दर काही दवसांनी चरित्रपटांची एक लाट प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. या चरित्रपटांच्या गर्दीत एका दृष्टिहीन जिद्दी तरुणाची संघर्षगाथा सांगणारा ‘श्रीकांत’ अनेक कारणांनी महत्त्वाचा ठरतो. इतिहासातील चरित्रपट धुंडाळण्यापेक्षा केवळ स्वत:साठी नाही तर आपल्यासारख्या अनेकांसाठी व्यवस्थेशी लढून का होईना भविष्याची वहिवाट निर्माण करणाऱ्या श्रीकांत बोलासारख्या तरुणाची कथा लोकांसमोर आणण्याचा दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांचा प्रयत्न अधिक स्तुत्य म्हणायला हवा.

आंध्र प्रदेशातील एका खेडेगावात गरीब घरात जन्माला आलेलं बाळ, आपल्याला पहिला मुलगा झाला म्हणून उराशी घेऊन नाचणाऱ्या त्याच्या नानांना काही क्षणांतच तो दृष्टिहीन आहे याची जाणीव होते. दृष्टिहीन मुलगा समाजात स्वावलंबीपणे कसा जगू शकेल? तो सतत कोणा ना कोणाच्या आयुष्यावर ओझं बनून राहणार? त्याची अवस्था आपल्याला कणाकणाने मारत राहणार या भीतीपोटी मातीत खड्डा खणून त्या बाळाला जिवंत पुरायला निघालेला त्याचा बाप ते त्याच मुलाने कमावलेल्या आर्थिक सुबत्तेमुळे असाच खड्डा खणून त्यात स्वत:चं घर बांधण्यासाठी पहिली वीट ठेवणारा बाप हा खूप मोठा आणि अर्थपूर्ण प्रवास ‘श्रीकांत’ चित्रपटात पाहायला मिळतो. दृष्टिहीन असला तरी श्रीकांत अत्यंत हुशार आहे, अभ्यासू आहे. दृष्टिहीन असल्यामुळे सतत अवहेलना, संकटं आपल्या वाट्याला येणार हे त्याला माहिती आहे. या संकटांपासून दूर पळून जाणं शक्य नाही, त्यांच्याशी लढावंच लागेल हे त्याला लहानपणीच उमगलं आहे. त्यामुळे बंद डोळ्यांनी शिक्षण घेऊन पुढे पुढे जात राहण्याचं स्वप्न पाहायचं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडायचं एवढंच त्याला येतं. त्याचा स्वप्नांचा प्रवास सहजसोपा नाही, मात्र त्याच्या आयुष्यात आलेल्या काही व्यक्तींमुळे तो त्याच्यासाठी सुकर होतो. श्रीकांतचे कर्तृत्व मोठे आहे, मात्र त्याचा संघर्षाचा प्रवास रंगवताना तोही एक माणूसच आहे. चुका त्याच्याकडूनही होऊ शकतात नव्हे तो चुकतो, भरकटतो आणि चुकांची जाणीव झाल्यावर पुन्हा मार्गावरही येतो. त्याच्या व्यक्तित्वातील हे पैलू, स्वभावाचे कंगोरे, त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या कारणांनी आलेले चढउतार हे सगळं दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांनी सहज पद्धतीने आणि वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या शैलीत मांडलं आहे.

हेही वाचा >>>मराठी मालिका विश्वातील पहिलावहिला ‘एआय’ प्रयोग

चरित्रपट रंगवताना त्या व्यक्तीचा सगळा जीवनपट दोन तासांत मांडणं हे कायमच अवघड काम. त्यामुळे श्रीकांत बोला यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे, त्यातही त्याचे वेगळेपण दाखवणारे नेमके प्रसंग याची पेरणी अधिक आहे. त्यामुळे श्रीकांतचा संघर्ष आपल्यापर्यंत पोहोचतो, मात्र दिग्दर्शक त्यातल्या भावनाट्यात आपल्याला गुंतवून ठेवत नाही. त्या त्या क्षणी त्याच्या मनातील आंदोलनं आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, त्याउलट ती सुखांतिका अधिक वाटते. हा मांडणीतला दोष आहे, मात्र मुळात श्रीकांत बोला यांचं कुठल्याही चौकटीत न बसणारं बाणेदार, प्रसंगी उर्मट वाटेल असं वेगळं व्यक्तिमत्त्व आणि ते हुबेहूब साकारण्यासाठी अभिनेता राजकुमार राव याने घेतलेली मेहनत यामुळे ही सहजसोपी मांडणी लक्षात आली तरी आपल्याला बोचत नाही.

संपूर्ण चित्रपटात राजकुमार रावने अंध व्यक्तीच्या डोळ्यांची, भुवयांची हालचाल ते त्यांची देहबोली हे सगळं प्रभावीपणे आपल्या अभिनयात उतरवलं आहे. त्याच्याशिवाय, त्याच्या मागे सतत सावली बनून राहणारी त्याची शिक्षिका देविका (ज्योतिका सदाना), त्याचा व्यवसायातील भागीदार, मित्र रवीश (शरद केळकर) आणि त्याच्यावर नितांत प्रेम करणारी स्वाती (अलाया एफ) अशा तीन-चार महत्त्वाच्या व्यक्तिरेखा चित्रपटभर त्याच्याबरोबर आहेत. ज्योतिका सदाना यांनी खूप सहजतेने देविकाची भूमिका रंगवली आहे. श्रीकांतवर विश्वास असणारा, त्याच्याबद्दल आदर असणारा, प्रसंगी त्याच्याकडून दुखावले गेल्यानंतरही संयमाने आणि धीराने वागणाऱ्या रवीशच्या भूमिकेत अभिनेता शरद केळकर चपखल बसला आहे. तर स्वातीच्या भूमिकेसाठी नेहमीचा ग्लॅमरस वावर सोडूनही सुंदर दिसलेली अलाया अभिनयाच्या बाबतीतही आपल्याला सुखद धक्का देऊन जाते. आणि तरीही हा चित्रपट राजकुमार रावने एकहाती पेलला आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. दृष्टिहीनता म्हणजे आपल्या आयुष्यात आलेलं संकट नव्हे, आपण इतरांपेक्षा वेगळे नाही किंवा आपल्याकडे काही कमीही नाही. आपण काहीही करू शकतो हा श्रीकांत बोला यांचा विश्वास सतत अधोरेखित होत राहतो. दृष्टिहीन लोकांना गरीब बिचारे, ते काही करू शकत नाहीत अशी दया दाखवून रस्ता पार करून देण्याची भूमिका घेण्यापेक्षा त्यांना स्वत:ला विश्वासाने त्या रस्त्यावर एकट्याने चालण्याचं बळ द्या हा या चित्रपटातील संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. किंबहुना, भावनिक नाट्यापेक्षा श्रीकांतचे विचार, त्याने स्वत:सह इतर दृष्टिहीन लोकांमध्ये घडवलेला बदल आणि त्याच्या कर्तृत्वामुळे आपल्यासारख्या डोळस लोकांनाही मिळालेली नवी दृष्टी यामुळे हा चित्रपट अधिक भावतो.

श्रीकांत

दिग्दर्शक – तुषार हिरानंदानी

कलाकार – राजकुमार राव, ज्योतिका सदाना, शरद केळकर, अलाया एफ, जमील खान.