Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन आता चांगलाच रंगात आला आहे. यावर्षी घरातील काही सदस्य पहिल्या दिवसापासून चर्चेत आहेत. तन्वी कोलते, रुचिता जामदार यांची भाऊच्या धक्क्यावर सुद्धा शाळा घेण्यात आली होती. यानंतर तन्वीने तिचा गेम सुधारला पण, रुचितामध्ये काहीच बदल झालेला नाहीये. तिने या आठवड्यातही घरात जोरदार भांडणं केली आहेत. राकेश बापटवर तिने विनाकारण काही आरोप सुद्धा केले आहेत. यामुळे रुचिताच्या या वागणुकीवर राकेशच्या चाहत्यांसह मनोरंजनविश्वातील कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे.
‘बिग बॉस मराठी ३’ मधील स्पर्धक आणि लोकप्रिय अभिनेत्री सोनाली पाटील हिने देखील पोस्ट शेअर करत रुचिताबाबत आपलं मत मांडलं आहे. रुचिताचा गेम जराही पटत नाहीये, ती थोडं चांगली खेळली असती तरीही मी तिला सपोर्ट केला असता असं सोनालीने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
सोनाली पाटील म्हणते, “रुचिता जामदार…आणि ओळख कोल्हापूरची! अगं काय गेम खेळतेस? मला इतकं भारी वाटलं होतं की, यावर्षी सुद्धा कोल्हापूरची मुलगी बिग बॉसमध्ये जातेय. बरं तिने आधीही शो केले आहेत. मला असं वाटत होतं…चला आता हिला आपण फुल सपोर्ट करायचा. जरा चांगलं खेळली असती तरी मी पाठिंबा दिला असता…माझं सोडा संपूर्ण कोल्हापूरकरांनी तिला पाठिंबा दिला असता. पण, हे सगळं कधी होईल…जेव्हा ती चांगलं खेळेल. आता ती ज्याप्रकारे खेळतेय…तिला सपोर्ट कसा करायचा? सगळे आमच्या नावाने बोंबलतील की हिला का एवढा पाठिंबा देताय?”
“रुचिता तू कशाला दुसऱ्यांचे मुद्दे उखरून काढतेस? तुझं तू खेळत जा..बरं एवढा दंगा करण्याची खरंच काही आवश्यकता नाहीये. काही गोष्टी माणूस शांततेत सुद्धा करू शकतो. तो सोनावणे वहिनी साकारणारा करण सोनावणे…कॅमेऱ्याकडे बघून बोलतोय की, कोल्हापूरची माणसं अशी नसतात. तू एवढी आमची इज्जत काढलीस…रुचिता मी तुला सपोर्ट करू शकत नाही. जोपर्यंत तू चांगलं खेळत नाहीस तोपर्यंत मी तुला सपोर्ट करू शकत नाही. खरंच करण बरोबर बोलला कोल्हापूरकर असे नसतात. मला खरंतर आता शंका येतेय की तू खरंच कोल्हापूरची आहेस की नाही? अवघड आहे.” असं मत सोनाली पाटीलने व्यक्त केलं आहे.
दरम्यान, या आठवड्यात घरातून बेघर होण्यासाठी एकूण नऊ सदस्य नॉमिनेट आहेत. आता प्रभू, अनुश्री, दिव्या, सागर, राधा, रोशन, दिपाली, करण आणि रुचिता यांच्यामध्ये कोणाचा प्रवास संपणार हे या वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट होईल.
