हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कोणत्याही गॉडफादरशिवाय अभिनेत्री कंगना रणौतने स्वत:ची ओळख निर्माण केली. सुरुवातीच्या काळात अपयशाचा सामना करत, त्यावर मात करत आणि विविध भूमिकांना रुपेरी पडद्यावर न्याय देत कंगनाने तिचे अभिनय कौशल्य सर्वांसमोर दाखवले. आज २३ मार्चला ती तिचा ३२ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. वाढदिवसानिमित्त तिच्यावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना बहीण रंगोलीनेही तिला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

कंगनाची बहिण रंगोली चंडेलने सोशल मीडियावर कंगनाच्या लहानपणीचा एक फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. रंगोलीने शेअर केलेल्या फोटोमध्ये कंगनाच्या चेहऱ्यावर निरागस हास्य दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत, माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, असं कॅप्शनही रंगोलीने दिलं आहे.

या वाढदिवशी कंगनाने स्वत:लाच एक खास गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. कंगना दहा दिवस मौनव्रत बाळगणार आहे. यासाठी ती कोईम्बतूर येथे एका खास मेडिटेशनसाठी जाणार आहे. कंगनाने स्वत: याविषयीची माहिती दिली आहे.

कंगनाचा जन्म २३ मार्च १९८७मध्ये हिमाचल प्रदेशमधील मनालीजवळील एका छोट्याशा गावात झाला. कंगनाचे वडील अमरदीप व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आई आशा शिक्षिका आहे. कंगनाचे बालपण डेहरादूनमध्ये गेले. तेथेच डीएव्ही हायस्कूलमधून तिने तिचं शिक्षण पूर्ण केले. ‘मणिकर्णिका -द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटानंतर आता कंगना ‘मेंटल है क्या’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसेल.