीकेंडला दुसरा भाऊचा धक्का पार पडणार आहे. या भागात घरातील नऊ नॉमिनेट सदस्यांपैकी कोण बेघर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय रितेश देशमुख कोणाची शाळा घेणार हे जाणून घेण्यासाठीही प्रेक्षक आतुर आहेत.