अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे आयुषमान खुराना. आज १४ सप्टेंबर रोजी आयुषमानचा वाढदिवस आहे. ‘विकी डोनर’, ‘बधाई हो’, ‘अंधाधून’, ‘ड्रिम गर्ल’ यांसारख्या चित्रपटांमुळे चर्चेत आलेल्या आयुषमानवर आता बॉलिवूडचा यशस्वी हिरो म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. पण आयुषमान या नावाने सर्व परिचित असलेल्या या अभिनेत्याचे खरे नाव वेगळे आहे. चला जाणून घेऊया आयुषमानच्या वाढदिवशी त्याच्या विषयी काही खास गोष्टी…

आयुषमानचा जन्म १४ सप्टेंबर १९८४ रोजी चंदीगढमध्ये झाला. जन्मावेळी त्याचे नाव निशांत खुराना असे ठेवण्यात आले होते. मात्र त्यानंतर तो तीन वर्षांचा असतानाच त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या नावात बदल करुन आयुषमान असे ठेवले. आयुषमानला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. १७ व्या वर्षी त्याने एका टिव्ही रिअॅलिटी शो मध्येही सहभाग घेतला होता. त्यानंतर २००४ मध्ये तो ‘रोडिज २’मध्ये झळकला. आवड जोपासत असतानाच त्याचे शिक्षणाकडेही लक्ष दिले. आयुषमानने मास कॉम्युनिकेशनचे शिक्षण घेतले असून सोबत त्याने पाच वर्ष थिएटरही केले.

आयुषमानने ‘रोडिज२’नंतर ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोचे सूत्रसंचालन देखील केले. विशेष म्हणजे या साऱ्या प्रवासानंतर तो २०१२ मध्ये ‘विकी डोनर’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकला. त्यानंतर ‘दम लगा के हईशा’, ‘बरेली की बर्फी’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘अंधाधुन’, ‘बधाई’, ‘ड्रिम गर्ल’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’, ‘गुलाबो सिताबो’ अशा अनेक चित्रपटात त्याने भूमिका साकारली. त्याचे हे चित्रपट गाजले देखील.