scorecardresearch

Premium

गुलशन ग्रोवर: बॉलिवूडचा ‘बॅडमॅन!’

बॉलिवूडमध्ये एक वेगळं स्थान गुलशन ग्रोवरने त्याच्या मेहनतीवर निर्माण केलं आहे.

News About Gulshan Grover
गुलशन ग्रोवरविषयी या गोष्टी माहित आहेत का? (फोटो सौजन्य-गुलशन ग्रोवर, फेसुबक पेज)

गुलशन ग्रोवर हे नाव घेतलं त्या नावापाठोपाठच त्याच्याविषयीचा शब्द आपल्या मनात येतो, तो देखील त्याच्याच आवाजात… तो शब्द असतो ‘बॅडमॅन’! हिंदी सिनेसृष्टीचा ‘बॅडमॅन’ म्हणून ओळखला जाणं हे गुलशन ग्रोवरने साध्य केलंय. त्यामागे त्याची प्रचंड मेहनत आणि साधना आहे. ८० च्या दशकापासून गुलशन ग्रोवर हा त्याचं वेगळेपण टिकवून आहे. खलनायक होण्यासाठीच आपण हिंदी सिनेसृष्टीत आलो असं गुलशन ग्रोवरने अनेकदा सांगितलंय. एवढंच काय मी रिजेक्टेड हिरो नव्हतो.. मला अनेक चित्रपटांच्या हिरो म्हणून ऑफर होत्या ज्या मी नाकारल्या असंही त्याने सांगितलं. मात्र त्याचा हा सगळा प्रवास सोपा नव्हता. आज याच बॅडमॅनचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने जाणून घेऊ त्याच्याविषयी माहित नसलेले किस्से.

‘बॅडमॅन’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी सांगितल्या लहानपणीच्या आठवणी

गुलशन ग्रोवरच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. २०१९ मध्ये गुलशन ग्रोवरच्या आयुष्यावरचं पुस्तक ‘बॅडमॅन’ प्रकाशित झालं त्यावेळी त्याने आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या होत्या. मी माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. बालपण गरीबीत गेलं. माझी शाळा दुपारी असायची, त्यावेळी शाळेचा गणवेश मी दप्तरात भरायचो आणि सकाळीच घरातून निघायचो. माझ्या घरापासून लांब असणाऱ्या भागात जायचो आणि तिथे भांडी घासण्याची पावडर, कपडे धुण्याच्या पावडर, फिनेलच्या गोळ्या असं विकायचो. हे विकून जे पैसे मिळत त्यातून शाळेचा खर्च सुटत असे. अनेकदा ते दिवस आठवले की वाईट वाटतं. माझ्या आई वडिलांकडे पैसे नसायचे अनेकदा आम्ही उपाशी झोपायचो. मी महाविद्यालयात जाईपर्यंत आमच्या घरातली परिस्थिती अशीच होती असंही गुलशन ग्रोवर यांनी सांगितलं होतं. मुंबईत आलो तेव्हाही माझं स्ट्रगल सुरुच होतं. मात्र मी परिस्थितीला सामोरा जात राहिलो, मेहनत करायची घाबरायचं नाही हा हिय्या केला होता. त्यामुळेच यश मिळालं आहे असंही त्यांनी म्हटलं होतं.

kgf-chapter3
‘केजीएफ ३’च्या रिलीज डेटबद्दल निर्मात्यांचा मोठा खुलासा; ‘रॉकी भाई’च्या रूपात पुन्हा झळकणार सुपरस्टार यश
salaar-dunki
शाहरुखच्या ‘डंकी’समोर प्रभासचा ‘सालार’ उभा ठाकणार; ट्रेड एक्स्पर्टच्या मते कोणाला बसणार फटका? जाणून घ्या
the-vaccine-wae-trailer
The vaccine War Trailer : “India Cant Do It…” विवेक अग्निहोत्रींच्या बहुचर्चित ‘द व्हॅक्सीन वॉर’चा ट्रेलर प्रदर्शित
tejas barve dhol pathak
Video : “एकच नशा, ढोल ताशा”; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची ढोल-ताशा पथकाबरोबर तालीम, कंबरेला ताशा बांधला अन्…
Gulshan Grover
गुलशन ग्रोवर यांनी स्वतःची एक ओळख सिनेसृष्टीत तयार केली आहे. (फोटो सौजन्य-फेसबुक पेज, गुलशन ग्रोवर)

दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमध्ये शिक्षण आणि मग गाठली मुंबई

दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमध्ये गुलशन ग्रोवर यांचं शिक्षण झालं. तिथे मी शिकत असताना गुलशन ग्रोवर यांच्या मनात हे पक्कं झालं होतं की आपल्याला पुढे जाऊन अभिनयच करायचा आहे. दिल्लीतल्या कॉलेजमध्ये असताना गुलशन ग्रोवर नाटकात काम करायचे, तसंच लिटिल थिएटर ग्रुप नावाचा एक ग्रुप होता त्या ग्रुपशीही ते संलग्न होते. या महाविद्यालयातून त्यांनी M.Com पर्यंत शिक्षण घेतलं. पण नंतर ते अभिनयाकडे वळले. आपल्याला व्हिलन व्हायचं आहे स्वप्न घेऊनच ते मुंबईत आले. त्यावेळी कुठलाही विचार केला नव्हता, मुंबईत आल्यानंतर स्ट्रगल सुरु झालं. एका मुलाखतीत गुलशन ग्रोवर म्हणाले, मी मुंबईत आलो त्यावेळी मी पाहिलं माझ्या बरोबर जे शिकत होते ते सगळे पुढे जात होते. जस्टिस अर्जुन सिक्री हे माझे वर्गमित्र आम्ही एकाच बेंचवर बसत होतो. रजत शर्मा माझ्या वर्गात होते. अरुण जेटली हे आमचे सिनीयर्स होते. मला रोज रात्री झोप लागायची नाही. वाटायचं मित्र चालले पुढे आपलं काय? पण त्याच वेळी मला ही जाणीव झाली की अभिनय करायचा असेल तर हे सगळं होणारच. मला कुटुंबाने खूप मदत केली. माझं स्ट्रगल सुरु असताना हे कळलं होतं की यायचं अभिनेता व्हायचं पाच सहा वर्षात निघून जायचं हे मला करायचं नव्हतं. मला आयुष्यभर काम करायचं होतं. त्यामुळे मी ठरवलं की व्हिलनच व्हायचं. कारण त्यामुळे फिटनेस, व्हॅनिटी यामुळे काही फरक पडत नाही. खलनायकाचं वय मॅटर करत नाही त्यामुळे मी तेच करायचं ठरवलं. कन्हैय्यालाल, प्रेम चोप्रा, जीवन, प्राण या सगळ्यांना मी आदर्श मानतो. हे सगळे उत्तम अभिनेते होते. कामाला महत्त्व देणारे ते कलाकार होते असंही त्यांनी सांगितलं.

रोशन तनेजांनी अभिनय शिकवला

मी अॅक्टिंग स्कूल मध्ये आलो. रोशन तनेजा मला शिकवायला होते आणि त्यावेळी अनिल कपूर हा माझा क्लासमेट होता. त्या स्कूलमध्ये मला अनेक गोष्टी समजल्या. जे कलाकार टिकून आहेत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. देवानंद यांची एक खास स्टाईल होती, शत्रुघ्न सिन्हा यांची वेगळी स्टाईल. त्यामुळे मला हे समजलं की फक्त चांगला अभिनेता असून उपयोग नाही. आपल्याला वेगळेपण सिद्ध करावं लागेल आणि त्यातूनच मी माझ्या लुकवर मेहनत घ्यायचो. प्रत्येक सिनेमात काहीसं वेगळेपण आणायचो असंही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. आत्तापर्यंत गुलशन ग्रोवर यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

साकारत असलेल्या व्हिलनच्या लुकवर प्रचंड मेहनत

गुलशन ग्रोवर यांनी लुकवर प्रचंड मेहनत घेतली आहे. प्रत्येक सिनेमात वेगळेपण कसं जपता येईल यासाठी गुलशन ग्रोवर निर्मात्यांना विनंती करायचे. कारण विग तयार करायचा, कपडे तसे असतील तर तितका खर्च वाढायचा. त्यावेळी गुलशन ग्रोवर कारमध्येही शक्य होईल तेवढा मेक-अप करायचे आणि सेटवर पोहचायचे. तो काळ व्हॅनिटीजचा नव्हता. अभिनेते तीन-चार चित्रपटांमध्ये काम करायचे, त्यामुळे सेटवर लवकर पोहचून वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करायचे. गुलशन ग्रोवर यांना सुरुवातीला ही सगळी तारेवरची कसरत करायचे. मात्र एक काळ असा आला की गुलशन ग्रोवर यांच्यासाठी भूमिका लिहिल्या जाऊ लागल्या आणि त्यांना हवा तो लुक करण्यासाठीची मुभाही दिली जाऊ लागली. त्यांनी त्यासाठी घेतलेली मेहनत हे यामागचं कारण आहे.

डेव्हिड धवनचा किस्सा

एक और एक ग्यारा नावाच्या सिनेमाचं शुटिंग होतं. डेव्हिड धवन दिग्दर्शक होते. उटीला शुटिंग पार पडणार होतं. त्यावेळी गुलशन ग्रोवर डेव्हिड यांना म्हणाले होते की मला माझ्या लुकवर काम करायचं आहे. त्यावेळी डेव्हिड धवन म्हणाले, होय मला सुभाष घईंनी फोन करुन तुझ्याबद्दल सांगितलं. गुलशनला जेवढा वेळ द्यायचा तेवढा दे. तो जे करेल ते परफेक्ट असतं. त्यामुळे तू त्याला वेळेसाठी टोकू नको. डेव्हिड धवन यांना तेव्हा कळलं की गुलशन ग्रोवरचा लुक बदलल्याने किती परिणाम साधता येतो. त्यानंतर ते शुटिंग डेव्हिड धवन यांनी दुपारी लावलं आणि गुलशन ग्रोवर यांना लुकसाठी पुरेसा वेळ दिला.

गुलशन ग्रोवर सिनेसृष्टीत आले त्या काळात अनेक व्हिलन म्हणून भूमिका करणारे कादर खान, अमरिश पुरी, शक्ती कपूर या सगळ्यांना प्रसिद्धी मिळाली होती. त्या सगळ्यांमध्ये आपलं वेगळंपण जपत गुलशन ग्रोवर यांनी वाटचाल केली. त्या काळात अनिल कपूरने गुलशन ग्रोवर यांची भेट उमेश मेहरांशी घालून दिली. सुरींदर कपूर म्हणजे अनिल कपूरचे वडील यांनी ही भेट घालून दिली होती. उमेश मेहरांबरोबर गुलशन ग्रोवर यांनी २३ चित्रपट केले आहेत. अमरिश पुरींनी गुलशन ग्रोवर यांना अनेक भूमिका मिळवून देण्यासाठी मदत केली. ऋषी कपूर, मिथुन, शबाना आझमी यांच्यासारख्या अनेक कलाकरांनी गुलशन ग्रोवर यांना मदत केली. विनय शुक्ला यांच्या घरी एकदा ते गेले होते तेव्हा त्यांना अवतार सिनेमा कसा मिळाला याचा किस्साही गुलशन ग्रोवर यांनी एका मुलाखतीत सांगितला.

अवतार सिनेमा कसा मिळाला?

संवाद लेखक विनय शुक्ला यांच्या घरी आमचं बऱ्याचदा जाणं व्हायचं. सिनेमावर चर्चा व्हायची. तिथे गेलं की विनय शुक्ला यांच्या पत्नी जेवण केल्याशिवाय सोडायच्या नाहीत. मी एकदा सात-आठ दिवसांनी त्यांच्या घरी गेलो, मला भूक लागली होती आणि मला ठाऊक होतं की इथे गेल्यावर आपल्याला जेवल्याशिवाय सोडणार नाहीत. त्यावेळी मी हम पाँच सिनेमा केला होता. अॅक्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये मी तेव्हा शिकवत होतो, त्यावेळी संजय दत्त, कुमार गौरव, सनी देओल, टीना मुनिम, गोविंदा हे सगळे माझे विद्यार्थी होते. आम्ही काही दिवसांनी विनय शुक्लांच्या घरी जायचो. नाही, नाही म्हणायचो पण ते जेवणाचा आग्रह व्हायचाच. विनय शुक्लांकडे गेलं की एक पद्धत होती की बूट बाहेर काढावे लागायचे. त्यादिवशी मी गेलो, बूट काढले पाहिलं तर शुक्ला यांच्या घरात शबाना आझमी बसल्या होत्या. त्यावेळी माझं लक्ष नव्हतं की माझे पायमोजे फाटलेत. शबाना आझमी मला म्हणाल्या गुलशन अरे तू फाटके मोजे घालून का आला आहेस? माझ्याकडे जेवणाचे पैसे नसायचे तर मोजे कुठून बदलणार हे माझ्या मनात आलं आणि मी त्यांना उत्तर दिलं माझी परिस्थितीच अशी आहे. त्यावर त्या म्हणाल्या अरे तुझ्याकडे कुठलं काम नाही का? मी म्हटलं नाही. त्या मला म्हणाल्या तुझ्याकडे बरे फोटो आहेत? तोपर्यंत मी कुठलेही डिसेंट फोटो काढले नव्हते. मी त्यांना हो म्हणालो, आपल्याला काम मिळणार याचा इतका आनंद झाला की मी जेवलोही नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो. नाथ गुप्ता हे आमचे फोटोग्राफर होते त्यांनी पहाटे पाचला मला फोटो काढून दिले. त्याचे पैसेही घेतले नाहीत. ते फोटो घेऊन मी शबाना आझमींकडे गेलो. त्यांनी ते फोटो मोहन कुमार यांना दिले आणि सांगितलं की अवतार सिनेमात गुलशनला घे. शबाना आझमींमुळे मला काम मिळालं. हा किस्सा गुलशन ग्रोवर यांनी सांगितला.

हिरोचे रोल ठरवून नाकारले

‘नाचे मयुरी’,’मुझे इन्साफ चाहिये’ यासारखे अनेक सिनेमा गुलशन ग्रोवर यांना हिरोच्या भूमिकेसाठी ऑफर झाले होते, पण ते त्यांनी नाकारले. I am Not a Rejected Hero I’m Villain By Choice हे त्यांचं म्हणणं होतं. मला आयुष्यभर काम करायचं होतं त्यामुळे खलनायकी भूमिकाच आधार देऊ शकतात हे मला माहित होतं. अनेक भूमिकांनी मला हात दिला. त्यामुळेच गुलशन ग्रोवर यांनी खलनायकी सोडली नाही.

बॅडमॅनची इमेज कशी तयार झाली?

सुभाष घईंनी त्यांच्या राम-लखन सिनेमात केसरिया विलायती या भूमिकेसाठी गुलशन ग्रोवरची निवड केली. त्यात बॅडमॅन असं गुलशन ग्रोवर त्याच्या संवादाआधी म्हणताना दाखवला आहे. हा डायलॉग इतका हिट झाला की बॅडमॅन म्हटलं की गुलशन ग्रोवरच हे समीकरणच तयार झालं. त्यानंतर बॅडमॅन हा ब्रँड झाला. खर्जातला आवाज, खतरनाक लुक आणि उत्तम अभिनय याची भट्टी इतकी जबरदस्त जमली की गुलशन ग्रोवर बॅडमॅन या नावानेच ओळखले जाऊ लागले. बॅडमॅन नावाने आत्मचरित्रही आलं. त्या पुस्तकावरचा फोटोही खास लुकमधला होता. देवीसा नावाच्या एका ब्रँडने बॅडमॅन हा परफ्युमही तयार केला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात हा बॅडमॅन किती घट्ट बसला आहे हे कळतं. टाइपकास्ट होण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले यात शंकाच नाही. आता ते कमल हसनसह इंडियन २ मध्ये मुख्य खलनायक साकारत आहेत. सदमानंतर बहुदा हे दोघं पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.

Gulshan Grover
केसरिया विलायती या भूमिकेत गुलशन ग्रोवर. यातल्या बॅडमॅन या डायलॉगनेच ही इमेज तयार केली.(फोटो सौजन्य-गुलशन ग्रोवर, फेसुबक पेज)

गुलशन ग्रोवर यांनी व्हिलन जितका ताकदीने साकारला आहे तितक्याच ताकदीने चांगल्या भूमिकाही केल्या आहेत. मात्र लोकांना आवडतो तो त्यांचा व्हिलनच. मग तो हेराफेरीतला जगीरा असो, तीन दिवारेमधला मोहन कुमार असो, गँगस्टरमधला खान असो किंवा १६ डिसेंबरमधला दोस्त खान प्रत्येक भूमिकेत त्यांनी वेगळेपण जपलं आहे. त्यांच्या १६ डिसेंबर या सिनेमात दोस्त खानच्या तोंडी एक संवाद आहे “आज तक मैं इतने रुप बदल चुका हं की मुझे अपनी असली शकल तक याद नहीं.” त्या एका डायलॉगने त्यांचं वेगळेपण अधोरेखित होतं. आपल्या प्रत्येक भूमिकेत समरस होणारा हा ‘बॅडमॅन’ आजही आपल्या मनावर अधिराज्य करतोय आणि यापुढेही करत राहिल यात शंका नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Birth day special gulshan grover and his film career read the special content and unknown things scj

First published on: 21-09-2023 at 07:40 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×