आत्तापर्यंत एकाही अभिनेत्रीने एवढे भयपट केले नसतील जेवढे ‘ग्लॅमरस’ म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्री बिपाशा बासूच्या नावावर आहेत. एरवी बिपाशा एकदम फि ट ‘बिकिनी बेब’ वगैरे विशेषणांनी जोडलेल्या अभिनेत्रींमध्ये मोडते. मात्र तिच्या नावावर असलेल्या या डझनभर भयपटांनी तिला इतरांपासून थोडं वेगळं केलं आहे. मला ‘भयपटांची राणी’ असा किताब दिला तरी चालेल.. माझी त्याला ना नाही, असं बिपाशाचं म्हणणं आहे. मी आयुष्यात कधी ठरवून अगदी गोडगोजिऱ्या, साजिऱ्या भूमिका केलेल्याच नाहीत. माझ्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना मी ‘जिस्म’सारखा चित्रपट केला आहे. ‘राज’सारखे चित्रपट करायला कोणीही अभिनेत्री तयार नव्हती. ते चित्रपट मी केलेत आणि तो जॉनर गाजवलाही आहे. मला स्वत:ला याचा अभिमान वाटतो, असं म्हणणारी बिपाशा पुन्हा एकदा ‘क्रिचर’ या वेगळ्या आणि बॉलीवूडमधला पहिलाच प्रयोग ठरावा अशा थ्रीडी चित्रपटातून दिसणार आहे. पुन्हा भयपटच.. असं वाक्य तुम्ही उच्चारायच्या आधीच ती ‘क्रिचर’ भयपट नाही, तुम्ही गल्लत करू नका.. अशी सुरुवात करते.
‘क्रिचर’ भयपट नाही, तर थरारपटांच्या शैलीत मोडणारा चित्रपट आहे. आपण ‘गॉडझिला’, ‘ज्युरासिक पार्क’सारखे हॉलीवूडपट पाहिले आहेत. त्यात तुमच्या कल्पनेपेक्षाही अवाढव्य असा एक प्राणी असतो. तो प्राणी तुमचं काय करू शकतो, याची तुम्हाला जाणीव होते. ती जी भीती त्या क्षणाला तुमच्या मनात ठाण मांडून बसते. एकतर तो अचानक कुठून उपटला आहे हे तुम्हाला कळत नसतं. त्याच्या त्या अचानक येण्याने आपण अस्वस्थ होतो. त्यांच्यापासून स्वत:ची सुटका कशी करून घ्यायची याचा शोध सुरू होतो. हा जो भीतीचा खेळ आहे, थरार आहे, तो ‘क्रिचर’ चित्रपटात आहे. मुळात हा आपल्याकडचा पहिला ‘क्रिचर’पट असल्याने त्याला नाही म्हटलं तर मी मूर्ख ठरेन.. असं ती विश्वासाने सांगते. थ्रीडी चित्रपटाचं तंत्र अजूनही आपल्यासाठी फारच अवघड आहे. अशा वेळी पहिलाच ‘क्रिचर’पट असल्याने चित्रीकरणाचा अनुभव कसा होता, असं विचारल्यावर ‘भलताच अवघड’ अनुभव होता.. असं बिपाशा म्हणते. इतर वेळेला आपल्यासमोर कोणी तरी असतं. तो त्याचा संवाद म्हणतो, मग त्यावर आपली प्रतिक्रिया म्हणून आपण संवाद म्हणायचा. संवादाच्या, हावभावांच्या अशा क्रिया-प्रतिक्रियेचा खेळ म्हणजे अभिनय असतो. इथे तसं काहीच नसतं. तुमच्यासमोर ९ ते १२ फुटांचा क्रिचर असणार आहे. तुमची नजर सतत त्या उंचीवर रोखलेली असते. मग तिथे स्टंटमन येतो. तो आपल्याला त्या क्रिचरचे हावभाव करून दाखवतो. म्हणजे आता क्रिचर इथे वळणार आहे, तो तिथून झर्रकन मागे फिरेल म्हणजे तुमची हालचालही इथून तिथे असली पाहिजे, अशा बारीकसारीक तपशिलांवर आपल्याला लक्ष ठेवायचं असतं. आणि हा सगळा प्रकार तीनदा करायचा. स्टंटमॅन, त्याच्याबरोबर संदर्भ तपासून घ्यायचे, सूचना लक्षात घ्यायच्या, तालीम करायची, शॉट द्यायचा. पण तो किती वेळा तर तीन वेळा. एकच शॉट एकाच पद्धतीने तीन-तीनदा द्यायचा. माझ्या हावभावांमध्ये, संवादांमध्ये जराही बदल केलेला चालणार नव्हता. तुमचे तिन्ही शॉट्स एका टेकमध्ये ओके करायचे. हे ऐकायला जितकं किचकट वाटतं ना तितकंच ते करतानाही होतं. पण आता सगळं पूर्ण झाल्यावर मजा वाटते आहे. म्हणून, हा चित्रपट संपूर्णपणे वेगळा आहे. आणि प्रेक्षकांनी असे वेगळे चित्रपट आवर्जून पाहायला हवेत, असं ती आग्रहाने सांगते.
बॉलीवूडमध्ये तरु ण अभिनेत्रींची एक लाट आल्यामुळे तू स्वत:ला या भयपट प्रकारांमध्ये अडकवून घेतलंस का? यावर ते भयपट नेहमीच्या चित्रपटांपेक्षा वेगळे होते, असं तिचं म्हणणं आहे. तरुण पिढी आली हे जसं खरं आहे, तसंच कारकिर्दीच्या आणि वयाच्या ज्या टप्प्यावर आपण आहोत तिथे महाविद्यालयीन तरुण-तरुणींभोवती फिरणाऱ्या ‘रोम-कॉम’ कथा आपण साकारू शकतच नाही, असं ती प्रामाणिकपणे सांगते. ‘रोम-कॉम’ चित्रपट करायला आजही हरकत नाही, मात्र त्या कथांमधील व्यक्तिरेखा कुठे तरी आपल्या वयाच्या जवळपास असणाऱ्या हव्यात, ही गरज आहे. त्यामुळे आता चित्रपट निवडताना विविध गोष्टींचा विचार क रावा लागतो, असं तिने सांगितलं. ‘मस्ती’, ‘जिस्म’सारखे प्रौढ विषयांवरचे चित्रपटही करण्यात मला चुकीचं वाटत नाही. कारण मी स्वत: प्रौढ आहे आणि त्या त्या वयात अशा गोष्टी घडतात, हे वास्तव नाकारण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे चित्रपटाची कथा फार महत्त्वाची आहे, असं तिने स्पष्ट केलं.
जॉन अब्राहम हा तिच्या प्रेमाचा इतिहास झाला. सध्या हर्मन बवेजा या अभिनेत्याबरोबर तिचं नाव जोडलं जातं आहे. मात्र हर्मन खूपच चांगला माणूस आहे आणि तितकाच चांगला मित्रही आहे. पण लग्नाचा विचार आपण अजूनही केलेला नाही, असं तिने सांगितलं.
‘बिकीनी’ला ना नाही.. पण, ‘झीरो फिगर’ नको
बिकिनी घालून दृश्ये देण्यात काही चुकीचं नाही. त्याचा उगाच बाऊ करण्यात अर्थ नाही.  देहयष्टी आखीव-रेखीव असेल आणि लोकांसमोर सादर होताना काय करायचं याचं भानही असेल तर त्यासाठी ‘झीरो फिगर’ असणं गरजेचं नाही. एक काळ मी या सगळ्यात एवढे गुरफटले होते की माझ्या प्रकृतीची फारच वाईट अवस्था झाली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी मला योगसाधना, आहार, व्यायाम असे नानाविध उपाय करावे लागले आहेत. आता मला माझ्या प्रकृतीचं खरं रहस्य कळलं आहे. तेव्हा ‘झीरो फिगर’च्या प्रेमात पडू नका, असा सल्लाही ती देते.
बिपाशा बासू