|| गायत्री हसबनीस

 सध्या घराघरात सुरू असलेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या चावडीवर येऊन स्पर्धकांना फैलावर घेणारे, त्यांना खडे बोल सुनावणारे दिग्दर्शक महेश मांजरेकर लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गेल्या दीड वर्षांच्या काळात करोनामुळे सगळेच ठप्प झाले होते, या काळात मांजरेकर यांनी प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक असलेला ‘अंतिम – द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट पूर्ण के ला. मांजरेकर यांनी दिग्दर्शित के लेला हिंदी चित्रपट आणि तेही सलमान खानला मुख्य भूमिके त घेऊन के लेला चित्रपट पाहण्याची पर्वणी बऱ्याच दिवसांनी चालून आली आहे. सलमान असल्याने हा चित्रपट अ‍ॅक्शनपट असल्याची चर्चा के ली जाते आहे, मात्र हा हिंदीतील नेहमीच्या धाटणीचा चित्रपट नाही, असे मांजरेकर यांनी स्पष्ट के ले.

‘खरंतर इतरत्र जसे अ‍ॅक्शनपट पहायला मिळतात तसा हा चित्रपट नसून या चित्रपटाचा संपूर्ण अवतार हा वेगळ्या धाटणीचा आहे’, असं दिग्दर्शक महेश मांजरेकर सांगतात. या चित्रपटात सलमान खानची भूमिका, त्याचं दिसणं आणि वावरणंही वेगळ्या पद्धतीने पहायला मिळणार आहे. त्याच्या नेहमीच्या हिरोच्या भूमिकेपेक्षा त्याने साकारलेले हे पात्र अत्यंत वेगळे आणि महत्त्वाचे आहे, असं ते सांगतात. ‘अंतिम’ असं या हिंदी चित्रपटाचे नाव असलं तरी या चित्रपटाची मूळ कथा मराठीतल्या गाजलेल्या चित्रपटाची आहे व तो आहे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा ‘मुळशी पॅटर्न’. अर्थात, आपल्या पद्धतीने कथेत व त्याच्या रूपरचनेत मांजरेकर यांनी काही बदल केले असले तरी या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खान आणि आयुष शर्मा या दोन कलाकारांमुळे या चित्रपटाला वेगळा आयाम प्राप्त झाला आहे. सलमानला नेहमीपेक्षा वेगळ्या लुकमध्ये दाखवायचे असल्याने त्याने आजपर्यंत फार कधी न के लेल्या सरदारच्या रूपात त्याला लोकांसमोर आणले, असं मांजरेकर आवर्जून सांगतात.

‘मुळशी पॅटर्न’चाच हिंदी रिमेक का करावासा वाटला?, याबद्दल ते सविस्तर सांगतात. ‘मी ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाशी खूप जास्त जोडला गेलो होतो. प्रवीणशी माझी मैत्री खूप चांगली आहे. एकूणच प्रवीणच्या घडामोडी मला माहिती होत्या, अगदी ‘देऊळ बंद’ पासून ते ‘मुळशी पॅटर्न’पर्यंत ज्यात मी कामही केलं. ‘मुळशी पॅटर्न’ जेव्हा प्रवीण लिहीत होता तेव्हा मी त्याला काही गोष्टी सुचवत होतो, पण तेव्हा मला वाटलं की नको हे सर्वस्वी त्याला करू दे कारण तो हा चित्रपट करतोय. तो चित्रपट त्यानंतर प्रेक्षकांना तुफान आवडला आणि त्या चित्रपटाचे कौतुकही झाले. मला असं कळलं की सलमान खान ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे हक्क घेतो आहे तेव्हा मलाही फार आनंद झाला. सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक महेश लिमये यांनी तो चित्रपट सलमान खानला दाखवला आणि त्याने हक्क घेतले त्या सिनेमाचे. त्यामुळे मला सर्व प्रक्रिया तशी ज्ञात होती. त्यासंबंधीच्या अनेक हालचाली माझ्या कानावर येत होत्या. तेव्हा एकदा मला आयुष भेटला व त्याला मी सांगितलं की मूळ चित्रपटाशी प्रामाणिक राहा, त्याचा भलताच चित्रपट होऊ देऊ नका’, अशी आठवण त्यांनी सांगितली. मांजरेकर हे मूळ चित्रपटाशी संबंधित असले तरी त्यांच्या डोक्यातला चित्रपट त्यांना अधिक खुणवत होता. ते त्या रिमेकच्या प्रक्रियेत अनेक गोष्टी सुचवतही होते, पण शेवटी सलमान खानने त्यांना चित्रपटाचा रिमेक दिग्दर्शित करण्यासाठीचा प्रस्ताव आला आणि गोष्टी पुढे सरकल्या.

रिमेक दिग्दर्शित करण्यासाठी होकार देताना मी सलमानपुढे एक अट ठेवली होती, असं ते सांगतात. ‘सलमानचा फोन आला तेव्हा तो म्हणाला तू करशील का?, मी म्हटलं मी एका अटीवर करेन जर तो मी लिहिला तर. त्यावर तो म्हणाला ठीक आहे. आत्तापर्यंत त्यांनी जे काही विकसित केलं होतं ते त्याने मला एकदा पाहून घ्यायला सांगितलं. पण तेही दाखवू नका, असं स्पष्ट सांगून मी चित्रपट लिहून पूर्ण के ला. आता त्यात सलमान असल्याने त्याच्यासाठी नायिका, त्याच्यावर चित्रित केलेले गाणं… या सगळ्या सलमानच्या चित्रपटासाठी असलेल्या व्यावसायिक अपेक्षा होत्या त्याही पूर्ण केल्या, परंतु तरी मी यात कुठेही समाधानी नव्हतो’, असं त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं. त्यानंतर जे घडलं त्याने मात्र हा सिनेमा बदलला असं ते सांगतात. ‘सलमानने झालेले चित्रीकरण पाहिले आणि त्याने चटदिशी सांगितले की नायिका नको! यावरून मी मानलं सलमानला… हे त्यालाही पटलं. कारण मला मनापासून वाटतं होतं की सलमान त्याच्या चित्रपटातून जे करतो ते त्याने या वेळी न करता काहीतरी वेगळं करावं. मला प्रेक्षकांना सलमानचा जसा चित्रपट द्यायचा होता ते करायचं स्वातंत्र्य त्याने मला दिलं, त्याचाही आनंद आहे आणि मला माझ्या डोक्यातला सिनेमा करता आला म्हणूनही समाधान आहे. मूळ संहितेशीही फार छेडछाड मी केली नाही. जिथे मला वाटलं की बदल करायला हवेत तिथे तसे मी केले,’ असं म्हणत आपण मूळ चित्रपटाशी खूप प्रामाणिक राहिलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आयुष शर्मा आणि सलमान खान यांचे वैयक्तिक नातेसंबंध असल्याने दोघांची निवड के लेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट के लं. त्यांच्या मते आयुषला ‘लवरात्री’ सिनेमानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळी ओळख मिळेल. आणि मूळ चित्रपटातील उपेंद्र लिमयेच्या भूमिके शी तोडीस तोड राजवीरची भूमिका असावी आणि त्यासाठी सलमान योग्य आहे, त्याला त्या भूमिके तून लोकांनी ओळखावं अशी अपेक्षा होती, असं ते म्हणाले. ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘कुटुंब’, ‘नटसम्राट’, ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ आणि आता येणारा ‘पांघरूण’ असे नानाविध आशयांचे सिनेमे करणारे महेश मांजरेकर म्हणतात, ‘नवे नवे विषय साकारताना नेहमी उत्साही वाटतं, ऊर्जा संचारली आहे असं वाटतं. ‘पांघरूण’बद्दल सांगायचं तर ती कथा फक्त नऊ पानांची आहे, चित्रपटाचा आणि कथेचा फारसा संबंध नाही पण ती गोष्ट वाचली आणि मला इतकं सुचत गेलं की मी अक्षरश: धडधड लिहून काढली. आतापर्यंत मी जेवढे सिनेमे केले त्यातला सर्वात आवडता चित्रपट हा माझा ‘पांघरूण’ आहे. जो लवकरच प्रदर्शित करण्यासाठी तयारी सुरू आहे’, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय, कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावरही चित्रपट करण्यासाठी ते उत्सुक असून स्वामित्व हक्कासंदर्भात असलेल्या काही अडीअडचणी सुटल्यानंतर लवकरच त्याकडेही वळणार असल्याची इच्छा महेश मांजरेकर यांनी बोलून दाखवली. 

‘मला ‘मुळशी पॅटर्न’चा तो वेगळेपणा, तो अंदाज खूपच आवडला. एकतर मला मिश्र स्वभाव छटा असणारी पात्रं खूप आवडतात आणि त्या चित्रपटाच्या पात्रात ते आहे. त्यामुळे जी कथा मला मनापासून अत्यंत भावली, त्यावर चित्रपट के ला’

 –  महेश मांजरेकर, दिग्दर्शक